भामट्याने आॅनलाईन पळविलेले सात लाख परत मिळवून दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:48 PM2018-10-03T23:48:47+5:302018-10-03T23:50:37+5:30
लॉटरी लागली, एटीएम कार्डचे नूतनीकरण करायचे आहे, अल्प दरात झटपट कर्ज मिळेल आणि नोकरीच्या आमिषाला बळी पडून सायबर भामट्यांकडून गंडविल्या गेलेल्या आठ जणांना त्यांचे ७ लाख ८८१ रुपये परत मिळवून देण्यात ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलला यश आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सायबर क्राईम सेलचे कौतुक केले.
औरंगाबाद : लॉटरी लागली, एटीएम कार्डचे नूतनीकरण करायचे आहे, अल्प दरात झटपट कर्ज मिळेल आणि नोकरीच्या आमिषाला बळी पडून सायबर भामट्यांकडून गंडविल्या गेलेल्या आठ जणांना त्यांचे ७ लाख ८८१ रुपये परत मिळवून देण्यात ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलला यश आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सायबर क्राईम सेलचे कौतुक केले.
दूर कोठे तरी बसलेले भामटे सामान्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डची मुदत संपली असून, त्याचे नूतनीकरण करण्यासाठी माहिती विचारतो. त्यानंतर ओटीपी क्रमांक विचारून आॅनलाईन व्यवहार करून तुमच्या खात्यातील रक्कम काढून घेतो. घरावर अथवा शेतात टॉवर लावा आणि दरमहा लाखो रुपये महिना कमवा, अशा प्रकारच्या जाहिराती वाचून संबंधित लोकांच्या मोबाईलवर संपर्क साधणाऱ्यांना वेगवेगळी कारणे सांगून बँकेत मोठ्या रकमा भरण्यास सांगून आॅनलाईन फसवणूक केली जाते. यासोबत लॉटरी, नोकरीच्या आमिषानेही आॅनलाईन गंडविण्याचे प्रकार सतत घडतात. फसवणूक झाल्यानंतर २४ तासांच्या आत पोलिसांकडे तक्रार आल्यास भामट्याने पळविलेली रक्कम परत मिळवून देणे पोलिसांना शक्य होते. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र सायबर क्राईम सेल स्थापन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक एम. एम. सय्यद, कर्मचारी कैलास कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप, गजानन बनसोड हे कार्यरत आहे. जानेवारी ते सप्टेंबरअखेरपर्यंत आॅनलाईन फसवणुकीच्या आठ घटनांची माहिती २४ तासांच्या आत पोलिसांना मिळाली. त्यानंतर सायबर क्राईम सेल पथकाने अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली झटपट कारवाई करून आठ जणांना त्यांच्या रकमा मिळवून दिल्या. यात आकाश जाधव (रा. वरखेड, ता. गंगापूर) यांना दहा हजार रुपये, सारंगधर आहेर यांना ३० हजार, श्यामसुंदर पोंदे (रा. वैजापूर) यांचे ४१ हजार ५४८ रुपये, भागाजी पवार (रा. हिवरखेड, ता. कन्नड) यांना २ हजार ३३३ रुपये, उत्तम खेडके (रा. खुलताबाद) यांना ७० हजार रुपये, माजी सैनिक रामदास जाधव (रा. कापूसवडगाव, ता. वैजापूर) यांना ४ लाख ७५ हजार रुपये, मंगेश प्रल्हाद वाघ यांना ५ हजार आणि अप्पासाहेब जाधव यांना ६७ हजार रुपये, असे एकूण ७ लाख ८८१ रुपये परत मिळवून दिले.
------------