मसापमधील ‘आर्थिक’ गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:47 PM2018-07-17T12:47:30+5:302018-07-17T12:48:26+5:30
विश्लेषण : एका पॅनलमधून निवडून येऊनही कामकाज मात्र एकदिलाने चालत नाही, हेच यावरून दिसून येते. बैठकीचा कार्यवृत्तांत वाचल्यानंतर योग्य निर्णय घेईल, या डॉ. बडे यांच्या म्हणण्याचा अर्थ काय घ्यायचा? कदाचित ते न्यायालयाचा दरवाजा खटखटतील. त्यातून काय निष्पन्न होईल, हे आताच काय सांगावे?
- स.सो. खंडाळकर
मसाप आणि वाद हे जणू समीकरणच. आता कुठे थोडी शांतता दिसून येत असतानाच एक नवा वाद समोर आला आणि त्यातून मसापचे कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बडे यांना पदावरून हटविण्यात आले व देवीदास कुलकर्णी यांची कोषाध्यक्षपदी १५ जुलैच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. अर्थात हा असा बदल घडणार याची कल्पना डॉ. बडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून व्यक्त केली होती. हा वाद साहित्यिक स्वरुपाचा असता तर त्यावर उलटसुलट चर्चा होत राहिली असती. परंतु डॉ. बडे यांनी मसापच्या आर्थिक गोंधळावर बोट ठेवल्याने तेथे काय चालले असावे याची कल्पना यावी.
इतरांच्या मनमानीला आक्षेप का नाही?
‘इतरांनी संस्थेत मनमानी पद्धतीने काम केल्यास आक्षेप घेतला जात नाही’ हे डॉ. बडे यांचे वाक्यही सूचकच. आता हे मनमानी करणारे कोण, कोणाच्या भरवशावर त्यांची मनमानी चालते, याचा शोध घेणे रंजकच ठरेल. बडे यांचा हा इशारा कोणाकडे आहे, हेही स्पष्ट झाले पाहिजे.
एका पॅनलमधून निवडून येऊनही कामकाज मात्र एकदिलाने चालत नाही, हेच यावरून दिसून येते. बैठकीचा कार्यवृत्तांत वाचल्यानंतर योग्य निर्णय घेईल, या डॉ. बडे यांच्या म्हणण्याचा अर्थ काय घ्यायचा? कदाचित ते न्यायालयाचा दरवाजा खटखटतील. त्यातून काय निष्पन्न होईल, हे आताच काय सांगावे?
मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि डॉ. बडे यांच्यातील वाद विकोपाला गेला व तातडीने १५ जुलै रोजी मसापच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. बैठकीला ३२ पैकी २४ सदस्य उपस्थित होते. मसापचे अध्यक्ष व कार्यवाहांचा आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप वाढला असून, कोऱ्या धनादेशांवर स्वाक्षरी घेण्यात येत असल्याचा आरोप बडे यांनी केला होता. याविषयी बैठकीत सविस्तर चर्चा होऊन बडे यांचा आरोप खोडून काढण्यात आला. संस्थेचे आर्थिक व्यवहार पारदर्शी असून, बडे यांचा आरोप तद्दन खोटा असल्याचे ठाले यांनी सांगितले. बैठकीला बडे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. तब्येत ठीक नसल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळविले.
बैठकीला उपस्थित राहण्याची इच्छा प्रदर्शित करूनही ते बैठकीला अनुपस्थित राहिले. काही वेळ प्रतीक्षा करून नंतर बैठकीचे कामकाज सुरू झाले. दीर्घ पत्रे लिहून बडे यांनी काही आक्षेप घेतले होते. त्यांचे वाचन बडे यांच्या उपस्थितीत करणे योग्य ठरेल. म्हणून सप्टेंबर महिन्यात बैठक घेऊन पुढील कारवाई करू असा प्रस्ताव ठाले पाटील यांनी मांडला खरा. पण त्याला सर्व सदस्यांनी विरोध केला व बडे यांना तात्काळ मुक्त करण्याची मागणी केली. सोशल मीडियावर सतत मसापच्या विरोधात लिहून बडे यांनी संस्थेची बदनामी केली आहे. सदस्यांशी सुसंवाद ठेवण्याऐवजी त्यांनी टोकाची भूमिका घेतली. मसापचा आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी बडे यांना पदावरून काढा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. अखेर ठराव मंजूर करून बडे यांना पदावरून हटविण्यात आले.
नवीन कोषाध्यक्ष निवडीचा ठराव डॉ. शेषराव मोहिते आणि प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी मांडला. या ठरावानुसार परभणीचे देवीदास कुलकर्णी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कुलकर्णी यांनी यापूर्वी हे पद सांभाळले आहे. त्यामुळे बडेंचा त्रास झाला तसा संस्थेला होणार नाही, अशी आशा बाळगू या.
डॉ. बडे यांना असे का म्हणावे लागते....
यासंदर्भात स्वत: बडे काय म्हणतात, हेही लक्षात घेतले गेले पाहिजे. ‘माझ्याकडे कोरे चेक पाठवून सह्यांसाठी जबरदस्ती केली जात होती. निदान मला बजेट तरी सांगा. कोऱ्या चेकवर सह्या करणे सर्वथा चुकीचे आहे, असे मी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना ठणकावून सांगितले होते. यासाठी मला पत्रे पाठविण्यात आली. मात्र, मी सह्या केल्या नाहीत. सह्या करणार नसाल तर काढून टाकू. अन्यथा राजीनामा द्या, असा दबाव माझ्यावर आणण्यात आला’ या शब्दातील डॉ. बडे यांची बाजू.