व्यवहारवादी संकल्पनेचे वाहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:16 PM2018-07-21T16:16:27+5:302018-07-21T16:16:59+5:30
बुकशेल्फ : विचारवंत, समीक्षक अशा विविध प्रांतांत योगदान देणारे नरहर कुरुंदकर यांची रविवारी जयंती. या निमित्ताने डॉ. न. गो. राजूरकर यांच्या ‘विचारयात्रा’ या नव्या ग्रंथातून कुरुंदकरांच्या विचारविश्वाचा वेध घेण्यात आला आहे.
- डॉ. रवींद्र काळे
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे विचारविश्व व सम्यक भूमिकांचा वेध घेणारा ग्रंथ म्हणून ‘विचारयात्रा’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी समृद्ध राष्ट्रनिर्मितीसाठी सुजाण नागरिक निर्माण करण्याच्या कार्यात भाग घेऊन महाराष्ट्रामध्ये लोकशाही समाजवादासह गांधी आणि नेहरूंचे तत्त्वज्ञान यांचा प्रसार व प्रचार करण्यातच आपले जीवन समर्पित केले. गांधी-नेहरू विचारांचे ‘विद्यापीठ’ असा त्यांचा उल्लेख करता येईल. याधारे त्यांच्या राजकीय विचारांची व तत्त्वचिंतनाची समीक्षा या ग्रंथात लेखकाने ‘नेहरू व गांधी : नेतृत्वाची विविध परिमाणे, ‘हिंदू मुस्लिम प्रश्न : गुंतागुंत व त्यातून निर्माण झालेल्या समस्या’ आणि ‘सेक्युलरिझम : ऐतिहासिक आढावा व त्या संकल्पनेशी निगडित असलेले प्रश्न’ या तीन भागात केली आहे. त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान या तीन बिंदूभोवतीच केंद्रित होते. डॉ. राजूरकरांच्या संशोधनाचा विषय नेहरूंचे राजकीय विचार असल्यामुळे राज्यशास्त्राच्या या व्यासंगी संशोधकावर नेहरू आणि गांधींच्या विचारांचा प्रभाव पडलेला आहे. म्हणून त्यांच्या राजकीय तत्त्वचिंतनाची समीक्षा खऱ्या लेखकाने अनुभवाच्या व निरीक्षणाच्या आधारावर केली. हे करताना लेखकाने अगदी स्पष्टपणे त्यांच्या विचारांचे मर्म आणि मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.
या ग्रंथामध्ये पहिला लघु प्रबंध ‘नेहरू व गांधी : नेतृत्वाची विविध परिमाणे’ हा आहे. यामध्ये प्रामुख्याने कुरुंदकरांची नेहरू आणि गांधी या दोन राजकीय नेतृत्वावरील डोळस भक्ती किती व्यापक स्वरूपात होती. ते या दोन नेतृत्वाच्या विचारांचे ते वाहक होते. नेहरूंच्या नेतृत्वाचे परिमाणे सांगताना नेहरूंच्या धोरणाचे योग्य आकलन लोकांना होणे अत्यंत जरुरीचे होते. भारताच्या वाटचालीतील नेहरूंनी निश्चित केलेली दिशा किती योग्य होती हे सुशिक्षितांच्या मनावर बिंबवण्याचे महत्त्वाचे कार्य ज्यांनी केले त्यात कुरुंदकरांना मानाचे स्थान द्यावे लागेल. नेहरूंनी लोकशाही समाजवादच का स्वीकारला? या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्यांच्या विचारावर पडलेला प्रभाव आपल्याला विचारात घ्यावा लागेल. नेहरूबद्दल विविध गैरसमज बाळगणाऱ्या विरोधी पक्षातील विचारवंतांनी जेव्हा कुरुंदकरांचे चिंतन वाचले तेव्हा त्यांना नेहरू एक तत्त्वज्ञ असल्याचा साक्षात्कार झाला. त्यातून त्यांची वैचारिक पातळी ही किती व्यापक होती हे स्पष्ट होते. नेहरूंच्या मूल्याधिष्ठित विचारधारेचा प्रभाव लोकशाही समाजवादी राष्ट्रनिष्ठेने अंगीकृत झालेला होता.
गांधीजींच्या नेतृत्वाचे विविध परिमाणे तपासताना गांधींनी राष्ट्र उभारणीसाठी प्रथम जनतेला जागे करून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग शिकवला. त्याचबरोबर भारतामध्ये आधुनिकीकरण आणावयाचे असेल तर ग्रामीण जनतेचा विचार करून आपल्याला खेड्यांकडे जावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या घटकांचे राष्ट्र बनते त्यांना हे राष्ट्र आपले आहे, आपल्यासाठी आहे याची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. ही जाणीव जनसामन्यांत रुजविण्याचे कार्य गांधीजींनी अतिशय लीलया पद्धतीने केलेले आहे. त्यामुळेच एक जनआंदोलन उभे राहून स्वातंत्र्य आंदोलनास गती मिळाली. गांधीजी आणि नेहरूंच्या नेतृत्वाची परिमाणे अतिशय स्पष्टपणे या ग्रंथात नमूद झालेली आहेत.
हिंदू-मुस्लिम प्रश्न : गुंतागुंत त्यातून निर्माण झालेल्या समस्या या प्रश्नाची उकल करताना हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि भारताची फाळणी या दोन गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू असून, ही समस्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील अजूनही संपलेली नाही. सर सय्यद अहमद खान हे इंग्रजी शिक्षणाचा मुस्लिमांमध्ये प्रसार करण्याचा एक स्तुत्य हेतू इंग्रजी सरकारच्या मदतीने तडीस नेतात. भारतात राहणाऱ्या लोकांचा धर्माशी संबंध जरी असला तरी हिंदू-मुसलमान यांनी गुण्यागोविंदाने राहण्यातच त्यांचे व देशाचे कल्याण आहे असे म्हणणारे सर सय्यद यांच्या विचारात काँग्रेस अस्तित्वात येण्याच्या सुमारास प्रचंड बदल होतो. त्याबद्दलच्या तर्क-वितर्कांचे विश्लेषण या पुस्तकांमध्ये आपल्याला दिसते. सर सय्यद यांच्या मृत्यूनंतर १९०६ मध्ये आॅल इंडिया मुस्लिम लीग हा पक्ष अस्तित्वात येऊन तो विभक्त मतदारसंघाची मागणी का करतो? या प्रश्नांच्या कारणमीमांसा कुरुंदकर करतात. हमीद दलवाई यांच्या संदर्भाचा आधार घेऊन लेखकाने सांगितले की मोहम्मद अली जीनांना मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे होते व तथाकथित मुसलमानांना संपूर्ण भारतात हवा होता. राजाराम मोहनरॉय यांच्यासारख्या विचारवंतामुळे हिंदू समाजात जेवढे प्रबोधन झाले तेवढे मुस्लिम समाजात झालेले दिसत नाही. याचाच परिपाक म्हणून हिंदू-मुस्लिम प्रश्न, गुंतागुंत व निर्माण झालेल्या समस्या आजही वर्तमान स्थितीत तशाच आढळतात.
आजही काश्मीरसारखा प्रश्न अतिशय भयावह असून, सदरील प्रश्न गुंतागुंत व समस्यांचे उत्तर म्हणजे सेक्युलरिझम होय. लोकशाही आणि सेक्युलरिझम या दोन्ही संकल्पना एकमेकांशी पूरक असून त्यातूनच आदर्श मानवी समाजव्यवस्था स्थापन होऊ शकते यावर कुरुंदकरांची श्रद्धा आहे. कुरुंदकरांचे राजकीय तत्त्वचिंतन विचारधारेच्या रूपाने सदैव स्मरणात राहून हे चिंतन राजकीय अभ्यासक प्रेरणा घेऊन आपल्या विचारांना दिशा प्रदान करतील यात तीळमात्र शंका नाही.