वांझोट्या चर्चेचे गु-हाळ
By गजानन दिवाण | Published: February 24, 2018 07:21 PM2018-02-24T19:21:32+5:302018-02-24T19:24:38+5:30
औरंगाबादेतील कचरा गेल्या आठ दिवसांपासून जागच्या जागी पडून आहे. पर्यटनाची राजधानी अक्षरश: कचर्यात बुडाली आहे. कचर्याचा हा प्रश्न आजचा नाही. २००३ साली उच्च न्यायालयाने नारेगावातील कचरा डेपो बंद करण्याचे आदेश दिले होते.
औरंगाबादेतील कचरा गेल्या आठ दिवसांपासून जागच्या जागी पडून आहे. पर्यटनाची राजधानी अक्षरश: कचर्यात बुडाली आहे. कचर्याचा हा प्रश्न आजचा नाही. २००३ साली उच्च न्यायालयाने नारेगावातील कचरा डेपो बंद करण्याचे आदेश दिले होते. ते कोणीही ऐकले नाही. १५ वर्षांपासून पालिका आणि लोकप्रतिनिधींनी यावर गंभीर विचार कधी केलाच नाही. नारेगावकरांनी चार महिन्यांची मुदत देऊनही या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. त्यामुळे कचरा डेपो परिसरातील लोकांच्या संयमाचा बांध फुटला आणि नारेगाव, मांडकीसह परिसरातील २० गावांच्या नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा मार्ग पत्करला. कचराच टाकू दिला जात नसल्याने प्रशासनापासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनाच खडबडून जाग आली. बैठकांवर बैठका झाल्या. बाभुळगाव, नक्षत्रवाडी, नायगाव-खंडेवाडी, पडेगाव येथील सफारी पार्क आदी जागांचा पर्याय पडताळून पाहिला गेला. पण, अख्ख्या औरंगाबादकरांचा कचरा आपल्या दारात आणून टाकण्यास सर्वांनीच विरोध केला. नारेगावकर रस्त्यावर उतरले की काहीतरी आश्वासन द्यायचे, वेळ मारून न्यायची. कधी प्रक्रीयेचे गाजर दाखवायचे तर कधी दुसरी जागा शोधण्याचे. करायचे काहीच नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या. पालिकेचा वर्षोनुवर्षे हा खेळ सुरू आहे आणि तो नारेगावकरांनी पूरता ओळखला आहे. पालिका आणि लोकप्रतिनिधींचे हे कोडगेपण शहरातील १५ लाख लोकांच्या आरोग्यावर उठले आहे. पहिल्या पाचच दिवसांत तब्बल दोन हजार टन कचरा शहरात साचला आहे.
स्थानिक पातळीवर काहीच होत नसल्याचे दिसताच मुख्यमंत्र्यांच्या दालनात या कचर्यावर चर्चा झाली. त्यांच्याच सांगण्यावरुन पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी औरंगाबाद गाठले. आंदोलक, लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाशी चर्चा केली. तब्बल दीड तास ती चालली. पण, हाती काहीच लागले नाही. तीन-चार दिवसांत प्रश्न मार्गी लागेल, प्रक्रिया प्रकल्पाला पाच महिन्याचा कालावधी लागेल. त्याचा प्रशासकीय कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ठरलेली उत्तरे देऊन पालकमंत्र्यांनी मुंबई जवळ केली. नारेगांव, बाभूळगांव आणि सफारी पार्क परिसरात कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा समोर आल्या आहेत. यातील एका ठिकाणी शनिवारपासून कचरा टाकण्यास सुरूवात होईल, असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले. वास्तवात कुठल्याच निर्णयावर प्रशासन पोहोचले नाही. अशा वांझोट्या चर्चेचे गु-हाळ औरंगाबादकरांनाही नवे नाही. कचरा प्रश्नावर नारेगावकरांच्या संयमाचा बांध फुटला तशी वेळ औरंगाबादकरांवर येऊ नये म्हणजे मिळविले.