Teachers Day 2018 : नमन कुलगुरूंच्या गुरुजनांना :...शिक्षक जेवढे मारायचे, तेवढेच प्रेमही करायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:21 PM2018-09-05T12:21:25+5:302018-09-05T12:22:57+5:30
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्म दिन. 'शिक्षक दिन' म्हणून तो साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्यभरातील कुलगुरूंनी त्यांच्या गुरूजनांना केलेले नमन त्यांच्याच शब्दांत...
आपला विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्चपदी विराजमान झाल्यानंतर शिक्षकाला होणारा आनंद शब्दांत मावणारा कसा असेल? दररोज वर्गात न चुकता ‘एक साथ नमस्ते’ म्हणत हसतमुखाने स्वागत करणारा आणि ‘अबकड’ गिरविणारा आपला विद्यार्थी कुलगुरू झाल्याचे पाहून अशीच काहीशी अवस्था त्यांच्या शिक्षकांची झाली असणार. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्म दिन. 'शिक्षक दिन' म्हणून तो साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्यभरातील कुलगुरूंनी त्यांच्या गुरूजनांना केलेले नमन त्यांच्याच शब्दांत...
शिक्षकांच्या छान छान गोष्टीने शाळेची गोडी लावली
- पद्मश्री जी. डी. यादव, कुलगुरू, इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या अर्जुनवाडा गावात जि. प. ची प्राथमिक शाळा होती. मात्र इमारत नसल्यामुळे गावातील विविध मंदिरांमध्ये शाळा भरायची. शाळेत न येणाºया मुलांना पकडून, उचलून घेऊन येत. मीसुद्धा शाळेत जात नव्हतो. शाळेत भाट गुरुजी होते. त्यांनी कपाटातून एक गोष्टीचं ‘टिकोजीराव’ हे पुस्तक दिलं. त्यातील गोष्ट सांगितली. तेव्हा शाळेत छान छान गोष्टी असतात म्हणून आनंद झाला. पुढे कधीही शाळा बुडवली नाही. उलट खूप गोडी लागली. तिसरीत असताना रघुनाथ कुलकर्णी नावाचे गुरुजी आले होते. २० वर्षांचे असतील. सकाळीच विद्यार्थ्यांना गावात स्वच्छता करायला लावायचे. सातवीत जिल्ह्यात पहिला आल्यानंतर पुढील शाळेसाठी शेळेवाडी गावात जावे लागले. चालत जायचो. संस्कृत आणि गणितासाठी बाळासाहेब गंगाथीरकर हे शिक्षक होते. माझे वडील पहिलवान होते. मीसुद्धा कुस्ती खेळायचो. एकेदिवशी संस्कृतचा पेपर होता. त्याच दिवशी कुस्त्या होत्या. माझा ३८ वा क्रमांक होता. मी पेपरला सायकल घेऊन गेलो. एका तासात पेपर सोडवून कुस्तीच्या ठिकाणी पोहोचलो. या पेपरला १०० पैकी १०० गुण मिळाले. परीक्षा झाल्यानंतर शिक्षक गावी परतले. त्आठवीचे पेपर कोण तपासणार असा प्रश्न उपस्थित झाला. गंगाथीरकर सरांनी मलाच पेपर तपासायला लावले. कोणालाही न सांगण्याची शपथ देऊन. मी ही ते तपासले. मला शिक्षकांनी घडवले ते असे.
शिक्षक मुलांची प्रगती घरी सांगायचे
- डॉ. पी.पी. पाटील, कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेत असतानाचे दिवस आजही आठवतात. शिक्षक खूपच चांगले होते. ते रस्त्याने जात असले तर मुले लपायची. रस्त्यात भेटलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीची माहिती द्यायचे. कधी घरी येऊनही मुलांच्या खोड्या, अभ्यास सांगायचे. जेवढा अभ्यास होता तेवढा शिकवला जायचा. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या अंजाळा या छोट्या गावातील जि.प.च्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिकचे शिक्षण याच गावात नूतन विद्यामंदिर शाळेत झाले. पुढील शिक्षण पुण्यात पूर्ण केले. प्राथमिकला असताना माझे हस्ताक्षर अतिशय खराब होते. तेव्हा आईने मला खूप मारले. एवढे की पायाला दुखापत झाली. याची माहिती लक्ष्मण चौधरी गुरुजींना झाली. त्यांनी घरी येऊन सांगितले की, आता माझ्या घरी यायचे. त्यांच्या घरी मला हस्ताक्षर सुधारता आले. काही दिवसांतच हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर झाले. माध्यमिकला बी. आर. पाटील नावाचे सर गणित शिकवायचे. बी. ई. चौधरी सर हेसुद्धा आठवणीत आहेत. ओ. पी. पाटील हे मुख्याध्यापक होते. त्यांची इंग्रजी प्रभावी होती. त्याचा फायदा झाला. पुण्यातील गरवारे महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे डॉ. इनामदार सरांनी खूप मोलाचे सहकार्य केले.
शिक्षक जेवढे मारायचे, तेवढेच प्रेमही करायचे
- डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
घरात कोणतीही शिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती. ज्या भागात राहत होतो, तो भागही शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासच होता. तरीही शिकत गेलो. वेळोवेळी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. हे मार्गदर्शन आयुष्यभर कामी आले. यातच शिक्षकांच्या अविस्मरणीय आठवणी दडलेल्या आहेत. जेव्हा महाविद्यालयाचा प्राचार्य झालो. तेव्हा माझ्या शाळेत आपला विद्यार्थी प्राचार्य झाल्याच्या कौतुकापोटी मोठा सत्कार केला होता. या कार्यक्रमाला शिक्षक जातीने हजर होते. तेव्हा माझी छाती गर्वाने फुगून गेली होती. नागपूर शहरातील जुन्या मंगळवारी भागात बालपण गेले. याच ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे ही शाळा बंद झाली. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण लाकडगंज भागातील विनायकराव देशमुख हायस्कूलमध्ये झाले. माझे वडील चौथीपर्यंत शिकलेले होते. आईला लिहिता, वाचताही येत नव्हते. माझ्या शाळेत साकुरे नावाचे गुरुजी होते. ते खूप मारायचे. गणित शिकवत होते. ते जेवढे मारायचे तेवढेच प्रेमही करायचे. याच शाळेत चौधरी सर होते. तेही खूप प्रेमळ होते. प्राध्यापक झाल्यानंतर त्यांना एकदा भेटायला गेलो होतो. पुढे याच शाळेच्या परिसरातील एका महाविद्यालयात प्राचार्य झालो. तेव्हा शाळेने आपला विद्यार्थी प्राचार्य झाल्याच्या आनंदात सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मला शिकविणारे सर्व शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांच्या कडक शिस्तीमुळेच आम्ही घडलो
- डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (पदभार-एसआरटीएम विद्यापीठ, नांदेड)
मी आणि पुणे विभागाचे विभागीय आयुक्त असलेले दीपक म्हैसेकर जुळे बंधू. दोघांचे प्राथमिक शिक्षण नांदेडमधील फुलेनगरातील जिजामाता प्राथमिक शाळेत झाले. या शाळेत असलेल्या देवळे मॅडम, घाडगे मॅडम आणि पोतदार मॅडम यांनी आम्हाला घडविले. यातही देवळे मॅडमनी विशेष लक्ष देऊन आम्हाला घडविले. माध्यमिक शिक्षण नांदेडातीलच पीपल्स हायस्कूल, शिवाजीनगर येथे झाले. या शाळेचे मुख्याध्यापक चक्रवार सर होते. उपमुख्याध्यापक असलेले पाठक सर एकदम कडक शिस्तीचे. नियम मोडलेले त्यांना अजिबात चालत नव्हते. त्यांचा प्रचंड दरारा होता. शाळेच्या आवारात कोणीही थांबत नसे. याशिवाय बाराळे सर, गणिताचे हांबर्डे सर, इंग्रजीचे साब्दे सरही आठवणीत आहेत. इतर शिक्षकांची नावे आज आठवत नाहीत. मात्र, सर्वांनीच अतिशय उत्तम पद्धतीने आम्हाला घडविण्यात, शिकविण्यात मोलाचे योगदान दिले. माझे वडील प्राचार्य, कुलगुरू राहिलेले. त्यांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले होते. त्यामुळे शिक्षिका असलेल्या आईनेच आमच्याकडे विशेष लक्ष दिले. वडिलांसह शिक्षकांनी अगोदर मातृभाषा शिकण्याचा आग्रह धरला. त्यानंतर आम्हाला इतर भाषांचा विचार करायला लावला. याचा परिणाम आज कुलगुरूपदापर्यंत पोहोचलो. हे सर्व प्राथमिक, माध्यमिकच्या शिक्षकांनी केलेल्या संस्कारांमुळेच झाले, हे नक्की.
प्रत्येक महिन्याला एक पोस्टकार्ड मिळायचे
- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
शालेय जीवनामध्ये अनेक धम्माल करणारी किस्से घडलेले आहेत. वडील पोलीस विभागात नोकरीला असल्यामुळे प्रत्येक वर्षी शाळा आणि गाव बदललेले असायचे. दहावीपर्यंतचे शिक्षण औसा, निलंगा, परांडा, लातूर, उपळा, उदगीर याठिकाणी झाले. पोलीस चाळीत राहत असल्यामुळे मुलगा बिघडू नये म्हणून शिक्षक प्रत्येक महिन्याला वडिलांना एक पोस्टकार्ड पाठवायचे. त्याची अभ्यासात प्रगती चांगली आहे. त्याच्या शिक्षणाची बंडाळ होऊ देऊ नका, असा निरोप असायचा. असे निस्सीम प्रेम शिक्षकांकडून मिळाले. यातूनच माझी जडणघडण झाली. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले. वडिलांच्या बदल्यांमुळे शाळा नियमितपणे बदलली जायची. प्राथमिक शिक्षणात गणिताचे शिक्षक आर. एन. खडप गुरुजी अतिशय कडक होते. चेहºयावरूनच गणित समजले की नाही ते ओळखायचे. घोटून घोटून शिकवायचे. याचा परिणाम मीसुद्धा माणसे ओळखायला शिकलो. इंग्रजीचे एस. ए. जाधवर प्रचंड करारी चेह-याचे होते. इंग्रजी अस्खलित बोलायचे. शेक्सपिअर त्यांच्या तोंडून झरतोय की काय, असे वाटायचे. आयुष्यात जे काम करावे, ते उत्तमच असावे, हे त्यांच्याकडूनच शिकलो. मराठीच्या शास्त्री मॅडम आणि गायकवाड सरांचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. गायकवाड सरांचे व्यक्तिमत्त्व भारी होते. सदैव शुभ्र धोतर, पांढरा शर्ट, टोपी या पोशाखातच असायचे. ºहस्व, दीर्घ, वेलांटी, उकार, अनुस्वार कधी, कुठे आणि कसे द्यावेत हे त्यांनीच शिकवले. विज्ञानाचे जोशी सर वेगळे व्यक्तिमत्त्व. अत्यंत विनोदी स्वभावाचे. शिकवताना विविध चुटके, समर्पक गोष्ट याची जोड देऊन शिकवत. अशा ज्ञानसमृद्ध शिक्षकांच्या शिकवणीमुळेच आम्ही घडलो.
समर्पित भावनेने ज्ञानदान करणारे शिक्षक
- डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत असताना शिक्षक हे समर्पित भावनेने ज्ञानदानाचे काम कारायचे. जे चांगले विद्यार्थी आहेत. अभ्यासात प्रगती आहे. त्या विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष द्यायचे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात उजनी येथे माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष द्यायचे. गावातच राहत असल्यामुळे घरी येऊन प्रगती, अधोगती सांगायचे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे घट्ट नाते होते. अध्यापन हे व्रत म्हणून करायचे. मुलांच्या भविष्याबद्दल शिक्षकांचा शब्द अंतिम होता. एवढेच काय गावातील कुटुंबात असलेल्या कलहात शिक्षकांचा शब्द अंतिम असे. शाळेचे मुख्याध्यापक रहेमान सर. मुलांना कंटाळा आला असे दिसताच ते थोरामोठ्याचे चरित्र, गोष्टी सांगायचे. यातूनच आमची जडणघडण झाली. माध्यमिकच्या शिक्षणात पाटील सर, जगताप सर, गव्हाणे गुरुजी, देवमानकर गुरुजी हे सगळे शिक्षक समर्पित भावनेने काम करत होते. गावात लाईट नव्हती. त्यामुळे आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील एक हॉल रिकामा करून दिला होता. यामध्ये आम्ही झोपत असू. तेव्हा पाटील गुरुजी पहाटे चार वाजता येऊन उठवत. नंतर सात वाजेपर्यंत आमचा अभ्यास चालायचा. अशा पद्धतीने शिक्षकांनी आम्हाला घडविले.
(शब्दांकन : राम शिनगारे )