प्रतिभास्वातंत्र्याचा सिद्धांत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 01:31 PM2017-12-18T13:31:14+5:302017-12-18T13:34:53+5:30
प्रासंगिक : अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेचे आंबेडकरी विचारवेध संमेलन आज दि. १७ डिसेंबर रोजी नांदेड येथे संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षीय बीजभाषणाचा हा संपादित अंश.
- डॉ. यशवंत मनोहर
बहिणींनो आणि भावांनो ! आपण सर्वच आजच्या काळाचे जबाबदार वाचक आहात. परिवर्तनाच्या चळवळीने हे डोळे आणि चिकित्सक मन आपणाला दिलेले आहे. आपण भारतातल्याही आणि जगातल्याही चिकित्सापंरपरेचे दायाद आहोत आणि जगभराच्या विज्ञाननिष्ठेचे वारसही आहोत. आपल्याला समाधानी होणे मान्य नाही. आपण कायम असमाधानी आहोत. आपल्याला आपली अस्वस्थता सर्जनशील करते. आपल्या भावनांना आणि विचारांना आपण कुठेही थांबू देत नाही. वाहतेपणाला आपण जीवन मानतो. थांबण्याला आपण मृत्यू मानतो. सर्वांच्या समान हिताच्या आजीविकेला आपण सम्यक मानतो. या सम्यकतेचा कधीही न मावळणारा दिवस आपल्या वाङ्मयीन वर्तनातून उगवावा यासाठी आपण कायम धडपडतो. माणसाच्या सन्मानाच्या प्रस्थापनेला आपण जबाबदारी मानतो. या जबाबदारीलाच आपण श्रेष्ठ नीतीही मानतो आणि सौंदर्यही मानतो. साहित्याच्या प्रारंभापासून सर्वत्रच आपल्याला वंचितांमधील साहित्यिकांचा हा आपलीच मरणे निर्माण करण्याचा आंधळा कार्यक्रम दिसतो. शासित, वंचित वर्गातील प्रतिभावंत त्यांना आणि त्यांच्या माणसांना मारणार्या शोषकांचे पोवाडे का लिहितात? पोवाडे म्हणजे प्रशंसा गीते! शोषकांचेच पोवाडे हे साहित्यिक लिहीत नाहीत तर या शोषकांच्या विचारसरणींचे आणि त्यांच्या संस्कृतीचे संवर्धन करीत राहतात. हे साहित्यिकच याप्रकारे आपल्या गुलामगिरीची जाहिरात आणि प्रचार-प्रसार करीत राहतात. स्वत:च्याच हाताने ते स्वत:चे मृत्यू निर्माण करीत राहतात. स्वत:च्याच सर्वनाशाची साहित्यिशास्त्रे आणि सौंदर्यशास्त्रे ते निर्माण करीत राहतात. हे साहित्यिक बदलायला तयार नसतात. आपण काय करतो आहोत हे त्यांना कळतच नसते. यांच्या प्रज्ञा आणि प्रतिभा मजूर असतात. आपल्या प्रज्ञांच्या आणि प्रतिभांच्या वेश्यांना त्यांनी सत्तास्वामींच्या सेवेसाठी बसवले असते. या वेश्या शोषक समाजाला हवे ते लिहितात. शोषक वर्गाची मर्जी सांभाळून काही मानसन्मानही पदरात पाडून घेतात.
शोषितांमधील प्रतिभावंतांनीही आपल्या प्रतिभांची माती करणेच असते. हा प्रतिभांच्या हत्यांचाच मुद्दा असतो. भीतीने, अज्ञानाने वा लोभाने आपल्या मानवी अस्तित्वाची आणि प्रतिभांचीही अशी हत्या केली जाते. ‘निसर्गत: मानव स्वतंत्र आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन ही स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे, निर्भय नागरिक व्हा. (प्रबुद्ध भारत : २१ जुलै १९५६) अशी स्वातंत्र्याची महती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली आहे.
मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य असते आणि मानवी जीवनाला हे स्वातंत्र्य समृद्ध करण्यामुळेच अर्थ प्राप्त होतो. मी स्वतंत्र आहे म्हणून मी माणूस आहे. त्याप्रमाणेच मी स्वतंत्र आहे म्हणून प्रतिभा आहे असे प्रत्येक माणसाला आणि प्रतिभेलाही म्हणता यायला हवे. आपल्याला निसर्गत: धुतल्या तांदळासारखे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याची हत्या करण्याच्या यंत्रणा समाजात कार्यरत आहेत आणि या नितळ-निर्मळ स्वातंत्र्याचे या यंत्रणा कलेवरांमध्ये रूपांतर करून टाकतात. मग शोषित वर्गातील माणसेही आणि प्रतिभाही मालकांच्या इशार्यावर नाचत असतात. माणसांनी कसे वागायचे आणि साहित्यिकांनी काय आणि कसे लिहायचे हे धर्माचे ठेकेदार आणि त्यांच्या इशार्यावर नाचणारे राजकारणी ठरवतात आणि हे कणा नसलेले रिकामटेकडे साहित्यिकही तसेच लिहून लोकप्रिय होतात. शतकानुशतके हेच चालले आहे. राजकीय सत्तेच्या दावणीला वाङ्मयीन सत्ता बांधली जाते. मग प्रतिभांना मेंढरांचा आकार, मेंढरांचा स्वभाव आणि मेंढरांचा मेलेला आवाज प्राप्त होतो. ही प्रतिभांची हत्याच असते.
प्रतिभा धर्मसत्तेच्या चालीने चालतात. प्रतिभा राजसत्तेच्या चालीने चालतात. प्रतिभांना आपल्या नैसर्गिक स्वातंत्र्याचाच विसर पडतो. प्रतिभा आपापल्या विहिरीतच भजनाचा कार्यक्रम रंगवतात. आपापल्या डबक्यातच उड्या मारण्यात (अॅथलेटिक्स) रंगून जाण्यात आनंद मानतात. या विहिरींमधील वा डबक्यांमधील आनंदाची सौंदर्यशास्त्रेही ते मांडत असतात. या प्रतिभांना भीतीची सवय होते आणि त्यांची स्वातंत्र्याची सवयच मरून जाते. या प्रतिभांना वाङ्मयीन वा राजकीय सत्तांच्यापुढे लाळ घोटण्याची सवय होते आणि बाणेदारपणा नावाची गोष्टच त्या विसरून जातात. त्यांचे कुत्र्यांच्या हलणार्या शेपट्यांमध्ये रूपांतर होते. अशा शेपट्या धर्मसत्तांना वा राजसत्तांना फारच आदरणीय वाटत असतात. या प्रतिभा उभ्या राहू शकत नाहीत. त्या चालू, धावू वा उडू शकत नाही. त्या फक्त यशस्वीपणे सरपटू मात्र शकतात.
प्रतिभा म्हणजे पर्यायी उजेड. समाजाच्या पावलांना योग्य दिशा दाखवत, विघातक असेल ते टाळण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करीत या उजेडाने चालायचे असते. काळाला आणि स्वतंत्र माणसाला आशय देत, त्याच्या वागण्या-बोलण्याला प्रज्ञानाने समृद्ध करीत आणि त्याच्या सर्जनाला सौंदर्याची नक्षत्रे प्रदान करीत चालायचे असते. प्रतिभेचे हे चारित्र्य आहे. प्रतिभेच्या असण्याचा हाच अर्थ आहे.
ज्यांच्याजवळ स्वतंत्र विचार असतात त्यांचेच विचारस्वातंत्र्य धोक्यात येते. धर्मसत्तेच्या आणि राजकीय सत्तेच्या ताटाखालची मांजरे होण्यात ज्यांना गौरव वाटतो त्यांचे विचारस्वातंत्र्य धोक्यात येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. धर्माच्या आणि शासनाच्या चक्रव्यूहाची मर्जी जपत लिहिणार्या साहित्यिकांच्या विचारस्वातंत्र्याची गळचेपी होणे शक्य नाही. ज्यांना गुलामी मान्यच असते वा आदरणीयच वाटते त्यांचे विचारस्वातंत्र्य कधीच धोक्यात येत नसते. ते तर अविचारस्वातंत्र्याचा आनंद लुटत असतात. ते शोषयंत्रणेचा अविभाज्य भाग झालेले असतात. त्यांचे धर्म वा राजसत्तेशी कधीच भांडण नसते. त्यांचे भांडण साक्षात स्वातंत्र्याशीच असते. कारण तेच खुद्द पारतंत्र्याचे प्रतिनिधी असतात. ते खुद्दच पारतंत्र्याचे प्रेषित असतात. त्यांना गुलाम करणार्या विचारव्यूहाचे ते भक्त असतात. म्हणून त्यांचे विचारस्वातंत्र्य धोक्यात येण्याचा प्रश्न उपस्थितच होत नाही.
महाराष्ट्रात, भारतात आणि जगातही हा संघर्ष आहे. शोषकांचे प्रवक्ते साहित्यिक आणि वंचितांचे प्रवक्ते साहित्यिक यांच्यात तो संघर्ष असतो. गुलाम प्रतिभा आणि स्वतंत्र प्रतिभा या दोन प्रतिभाछावण्यांमध्ये तो संघर्ष असतो. शोषकांच्या वैचारिक चक्रव्यूहाची भाटगिरी करणारे, सत्तेविषयी मौन बाळगणारे आणि शोषकांचा चक्रव्यूह उद्ध्वस्त करण्यासाठी निर्वाण मांडणारे साहित्यिक यांच्यात तो संघर्ष असतो. म्हणजे शोषकांचा वैचारिक चक्रव्यूह, या चक्रव्यूहाच्या संवर्धनाचे राजकारण आणि या चक्रव्यूहाचा गौरव करणारे साहित्यिक यांच्याविरुद्ध स्वतंत्र झालेल्या प्रतिभांचा हा संग्राम असतो.
नव्या लेखकांपुढे हे आव्हान आहे. आपण स्वतंत्र आहोत काय? आपण शोषकांनी निर्माण केलेल्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो आहोत काय? हे प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारले पाहिजेत आणि प्रथम त्यांनी आपल्या मनातील पारतंत्र्याशी लढाई सुरू केली पाहिजे. ते लिहितात म्हणजे त्यांच्यातील स्वतंत्र माणूस वा स्वतंत्र प्रतिभा लिहिते हे जगाला दिसले पाहिजे. त्यांनी शोषकांचा वैचारिक चक्रव्यूह उद्ध्वस्त केला आहे हे जगाला दिसले पाहिजे. ते लिहितात म्हणजे त्यांच्यातील मुक्त सौंदर्य लिहिते हे जगाला दिसले पाहिजे.
याचा अर्थ स्वतंत्र प्रतिभेची वा स्वतंत्र माणसाची रचना हा आपल्यापुढला प्रश्न आहे. परतंत्र माणसांनी आणि परतंत्र प्रतिभांनी जीवनाचेही अपार नुकसान केले आणि साहित्याचेही पंख कापले. खुज्या माणसांनी आणि खुज्या प्रतिभांनी खुजे साहित्यही जन्माला घातले आणि त्याची तरफदारी करणारे साहित्यशास्त्रही जन्माला घातले. अशा वाङ्मयीन धुक्यात आपले मित्र ओळखता येणे कठीण असते. आपण ज्यांना मित्र म्हणतो ते शोषकांच्या चक्रव्यूहाचीही पालखी वाहत असतात आणि आपल्याही मोर्चात वावरत असतात. असे निसरडे आणि धोक्याचे वातावरण आपल्या साहित्यविश्वात आजही आहे.
विज्ञाननिष्ठ, निरंतर पुनर्रचनाशील आणि शोषकांचा चक्रव्यूह उद्ध्वस्त करून सीमातीत झालेली माणसे आणि प्रतिभा आपल्याकडे किती आहेत? अशा माणसांची आणि प्रतिभांची एक वैज्ञानिक प्रयोगशाळा जगाजवळ आहे. या प्रयोगशाळेचे नाव आहे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’! विचार कुठे थांबत नाही. काळाला माणूसपण शिकविणारा विचार त्या त्या भौतिक संदर्भबंधात नवनव्याने जन्माला यायला हवा. प्रश्न नवा आणि उत्तर जुने असे चालणार नाही. कालबाह्य उत्तरे नव्या प्रश्नांवर मात करण्यासाठी उपयोगी पडणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक पिढीनेही स्वतंत्रपणे विचार करायला हवा. कोणीही मूलतत्त्ववादी होऊ नये आणि आपली मते पुढल्या पिढ्यांवर लादू नये. आपली तयार मते, निष्कर्ष वा उत्तरे स्वीकारणार्या पिढ्या जन्माला येणे हा आपलाही आणि मानवी बुद्धीचाही अवमान असतो हे प्रत्येकच तत्त्वज्ञानाला आणि विचार करणाराला वाटले पाहिजे. आपली तयार मते रिकाम्या डोक्याने वाहून नेणारी माणसे निर्माण होणे याहून वाईट गोष्ट कोणतीच नाही. त्यामुळे आपले विचार पुढे नेण्यापेक्षा आपला सदसद्विवेकाचा, चिकित्सेचा आणि सम्यकचिंतनाचा वारसा लोकांनी समृद्ध करावा. विज्ञान कुठे थांबत नाही. आपणही विज्ञानस्वभावी व्हावे. कुठे थांबू नये. विज्ञानाच्या, विचाराच्या वा साहित्यनिर्मितीच्या वाटेत अंतिम थांबा कुठेच नसावा. कारण या क्षेत्रात थांबणे हा शब्द मृत्यूचा समानार्थी शब्द असतो.
माणसाची प्रतिभा आणि माणसाची माणुसकी या गोष्टी अंतरिक्षासारख्या असाव्यात. त्यांना कोणत्याही सीमा नसाव्यात. म्हणजे माणसाचे मन सीमाभंजकच असावे. साहित्यिकांच्या प्रतिभा मर्यादाभंजकच असाव्यात. माणसाच्या माणुसकीला कोणत्या भिंती असू नयेत आणि साहित्यिकाच्या प्रतिभेला कोणती कुंपणे असू नयेत. माणसांनी आणि त्यांच्या प्रतिभांनी डबके, तलाव वा सागरही होऊ नये. कारण त्यांनाही किनारे असतात. चौकटींमधील कोणाचेही हितसंबंध खर्या प्रतिभेला मान्यच नसतात. सकलांचे समान हितसंबंध हाच प्रतिभेचा केंद्रविषय असतो. बाकी चौकटींना ही प्रतिभा माणुसकीच्या मार्गातील विघ्नांच्या रूपातच बघते. अशी प्रतिभा आणि असा माणूस बाबासाहेबांच्या सतत प्रयोगशील तत्त्वज्ञानाला हवा आहे. स्त्रियांच्या आणि कोणत्याही पुरुषांच्या मानवी प्रतिष्ठेला इजा पोहोचणार नाही असा समाज या तत्त्वज्ञानाला हवा आहे.
सतत क्रांतिकारी पुनर्रचना, कक्षाविहीन बंधुभाव आणि भगिनीभाव, मुक्तमनस्कता, संपूर्ण इहवाद, विचारात आणि वर्तमानात सतत प्रकाशत राहणारी सम्यकता, एक व्यक्ती-एक मूल्य उरात वागवणारा समाजवाद या गोष्टींनी फुलणारा आणि माणसालाच जीवनाचे परमसाध्य, परमसत्य आणि परमसौंदर्य मानणार्या असीम मनांचा समाज बाबासाहेबांच्या प्रयोगशील तत्त्वज्ञानाला हवा आहे. माणसाला असीम माणूस आणि सम्यक प्रतिभा करणारे, जगातले हे सर्वोत्तम जीवनविज्ञान आहे आणि सौंदर्यशास्त्रही आहे.
या जीवनविज्ञानाचे आणि सौंदर्यशास्त्राचे नाव बाबासाहेब आंबेडकर हेच आहे. बहिणींनो आणि भावांनो, नानाप्रकारच्या बेड्यांनी जखडलेल्या माणसाला आणि साहित्यिकांच्या प्रतिभेला मुक्त करण्याची गरज आणि त्यांच्या मुक्तीची एक दिशा मी सुचविली आहे. यापुढल्या काळात प्रत्येक माणसाच्या आणि साहित्यिकाच्या डोक्यात या स्वातंत्र्यसिद्धांताचाच ध्वज असावा असे मला नम्रपणे वाटते. धन्यवाद!