अनुत्तरित मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:22 PM2018-08-04T19:22:54+5:302018-08-04T19:23:24+5:30
दिवा लावू अंधारात : मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे नेहमीच चर्चेचा विषय असतो. काहींना त्या खोट्या वाटतात तर काहींना सरकारी मदत मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्येच्या केलेल्या खोट्या नोंदी वाटतात. काहींनी व्यसनाधीनतेत झालेल्या बरबादीमुळे लोक आत्महत्या करतात किंवा लग्नकार्यात ऐपतीपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे दिवाळखोरीत निघून आत्महत्या करतात, असेही मत नोंदवलेले आहे. शांतिवनचे काम करीत असताना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या प्रत्यक्ष घरभेटीत केलेल्या अभ्यासातून मात्र आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे यावर एकमत झाले आहे की, तत्कालीन कारण कुठलेही असो मात्र प्रत्येक शेतकऱ्याची आत्महत्या ही वेळोवेळी पडणारा दुष्काळ, सततची नापिकी आणि शेतमालाला मिळत नसलेला भाव यामुळे खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि त्यातून झालेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून झालेली आहे हे निर्विवाद सत्य आहे.
- दीपक नागरगोजे
वरकरणी मांडलेले मत आणि प्रत्यक्ष अनेक प्रकरणांचा अभ्यास करून मांडलेल्या मतात जमीन अस्मानाचा फरक असतो. मात्र, ते अभ्यासताना स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी जागी असावी लागते. गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव नावाचे गाव. या गावातील ही वेदनादायी कथा आहे. राधाकिसन जिजाभाऊ औटी नावाचे शेतकरी. सुशी वडगावातील आपल्या शेतात कुडाचे घर करून आपली पत्नी कांता आणि पूजा व अजित या दोन बछड्यांसोबत राहत होते. अवघी दीड एकर जिरायती जमीन यावर कसे भागणार म्हणून मिळेल ती मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा चरितार्थ कसाबसा भागवित. राधाकिसन औटींचा परिवार तसा लहानच; पण तुटपुंज्या उत्पन्नाची साधने त्याचीही भूक भागवू शकत नव्हती. दर दोन-तीन वर्षांनी पडणारा दुष्काळ आणि सततची नापिकी यामुळे शेती तर पिकायची नाहीच; पण इतर ठिकाणी रोजंदारीही मिळणे कठीण. अशा परिस्थितीत पोट भरण्यासाठी राधाकिसन आणि कांताबाईची धडपड म्हणजे खडकाला पाझर.
तरीही त्यांची धडपड सुरूच होती. कधी पोटभर खात तर कधी उपाशी पोटी झोपी जात त्यांची जगण्याची आणि जगवण्याची लढाई सुरू होती. अनेक अडचणींत नातेवाईकांच्या मदती मिळवण्यासाठी ते याचना करायचे; पण कुणी मदतीला यायचे नाही. शेतीत करावा लागणारा खर्च आणि रोजच्या अडचणी भागवताना घ्याव्या लागणाऱ्या कर्जाचा डोंगर वाढत होता. मुलगा अजित आणि मुलगी पूजा यांचाही रोजचा खर्च आणि शिक्षणाचा खर्च चालवताना प्रचंड ओढाताण होत असे. मुलांच्या खूप शिकण्याच्या इच्छा आहेत; पण त्यांना आपण परिस्थितीमुळे शिकवू शकतोल की नाही याची खात्री नाही याचे राधाकिसनला खूप वाईट वाटायचे. भाऊ ग्रामसेवक आहे. त्याची मुले हवे ते शिक्षण घेतात. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आपण मात्र आपल्या मुलांना चांगले काहीही देऊ शकत नाही याची सल होती.
ते एकटे एकटे राहायचे. मनातील वेदना चुकूनही कुणाला सांगायचे नाहीत. घरातही त्यांनी कधीच कुणाशी यावर चर्चा केली नाही. रोजच्या अडचणींचा सामना करतानाच सावकाराचाही तगादा सुरू होता. त्याचे व्याजही आपण देऊ शकत नाहीत, मुद्दल तर दूरच याचा त्यांना प्रचंड मानसिक त्रास होत होता. या सर्व परिस्थितीचा सामना करताना होणारा मनस्ताप विसरून जाण्यासाठी लोक व्यसनांचा आधार घेतात; पण राधाकिसनने त्यांच्या वेदना सहन केल्या. कधीही व्यसनांचा आधार घेतला नाही. आयुष्यभर कधीही कुणाला वाईट बोलले नाही; पण नियती इतकी वाईट असते की ती चांगल्या माणसांची उंची नेहमी संकटानेच मोजत असते. या परिवाराच्या आयुष्यात अशीच संकटं सातत्याने येत राहिली. ते संकटाशी झुंजत होते; पण संकटं पुरून उरत होती. काबाड कष्ट, दया, याचना, सर्व प्रयत्न करून झाले; पण कशाचाही उपयोग होत नव्हता.
इकडे मुलगी पूजा दहावीत होती. मोठी होत चाललेल्या मुलीचे लग्न हा मोठा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा. शिक्षण तर आपण करू शकत नाहीत मग लग्न तरी करून द्यायला हवे हा साधारण विचार घरात होऊ लागला. सहनशीलतेलाही काही सीमा असतात. जेव्हा परिस्थिती हातची बाहेर जाते आणि विचार करण्याची क्षमता जेव्हा समाप्त होते तेव्हा माणसाचा स्वत:वरील ताबा सुटतो आणि तो टोकाचा निर्णय घेतो.
२४ फेब्रुवारी २०१६ चा तो दिवस. कांताबाई गेवराईला बाजारानिमित्त गेल्या. बोरफडी येथे कांताबाईची बहीण राहते. पूजा आणि अजित यात्रेच्या निमित्ताने मावशीकडे गेले. आता घरी एकटे राधाकिसन. शेतातील कुडाच्या घरात त्यांच्या एकट्या मनाने भलतेच विचार करायला सुरुवात केली आणि शेवटी टोकाचा निर्णय घेतलाच. खुंटीला लटकावलेले दावे घेत ते जवळच्या विहिरीजवळ गेले. हातातील दाव्याने हात पाय घट्ट बांधले आणि सरकत सरकत जाऊन त्यांनी पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत स्वत:ला टाकून दिले. पोहता येत असल्यामुळे पाण्यात पडल्यावर आपण मारणार नाहीत. म्हणून पोहण्याचा मार्गही त्यांनी बंद करून टाकला होता. पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत राधाकिसनने जलसमाधी घेतली.
बाजार करून कांताबाई घरी परतल्या. स्वयंपाक करून जेवणासाठी राधाकिसन ाी वाट बघत बसल्या; पण बराच उशीर होऊनही ते घरी येत नाहीत म्हटल्यावर त्यांनी शेजारी राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली. गावात नातेवाईकांकडे चौकशी केली; पण कुठेच काही पत्ता लागत नव्हता. संपूर्ण रात्र लोक राधाकिसनला पाहत होते; पण कुठेही ते सापडत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी संशय आला. म्हणून पाच लोकांनी विहिरी तपासण्याचा निर्णय घेतला, तर घरच्याच विहिरीत पाण्यावर तरंगताना राधाकिसनचा मृतदेह दिसला. कांताबाई आणि लेकरांनी एकच टाहो फोडला. राधाकिसन जगण्याच्या लढाईतून माघार घेऊन निघून गेले होते.
दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात ही बातमी वाचून आम्ही सुशी वडगावात गेलो. राधाकिसनच्या घरातील ते विदारक चित्र पाहून कुणालाही अश्रू अनावर झाले असते. आम्ही चौकशी केली. सांत्वन केले. धीर दिला. जवळ बसलेल्या पूजाला विचारले तुला पुढे शिकायचेय का. ती हो म्हणाली. आम्ही विचार केला आणि तिला शिकवण्याचे ठरवले. पुण्यातील दिशा परिवार संस्था आणि शांतिवनची मदत तिला देण्याचा निर्णय केला. तिची बीड येथे शिक्षणाची व्यवस्था केली. आता पूजा संगणकशास्राच्या दुसऱ्या वर्षात आहे. ती खूप अभ्यास करतेय, शिकतेय. तिला संगणकशास्रात करिअर करायचेय. तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेय. तिच्यासाठी धडपड करणाऱ्या आईचा आधार व्हायचंय. ती भेटते तेव्हा म्हणते काका मी खूप शिकणार आहे. संस्थेच्या प्रत्येक रुपयाचा चांगला वापर करणार. शिकून मोठी होईन. चांगले काम करीन पैसे मिळविल आणि तेव्हा मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शांतिवनने जसा आधार दिला तसाच आधार मी माझ्या आयुष्यात माझ्यासारख्या दोन तरी मुलींना देईन. तिच्या या विचाराचा मला खूप आनंद वाटतो आणि अभिमानही; पण पुढे ती म्हणते की, ‘काका माझे हे यश पाहण्यासाठी माझे वडील असते तर...! काका ते वरतून पाहत असतील ना मला...?’ तिच्या या वाक्यावर मी नि:शब्द होऊन जातो...! अनुत्तरित मी... राहतो!
( deepshantiwan99@gmail.com)