बनावट दारु घेतेय् तारुण्याचा घोट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 09:57 PM2019-02-03T21:57:39+5:302019-02-03T21:58:04+5:30
जाळे कमी होण्याऐवजी अजूनच वाढ
राजेंद्र शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
विदेशी बनावटीचा देशी कट्टा आणि विदेशी बनावटीची देशी दारु यामुळे आता हळूहळू धुळे जिल्ह्याची ओळख बदलत चालली आहे. असा एकही महिना जात नाही की, त्यात पोलिसांनी देशी कट्टा पकडला नाही अथवा विदेशी बनावट दारुचा साठा जप्त केला नसेल. इतक्या पोलीस कारवाया होऊनही या धंद्याचे जाळे कमी होण्याऐवजी अजूनच वाढत चालले आहे.
अगोदर बनावट विदेशी दारु तयार करण्याचे कारखाने हे शिरपूर तालुक्यातील मध्यप्रदेशलगत असलेल्या सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात होते. त्याठिकाणी पोहचणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनाही मोठे कठीण झाले होते. आता मात्र हे मिनी कारखाने शिरपूर, धुळे शहरातही सुरु आहेत, हे गेल्या दोन वर्षात पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. म्हणजेच हे विदेशी बनावट दारुचे रॅकेट आता थेट आपल्या दारापर्यंत येऊन पोहचले आहे. शहरात सर्रासपणे भरवस्तीत हे कारखाने बिनबोभाट सुरु होते, हे पोलीस कारवाईने स्पष्ट झाले आहे. शिरपुरला एका धाडीत हा कारखाना घरात भूमिगत सुरु असल्याचे आढळून आले. म्हणजे पोलिसांची धाड पडली तरी लवकर ते त्यांच्या लक्षात येणार नाही, अशापद्धतीने व्यवस्था करण्यात आली होती. या धंद्यात पहिले शिरपूर तालुक्यातील डी गँग आणि धुळे तालुक्यातील दीनू डॉन हे दोनच डॉन होते. आता ते तुरुंगाची हवा खात आहे. तरीही हा धंदा कमी होण्याऐवजी वाढला आहे. कारण आता यात जिल्ह्यात ठिकठिकाणी व्हाईट कॉलरवाले ‘लोकल डॉन’ तयार झाले आहेत.
विदेशी बनावट दारुही इतकी हुबेहूब असते की, अगदी बाटलीच्या बुच पासून चवेपर्यंत सर्वच ‘सेम टू सेम’ असते. अगदी ओरीजनल दारु तयार करणाऱ्या कंपनीचा मालकसुद्धा बनावट दारु ओळखू शकणार नाही, एवढी काळजी ‘ती’ तयार करताना घेतली जाते. या दारुसाठी लागणारे स्पिरीटचे टँकरसुद्धा धुळयाच्या महामार्गावरुनच जातात. टँकरमधून स्पिरीटची हेराफेरी करुन त्याचा वापर नंतर बनावट दारु करण्यासाठी केला जातो. हे सर्व काम बिनबोभाट पद्धतीने करण्यासाठी जिल्ह्यात एक रॅकेट कार्यरत आहे, हे स्पष्ट आहे. यात सर्वच संबंधित विभागातील अधिकाºयांपासूनच सर्वच सामील आहेत. त्यात आता नवनवीन व्हाईट कॉलरचे लोकही जोडले जात आहेत. त्यामुळे हे सर्व अगदी व्यवस्थित दिवसाढवळया सर्वांच्या नाकावर टिच्चून सुरु असते. यासंदर्भात काही बोंबाबोंब होऊ नये म्हणून अधूनमधून स्पिरीटचे टँकर आणि बनावट दारुचे कारखाने उध्वस्त करण्याच्या कारवाया होत असतात. या कारवाईत पकडलेले टँकर चालक हे जामीनावर सुटतात आणि गायब होतात. तर स्पिरीटचे टँकर हे पोलिसात किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर वर्षानुवर्ष उभे असतात. ते सोडविण्यासाठी कोणीच येत नाही, आणि तपास थांबतो. तसेच काही ठिकाणी तर हा बनावट दारुचा साठा बेवारसच सापडतो. आणि जरी कोणी सापडला तर तो खºया मालकाचा ‘पंटर’ असतो. जो जामीनावर सुटतो आणि काही दिवस अथवा महिने बाहेर जाऊन अटकपूर्व जामीन मिळवून पुन्हा धुळ्यात येतो, असे अनेक किस्से या धंद्यातील लोक आणि खाकीतील लोक हे खाजगीत बोलतात. एकूणच हा धंदा ‘दिन दुगना रात चौगुना’ वाढतच आहे. धुळ्यात तयार होणारी बनावट दारु ही धुळ्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात पुरविली जाते.
आतापर्यंत झालेल्या पोलीस कारवाईत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की देशी कट्टा बाळगणाºयांमध्ये तरुण त्यातही महाविद्यालयीन तरुणांची संख्या जास्त आहे. तसेच शहरासह ग्रामीण भागात अगदी लहान - लहान गावातही आता बिअरबार आणि महामार्गावरील धाब्यावर लायसन्स नसतांना दारुची सर्रास विक्री होते आणि रात्री याठिकाणी दारुच्या पार्टया करणाºयांमध्येही तरुणांची संख्या जास्तच आहे. हे तरुण जी दारु पितात त्यात सुमारे ९० टक्के दारु ही तिचे लेबल जरी विदेशी असले तरी ती बनावट असते. म्हणजेच धुळ्यातीलच नव्हेतर राज्यात ज्या- ज्या ठिकाणी ही बनावट दारु विकली जात असेल. त्याठिकाणचे तरुण हे अजानतेपनी विषाचाच घोट घेत आहे. ते विष हळूहळू त्यांच्या शरीराला आतून पोखरुन टाकणार आहे. त्यामुळे या विदेशी बनावट दारुच्या धंद्याला धुळे जिल्ह्यातून समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी ज्या पद्धतीने जिल्ह्यात छुप्या पद्धतीने सुरु असलेली गांज्याची शेती उद्ध्वस्त केली त्याच पद्धतीने हा बनावट विदेशी दारुचा गोरख धंदाही समूळ नष्ट करावा, अशी सर्वसामान्य धुळेकरांची अपेक्षा आहे.