ताणतंट्याच्या जगात भारताचा परीक्षेचा काळ
By विजय दर्डा | Published: August 7, 2017 12:32 AM2017-08-07T00:32:35+5:302017-08-07T00:34:38+5:30
जगातील विविध देशांमध्ये आपसात तणाव असणे, हे काही नवे नाही. अनेक वेळा या तणावातून दोन देशांमध्ये लढायाही होतात. काही देशांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. बऱ्याच वेळा समेट आणि समझोत्याने हे भांडणतंटे मिटतातही. अशा तणावाच्या किरकोळ घटना वरच्यावर घडतच असतात.
जगातील विविध देशांमध्ये आपसात तणाव असणे, हे काही नवे नाही. अनेक वेळा या तणावातून दोन देशांमध्ये लढायाही होतात. काही देशांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. बऱ्याच वेळा समेट आणि समझोत्याने हे भांडणतंटे मिटतातही. अशा तणावाच्या किरकोळ घटना वरच्यावर घडतच असतात. पण संपूर्ण जगाने ज्याची दखल घ्यावी असे द्विपक्षीय तणाव-तंटे सध्या जेवढे सुरू आहेत तेवढे दुसऱ्या महायुद्धानंतर याआधी कधीही एकाच वेळी उद््भवले नव्हते. शक्तिशाली देशांमधील समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.
अमेरिका, रशिया व चीन हे तीन देश स्वत:ला महासत्ता म्हणून सिद्ध करण्याचा आटापिटा करीत असल्याने ही परिस्थिती प्रामुख्याने ओढवली आहे. सन १९९१ पूर्वी जगात अमेरिका व सोव्हिएत संघ या दोन महासत्ता होत्या. जग या दोन महासत्तांच्या प्रभावानुसार विभागलेले होते. त्यानंतर सोव्हिएत संघाचे विघटन झाले, पण त्यातून शिल्लक राहिलेल्या रशियाकडे महासत्ता म्हणावे एवढी शक्ती व प्रभाव उरलेला नव्हता. त्यामुळे जगात अमेरिका ही एकटीच महासत्ता शिल्लक राहिली होती. मात्र गेल्या काही वर्षांत व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशिया पुन्हा महासत्ता म्हणून उदयास येत आहे, तसेच चीनही एक मोठी शक्ती म्हणून जगाच्या राजकारणात उदयास येत आहे. त्यामुळे रशिया व चीन यांची महासत्ता होण्याची स्पर्धा सुरू आहे.
उत्तर कोरियासारखा एक छोटासा देश एकापाठोपाठ एक आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करीत आहे व अमेरिकेतील कोणत्याही शहराचा आपण क्षेपणास्त्राने विध्वंस करू शकतो, अशा वल्गनाही करीत आहे. हा एवढासा देश अमेरिकेला दटावतो यावरून त्याच्यामागे चीनचा छुपा हात आहे, हे उघड आहे. अमेरिकेला हात चोळत गप्प बसावे लागत आहे, कारण युद्ध झाले तर आपल्या छत्रछायेखालील दक्षिण कोरियाही या भडक्याने होरपळून निघेल याची जाणीव अमेरिकेस आहे. चीनलाही हे पथ्यावर पडणारे आहे. उत्तर कोरियाचा बागुलबुवा उभा करून दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचा हस्तक्षेप काहीही करून चीनला रोखायचा आहे. पण अमेरिका अशी किती काळ आणि कुठवर गप्प बसेल? याची शक्यता कमी आहे, कारण अमेरिकेला आपली ‘सुपरपॉवर’ची खुर्ची शाबूत ठेवायची आहे. त्यासाठी अमेरिका कोणत्याही थराला जाऊ शकते. अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यात युद्धाची ठिणगी पडणारच नाही, याची खात्री देता येत नाही. तशीच वेळ आली तर चीन काय करेल, हा खरा मोठा प्रश्न आहे.
चीन, रशियाने आणखी एक चाल खेळली आहे. ज्या ज्या देशांमध्ये अमेरिकेच्या विरोधातील सरकारे आहेत, तेथे या दोन्ही देशांनी आपली चांगली बस्ताने बसविली. सिरिया आणि इराणचे या दोन्ही देशांकडून केले जाणारे उघड समर्थन हे याचे ताजे उदाहरण आहे. अमेरिकेची इराणशी जुनी दुश्मनी आहे व सिरियात बशर अल असद यांना अमेरिकेस सत्तेवरून खाली खेचायचे आहे. रशिया व चीनने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका व त्यांच्या मित्रराष्ट्रांविरुद्ध हुशारीने केलेला नकाराधिकाराचा वापर हेही याचेच उदाहरण आहे. चीनने रशियाच्या हितासाठी सहावेळा नकाराधिकार वापरला. रशियाने ११ वेळा नकाराधिकार वापरला. सन २०१२ मध्ये सिरियाच्या विरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघात आलेले चार प्रस्ताव रोखण्यासाठीही चीन व रशियाने नकाराधिकार वापरला होता.
अमेरिकेला या नव्या युतीची कल्पना आहे व म्हणूनच अमेरिकेने भारताशी मैत्रीसाठी हात पुढे केला आहे व भारतानेही त्याला अपेक्षित प्रत्युत्तर दिले आहे. पण फक्त अमेरिकेच्या एवढे जवळ जाणे भारताच्या खरंच हिताचे ठरेल? मला असे वाटते की, रशियाची चीनशी जवळीक वाढत असली तरी तो भारताची साथ सोडणार नाही. भारत व रशिया हे दोन्ही देश पक्के मित्र असून त्यांच्या मैत्रीची पारख याआधी अनेक वेळा झालेली आहे. म्हणूनच ही दोस्ती आणखी घनिष्ट करण्याची गरज आहे. पं. नेहरूंनी अनुसरलेला अलिप्ततेचा मार्ग भारतासाठी आजही उपयुक्त आहे. आपल्याला रशियाशी मैत्री कायम ठेवत असतानाच अमेरिकेशीही दोस्ती करावी लागेल. यापैकी कोणाही एकाच्या गटात जाणे भारताला परवडणारे नाही. चीनने पाकिस्तानला पुरते कह्यात घेतले आहे. आपल्याला चारही बाजूंनी घेरण्याचा चीनचा प्रयत्न आहे. आपण रशियाच्या जवळ राहिलो तर आपल्याला त्रास देणे चीनला जरा कठीण जाईल. अमेरिकेशी दोस्ती तुलनेने नवी असल्याने त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवता येणार नाही. १९७१ च्या युद्धात फक्त रशियानेच आपल्याला साथ दिली होती, हे विसरून चालणार नाही. अलिप्ततेची महत्ता आणि रशियावरील विश्वास यामुळेच नेहरूंनंतर झालेल्या लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी या पंतप्रधानांनीही तेच धोरण कायम ठेवून रशियासोबत राहूनही भारताची वेगळी ओळख टिकवून ठेवली. आर्थिक आघाडीवर वेगाने प्रगती होत असल्याने भारतासाठी हा काळ फार महत्त्वाचा आहे. भारताने ‘सुपरपॉवर’ व्हावे असे अनेक देशांना वाटते व त्यासाठी ते भारताला साथही देत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे भारत लोकशाहीवादी देश आहे तर चीन व रशिया हे एकपक्षीय राजवटीचे वा हुकूमशाही देश आहेत. शिवाय भारत नेहमीच वैश्विक शांततेचा सच्चा समर्थक राहिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अमेरिका व रशिया यांच्यातील संबंध सुधारू शकतात, असे काही दिवस वाटले होते. पण लवकरच ही आशा फोल ठरली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रभावित करण्याचा रशियावर आरोप झाला आणि अमेरिकेच्या संसदेने रशियाविरुद्ध अनेक प्रतिबंध लादले. रशियानेही सातशेहून अधिक अमेरिकी राजनैतिक कर्मचाºयांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला. आता तर रशिया आमच्यासाठी खुले आव्हान ठरत असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश कर्टर यांनी उघडपणे बोलूनही दाखविले आहे.रशियाची आक्रमकता पाहून अमेरिकेच्या संरक्षण बजेटमध्ये युरोपसाठी चौपट रक्कम ठेवण्याचा प्रस्ताव केला जाईल, असेही कार्टर म्हणाले. सध्या ही रक्कम ७८ कोटी ९० लाख डॉलर आहे. ती ३.४ अब्ज डॉलर एवढी वाढविली जाईल. म्हणजेच युद्धाची चाहुल अमेरिकेसही लागली आहे. तसे तर युद्धाचे सावट आपल्या येथेही आहे. चीन व पाकिस्तानचे एकत्र येणे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. पाकिस्तान आपल्याविरुद्ध गेली कित्येक वर्षे छुपे युद्ध खेळत आहे. आता चीनही आपल्याला धमक्या देऊ लागला आहे. पाकिस्तानशी एखादे युद्ध झाले की भारत कमजोर होईल, असेही चीनचे गणित आहे. आपल्या परराष्ट्र व संरक्षण धोरणाच्या दृष्टीने हा काळ बिकट आहे. आपण जागरूक राहणे गरजेचे आहे!
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
पृथ्वीवरील महासागर आणि जंगले एका वर्षात जेवढा कार्बनडाय आॅक्साईड शोषून घेऊ शकतात ती मर्यादा जगाने यंदा २ आॅगस्टलाच ओलांडली, हे वाचून मी हैराण झालो. म्हणजे यानंतर केले जाणारे कार्बनडाय आॅक्साईडचे उत्सर्जन पृथ्वीच्या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये वजावट करणारे ठरणार आहे. आकडेवारी असेही सांगते की, साधनसंपत्तीचा वापर असाच सुरू राहिला तर आपल्याला एक पृथ्वी पुरणार नाही तर आपल्याला १.७ पृथ्वी लागतील! आहे ती पृथ्वी मोठी होणे शक्य नाही व नवी पृथ्वी मिळणेही अशक्य आहे. त्यामुळे आहे तीच पृथ्वी भावी पिढ्यांसाठीही शिल्लक राहील अशाप्रकारे विवेकाने वापरणे हेच शहाणपणाचे आहे!