या पापाचरणाला शिक्षा कोणती ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:48 AM2017-08-07T00:48:22+5:302017-08-07T00:48:32+5:30
मध्य प्रदेशातील बडवानी या नर्मदातीरावरील राजघाटावर असलेली राष्ट्रपिता म. गांधी, कस्तुरबा आणि त्यांनी आपला मुलगा मानलेले त्यांचे सचिव महादेवभाई देसाई या तिघांचीही समाधी स्थाने दि. २७ जुलै २०१७ या दिवशी रात्रीच्या अंधारात जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने तेथील सरकारने उखडून टाकली आहेत.
मध्य प्रदेशातील बडवानी या नर्मदातीरावरील राजघाटावर असलेली राष्ट्रपिता म. गांधी, कस्तुरबा आणि त्यांनी आपला मुलगा मानलेले त्यांचे सचिव महादेवभाई देसाई या तिघांचीही समाधी स्थाने दि. २७ जुलै २०१७ या दिवशी रात्रीच्या अंधारात जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने तेथील सरकारने उखडून टाकली आहेत. ती उखडताना गांधीजींच्या समाधीतील अस्थिकलश त्या सरकारने अज्ञातस्थळी हलविला आहे. इतरांच्या अस्थींचे काय झाले ते अद्याप कुणाला कळले नाही. हे समाधीस्थळ नर्मदा धरणाच्या बुडित क्षेत्रात येते हे त्या सरकारचे समर्थन कुणालाही मान्य होणारे नाही. तसे ते असते तर सरकारने त्यासाठी त्या परिसरातील जनतेला विश्वासात घेतले असते. सरकारच्या त्या दुष्कृत्याविरुद्ध संतापलेल्या लोकांनी त्याच ठिकाणी बापूंचे छायाचित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्रासह ठेवून त्यांची श्रद्धापूर्वक पूजा सुरू केली आहे. एका महात्म्याचे समाधीस्थळ जेसीबी यंत्राच्या साहाय्याने रात्रीच्या अंधारात नाहिसे करण्याचे मध्य प्रदेश सरकारचे हे कृत्य केवळ अपराधात जमा होणारे नसून पाप ठरणारे आहे. काही काळापूर्वी काबूलजवळ असलेल्या बामियान बुद्धाच्या दोन प्रचंड उंचीच्या मूर्ती त्यावर तोफा डागून तालिबानी अतिरेक्यांनी जमीनदोस्त केल्या. त्यांच्या त्या पापाची आठवण करून देणारे मध्य प्रदेश सरकारचे आताचे हे दुष्कृत्य आहे. गांधीजी, कस्तुरबा किंवा महादेवभाई ही देशाची श्रद्धास्थाने आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या अभूतपूर्व लोकलढ्याचे ते नेते आहेत. त्यांच्या स्मृती कमालीच्या पूज्यबुद्धीने जोपासणे ही सरकारची सांस्कृतिकच नव्हे तर शासकीय जबाबदारीही आहे. या देशातील अनेक कुटुंबात गांधीजींची त्यांना ईश्वर मानून पूजा होते हे वास्तव सरकारला कळावे असेही आहे. मात्र गांधीजी, त्यांच्या नेतृत्वात झालेला स्वातंत्र्यलढा आणि त्यांनी जागविलेली मानवी मूल्ये या साºयांचा या देशाला विसर पाडण्याच्या संकुचित मनोवृत्तीची माणसे सत्तेवर आली की याहून काही वेगळे व्हायचे असते. आपल्या कृत्याचा या देशाला पत्ताही लागू न देण्याचा मध्य प्रदेश सरकारचा प्रयत्न, त्या घटनेचे वृत्त एकाही वाहिनीवर वा वृत्तपत्रात येऊ न देण्याच्या त्यांच्या दहशतीने साऱ्यांच्या लक्षात आणून दिले आहे. लहान-सहान गोष्टींच्या मोठ्या बातम्या बनविणारी आपली माध्यमे प्रत्यक्ष म. गांधींच्या समाधीचा विध्वंस दडवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतील तर मध्य प्रदेश सरकारच्या पापात ही माध्यमेही सहभागी आहेत असे म्हटले पाहिजे. इतिहासात मूर्तीभंजकांच्या कथा फार आहेत. भारतावर केलेल्या प्रत्येक आक्रमणात मुसलमान सत्ताधाऱ्यांनी या देशात केलेले मूर्तीभंजन आजही आपल्या अंगावर शहारे आणणारे आहे. आताची सरकारे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात समाधान मानणारी असतील तर त्यांचा समावेशही त्या ऐतिहासिक अपकृत्ये करणाऱ्यांत करावा लागेल. कर्नाटकात मुसलमानांची सहाशे पूजास्थाने, गुजरातमध्ये त्या धर्माच्या सातशे मशिदी आणि ओरिसात ख्रिश्चनांची बाराशे पूजास्थाने उद्ध्वस्त करण्याचा गेल्या काही वर्षात झालेला धार्मिक उत्पात या बाबी धर्मश्रद्धेने आंधळेपणा स्वीकारला की तिचे कडवेपण सारखेच हिंस्र होते हे सांगणाऱ्यां आहेत. मात्र धार्मिक तेढ वेगळी आणि वैचारिक दुरावा वेगळा. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांचे भाजप सरकार संघ परिवाराचे आहे. हा परिवार आपल्या प्रात:स्मरणात गांधीजींचे नाव घेतो आणि मग सारा दिवस त्यांची नालस्ती करण्यात घालवितो. ज्याच्या प्रेरणेने भारतातीलच नव्हे तर जगाच्या अनेक देशातील जनतेने त्यांच्या स्वातंत्र्याचे लढे लढविले त्या महापुरुषाची ज्या विचारसरणीने याच देशात गोळ्या घालून हत्या केली ती विचारसरणी शिरोधार्ह मानणारा हा परिवार व त्याचे हे सरकार आहे. त्याच्याकडून गांधीजींचा गौरव होईल अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थही नाही. मात्र भारत हा गांधीजींच्या प्रयत्नाने झालेला लोकशाही देश आहे आणि त्यात मतभेदांना प्रामाण्य आहे. येथे प्रत्येक पक्षालाच नव्हे तर व्यक्तीलाही आपले मत बनविण्याचा व मांडण्याचा हक्क आहे. विचाराला विचाराने उत्तर द्यायचे ही लोकशाहीची शिकवण आहे. आपल्याला मान्य न होणाºया महापुरुषांच्या समाध्या उखडून टाकणे हा लोकशाहीतच नव्हे तर अलीकडच्या हुकूमशाहीतही न बसणारा पाशवी प्रकार आहे. ज्या विचाराने गांधीजींना सारी हयात छळले, ज्याने जातांनाही त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या आणि जो त्यांच्या पश्चात त्यांच्या समाधीवरही हल्ला करतो त्याच्या कडवेपणाला या पाशवी वृत्तीची जोड आहे असेच म्हटले पाहिजे. प्रत्येकच लहानसहान अपराधाला या देशाच्या कायद्याने शिक्षा सांगितली आहे. मध्य प्रदेश सरकारचा अपराध मात्र कायद्याने सांगितलेल्या कोणत्याही शिक्षेहून मोठ्या शिक्षेला पात्र व्हावा असा आहे. अशा शिक्षा न्यायालये देत नाहीत आणि पोलीसही त्यांच्या नोकरीमुळे या गुन्हेगारीत सामीलच असतात. त्यातून ही शिक्षा सरकारला करायची असल्यामुळे जनतेने न्यायाधीश म्हणून संघटितरीत्या पुढे येणे गरजेचे आहे. ज्याला प्रायश्चित्तही असणार नाही असे हे पाप आहे आणि ते कुणा एका व्यक्तीने केले नसून सरकारने ते केले आहे. सबब या पापाचे स्वरूप अराष्ट्रीय म्हणावे अशा पातळीवर जाणारे व त्यासाठी ते तेवढीच शिक्षा मागणारेही आहे.