कोल्हापूरचे पर्यावरणगुरु अनिलराज जगदाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 02:48 PM2021-08-02T14:48:58+5:302021-08-02T14:51:33+5:30
Environment Kolhapur : प्राध्यापक डॉक्टर अनिलराज जगदाळे सरांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सर्वांच्यावतीने सरांचा फेटा, शाल, हार, फुलं आणि वेखंडाचे रोप देऊन अनोखा सत्कार केला आहे. सरांना उत्तमोत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभो या शुभेच्छा आणि त्यांच्या कार्यास मानवंदना.
प्राध्यापक डॉक्टर अनिलराज जगदाळे गोपाळकृष्ण गोखले कॉलेज येथून निवृत्त झाले. भूशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. शिवाजी विद्यापीठाच्या भूशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे आणि प्रौढ व निरंतर शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
कोल्हापूरच्यापर्यावरण चळवळीला त्यांनी एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी सुरू केलेल्या विविध संस्थांमधून उत्तम उत्तम कार्यकर्ते निर्माण झाले. आणि त्यांनी कोल्हापूरचीपर्यावरण जपण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. द एन्व्हायरमेंटल असोसिएशन कोल्हापूर तसेच टीक नेचर क्लब या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. आज या संस्थांसाठी ते सल्लागाराचे काम पाहत आहेत.
व्यक्तिमत्व विकास, मानव संसाधन विकास आणि व्यवस्थापन यावर त्यांनी संशोधनात्मक अभ्यास केला आणि पुढे या क्षेत्रात त्यांनी आपले विविध प्रयोग केले. शिबिराच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. अनेक औद्योगिक ,शैक्षणिक आणि वृत्तपत्र संस्था यांनी त्यांच्या शिबिरांचे आयोजन पार पाडले.
युपीएससी ,एमपीएससी किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. यातूनच काही विद्यार्थी पीएसआय, आयपीएस ,आयएएस झाले आहेत. सर्व विद्यार्थी नेहमीच त्यांच्या संपर्कात असतात.
अजूनही एखाद्या विषयावरील चर्चेसाठी ते सरांशी आवर्जून संवाद साधतात आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याचे नमूद करतात. कोणताही विषय असो त्याच्या मुळाशी जाणे आणि सखोल अभ्यासाअंती त्या विषयावर मार्गदर्शन करणे हा त्यांचा पिंड आहे.
अशाच अभ्यासातून त्यांनी जिओ टूर्स ही संपूर्णतः वेगळी अशी संकल्पना मांडली. सर्वसामान्यांना भूशास्त्रीय दृष्टिकोन प्राप्त व्हावा आणि एकूणच याबाबतीत सकारात्मक पावले उचलली जावीत हा या सहली मागचा उद्देश होता .
वीस वर्षांपूर्वी कागल तालुक्यातील एकोंडी या गावी त्यांनी चालू केले प्रकल्प आजही ग्रामस्थ राबवित आहेत हे त्यांच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य. जगदाळे सरांनी अनेक प्रथितयश वर्तमानपत्रातून लेखमाला लिहिल्या आहेत. पुस्तकांचे लिखाण केले आहे .भूशास्त्र विषयावरील त्यांचे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. या पुस्तकात केवळ माहिती न लिहिता त्यासोबत त्यांनी फोटोग्राफ् दिलेले आहेत. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
भूशास्त्र विषयातील जाणकारांसाठी,विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे पुस्तक संदर्भ पुस्तक ठरेल यात वाद नाही. सरांचे पाण्यासंदर्भातील कार्यही बोलके आहे. वसुंधरा पाणी परिषदेच्या माध्यमातून समन्वय पाणी वाटप आणि जलसाक्षरता अभियानाची मुहूर्तमेढ त्याने रोवली आणि ती यशस्वीही करून दाखविले.
व्याख्याने, चर्चा, पोस्टर्स, स्लाईड शो, ट्रेक ,खेळ पथनाट्य, सहली अशा अनेक विविध माध्यमांचा वापर करत सरांनी विद्यार्थ्यांना, निसर्गप्रेमींना घडविले. त्यांच्यात नेतृत्व, व्यवस्थापन, सामाजिक भान आणि समूह जीवनाचे कौशल्य वाढीस लावले. यामुळेच अनेक वर्षे लोटली तरी त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत.
काही गाजावाजा न करता माणूस घडवण्याच्या त्यांच्या कार्यामुळे विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड असतील, निसर्ग मित्रचे अनिल चौगुले असतील, राज्य मंडळचे सदस्य सुहास वायंगणकर असतील किंवा मुंबई विद्यापीठाच्या विभाग प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या अंबुजा साळगावकर असतील, विनीत फडणीस, शिवाजी कचरे असतील, सरांनी घडवलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात आपली छाप पाडत आहेत.
सरांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सर्वांच्यावतीने सरांचा फेटा, शाल, हार, फुलं आणि वेखंडाचे रोप देऊन अनोखा सत्कार केला आहे. सरांना उत्तमोत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभो या शुभेच्छा आणि त्यांच्या कार्यास मानवंदना.
-- प्रशांत पितालिया