Environment Day Special : पर्यावरणातील बदल, आव्हानांना सामोरे जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 02:01 PM2020-06-05T14:01:21+5:302020-06-05T14:04:52+5:30
वाढते औद्योगिकीकरण, प्रदूषण तसेच हवामानातील बदल यांमुळे सध्या जगाला पाण्याची कमतरता, दुष्काळ, महापूर तसेच स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठ्याचा अभाव यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
वाढते औद्योगिकीकरण, प्रदूषण तसेच हवामानातील बदल यांमुळे सध्या जगाला पाण्याची कमतरता, दुष्काळ, महापूर तसेच स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठ्याचा अभाव यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
पर्यावरण बदलामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेती उत्पादन घटत आहे. आपल्याकडे पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे थोडेसे नियोजन न केल्यामुळे ६० कोटी भारतीयांना तीव्र पाणीटंचाई भोगावी लागते आहे. पाण्याविना किंवा दूषित पाण्यामुळे दरवर्षी दोन लाख लोकांचा मृत्यू होतो.
प्रदूषण, जंगलांचे घटते प्रमाण व वाढते शहरीकरण (सिमेंटच्या इमारतींचे जंगल) यांमुळे तापमानातील वाढ अपरिवर्तनीय आहे. यापुढे शहरांचे तापमान दरवर्षी वाढतच राहणार आहे. भारतातील उष्णतेच्या लाटांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. उष्ण लाटेमुळे किंवा अधिक कमाल तापमानामुळे मानवाच्या आरोग्य, स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतात. जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपासून वाढून ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
हवामानातील बदलामुळे ऋतुचक्रामध्येदेखील बदल होताना दिसत आहेत. हवामान बदलामुळे कधी अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी, उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळ, वादळे तसेच गारपिटीसह अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा आपल्याला सामना करावा लागतो. हवेच्या प्रदूषणामुळे तर कधी-कधी आम्लयुक्त पाऊस (अॅसिड रेन) पडतो.
सन २०१९ मध्ये १ ते १२ ऑगस्ट २0१९ दरम्यान झालेल्या सततच्या जोरदार पावसामुळे राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापूर आला. त्यामुळे जीवहानीबरोबरच उभ्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले. तसेच २0१९ मध्ये पाऊस लांबल्यामुळे (नोव्हेंबरचा पहिला आठवडा) द्राक्ष हंगाम (छाटणी) उशिरा झाली. तसेच ऑक्टोबर व नोव्हेंबर २0१९ मध्ये रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा (२० अंशांपेक्षा जास्त) राहिल्यामुळे काजू आणि आंब्यांची फलधारणा उशिरा झाली.
ढगात हवामान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमी राहिल्यामुळे या वर्षी कोल्हापूरमध्ये हिवाळ्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. त्यामुळे या वर्षी जास्त थंडी जाणवली नाही.
उत्तरेकडून येणारे थंड कोरडे वारे व बंगालच्या खाडीकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा संगम ज्या भागावर होतो, त्या भागात अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडतो. फेब्रुवारी, मार्चमध्ये यामुळे कधी-कधी मराठवाडा, विदर्भात गारपिटीसह वादळी पाऊस व वीजदेखील पडते.
हवामान किंवा पर्यावरण बदल यांना अनेक मानवनिर्मित गोष्टी कारणीभूत आहेत. नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक विकास करणे ही वैयक्तिक किंवा एखाद्या संस्था, संघटनेची जबाबदारी नसून ती एक सामूहिक जबाबदारी आहे.
- का. गो. कानडे,
हवामानशास्त्रज्ञ, कोल्हापूर.