Ganpati Festival-अमेरिकेतील गणेशोत्सव - काल, आज आणि उद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:26 PM2019-09-08T12:26:53+5:302019-09-08T12:31:51+5:30

गेल्या चार पाच दशकात मराठी समाज नोकरी-धंद्यानिमित्त जगभरातील अनेक देशात स्थायिक झाला आहे आणि त्याबरोबर गणेशोत्सवही त्या देशात पोचला आहे असे ठामपणे म्हणता येईल.

Ganesh Festival in the United States - yesterday, today and tomorrow | Ganpati Festival-अमेरिकेतील गणेशोत्सव - काल, आज आणि उद्या

Ganpati Festival-अमेरिकेतील गणेशोत्सव - काल, आज आणि उद्या

googlenewsNext
ठळक मुद्देकाल, आज आणि उद्याअमेरिकेतील गणेशोत्सव

मनुष्यप्राणी - मग तो कोणत्याही धमार्चा असो - लहानपणी झालेले संस्कार, तो मोठेपणी जगात कोठेही गेला तरी बरोबर त्या आठवणींचं गाठोड घेऊनच जात असतो. मराठी माणूस आणि त्याच्या घरच्या गणेशोत्सवाच्या आठवणी याबद्दल असंच म्हणता येईल.

गेल्या चार पाच दशकात मराठी समाज नोकरी-धंद्यानिमित्त जगभरातील अनेक देशात स्थायिक झाला आहे आणि त्याबरोबर गणेशोत्सवही त्या देशात पोचला आहे असे ठामपणे म्हणता येईल.

१९६०-७० च्या दशकात मराठी लोक उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील विद्यापीठात येऊ लागले. एवढ्या दूरवर येउनसुद्धा घरची ओढ आणि आठवणी येतच राहिल्या, सणासुदीला तर अधिकच. त्यातून मार्ग काढण्यासाठी गणपतीच्या दिवसात कुणाच्या तरी घरी गणपती बसू लागला. एखादा विद्यार्थी सपत्निक आला असला तर जेवणाखाण्याची सोय व्हावी म्हणून अशा दांपत्यांच्या घरी गणपती बसू लागले.

विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली तशी इंडियन स्टुडंट्स अससोसिएशन्स स्थापन होउ लागली. आणि त्यातूनच पुढे मराठी मंडळे आकार घेऊ लागली. १९६९ साली अमेरिकेतील पहिले मराठी मंडळ शिकागोत स्थापन झाले. गणपती उत्सवाने सर्वच नविन मंडळांचा शुभारंभ होत राहिला आणि अजूनही होत आहे.

अगदी भारतातील घरच्यासारख्या सर्व गोष्टी येथील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवात करण्याची प्रबळ इच्छा असली तरी साधनांचा आणि मनुष्यबळाचा अभाव जाणून घेऊन जमेल तसा उत्सव करण्याचा प्रयत्न त्याकाळी झाला. शार्लट अर्थातच त्या पिढीने भारतात पाहिलेले गणेशौत्सव साधेपणाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिपूर्ण होते तसेच अमेरिकेत व्हावेत हा प्रयत्न होता.

न्यू जर्सीच्या डॉ. घाणेकर दांपत्याने त्या काळात सुरू केलेला घरगुती गणेशोत्सव आता सार्वजनिक झाला असला तरी त्याचे स्वरूप अजूनही साधे आणि सुसंस्कृत राहिले आहे हा विशेष. १९७३ सालापासून डॉक्टर गीता आणि रमेश घाणेकर हे स्वत: गणेश मूर्ती घरीच हातानी बनवतात. मॉडेलिंग क्लेचा वापर करून हि मूर्ती बनवली जाते. विसर्जन मात्र घरीच केले जाते .

१९७० च्या दशकात महाराष्ट्रात गणपती उत्सवात राजकारणी आणि उद्योजक पडले आणि गणेशोत्सवाचे रूप एकदम पालटले. मतदारांना खूष करण्याच्या अनेक युक्त्यांमध्ये गणेश उत्सवाचे फेस्टिव्हल करण्यात आले. पूर्वी तालीम संघाचे गणेश उत्सव असत त्याची जागा प्रत्येक मतदार संघातील राजकीय दादांनी घेतली.

गणपती उत्सवाचे खर्च निभावण्यासाठी उद्योजकांच्या कमानी उभारल्या जाऊ लागल्या. जेवढा जास्त आवाज, तेवढा गणपती उत्सव चांगला अशा समजूतीने ढोल ताशांच्या मिरवणूकींपासून डिजेंच्या कर्णकर्कश्श गाण्यांपर्यंत मजल गेली. घराघरात गणपती बसवण्याची स्पर्धा चालू झाली. सध्याची अमेरिकेतील तरूण मराठी पिढी ही मराठी मंडळे चालवीत आहेत, ती त्या वातावरणात वाढलेली आहेत आणि त्याचे प्रतिबिंब येथे साजऱ्या होणाºया उत्सवात दिसत आहे.

गणपती उत्सवाचे मूळ उद्दीष्ट आणि आता होणारा उत्सव (भारत अथवा अमेरिका) यात जमीन अस्मानाचा फरक आहे. काही अपवाद नाकारता येणार नाहीत. फक्त मराठी लोकांचा गणेश उत्सव न करता सर्व भारतीयांना एकत्र घेऊन उत्सव करण्याची प्रथा अमेरिकेतील काही मंडळे करीत आहेत आणि ते स्तुत्य आहे.

गणपतींची संख्या महाराष्ट्रात वाढत गेली, तसे त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. नद्या, विहीरी, नाले, ओढे आटत गेले आणि विसर्जनासाठी गणपतींची संख्या वाढत गेली. आवाजाचे प्रदूषण आणि प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणपती मूर्तींचे विसर्जन आणि त्यामुळे पाण्याचे प्रदुषण या प्रश्नांनी डोके वर काढले आणि आता प्रदूषण होणार नाही अशा गणपती मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या.

अमेरिकेत पाण्याची वानवा नाही पण गणपतीची मूर्तीच काय पण इतर कशानेही प्रदूषण होणार नाही यासाठी कायदे आहेत आणि ते नागरिक पाळत आहेत, म्हणून येथे सुरवातीपासूनच मराठी मंडळे विसर्जन करताना रितसर परवानग्या घेत आहेत आणि प्लास्टर आॅफ पॅरिस आणि पाण्यात प्रदूषण होणारे घटक सोडून इतर साहित्यांनी गणपती मूर्ती बनवत आहेत अथवा नुसत्या तसबीरीची अथवा धातूच्या मूर्तीची पूजा केली जात आहे.

थोडक्यात जोपर्यंत भारतीयांची नविन पिढी अमेरिकेत स्थायिक होत राहिल, तोपर्यंत भारतीय सण येथे उत्साहाने आणि भारतीय पद्धतीने साजरे होत राहणार. त्या सणांचा अर्थ काय आणि ते कशा प्रकारे साजरे व्हावेत याचे उत्तर मात्र त्या त्या पिढीने द्यायचे आहे.

- मोहन रानडे,
फिलाडेलफिया, अमेरिका

Web Title: Ganesh Festival in the United States - yesterday, today and tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.