Dil-e-Nadaan: मधु-चंद्राचं प्रेम अन् ग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 06:14 PM2018-05-22T18:14:35+5:302018-05-22T18:14:35+5:30
प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी प्रेमकथांचं टवटवीत सदर... 'दिल-ए-नादान'! :)
कौस्तुभ केळकर नगरवाला.
नुकतंच लग्न झालेलं.
हवेत तरंगायचे दिवस.
अनावर ओढ वाटायची एकमेकांची.
हवाहवासा वाटणारा तिचा सहवास.
क्षणभरही दुरावा सहन व्हायचा नाही.
त्याचं नाव चंद्रशेखर.
अन् तिचं नाव मधुमिता.
अगदी मधु -चंद्राची जोडी.
परमेश्वरा,
आनंदी सहजीवनाचा हा मधुचंद्र, आयुष्यभर चालत रहावा.
कुणाची नजर न लागो.
तो एकुलता एक.
त्याचे आई बाबा आणि ती दोघं.
मोठ्ठं घर होतं त्यांचं.
अगदी गच्चीसकट.
तीही एकुलती एक.
लग्नाआधी दोन महिने तिचे बाबा अचानक गेलेले.
आता आई एकटी.
तिच्या बाबांची खूप इच्छा.
लग्न सुखरूप पार पडावं.
म्हणून तारीख पुढं ढकलली नाही एवढंच.
चालायचंच.
त्याची नेहमीची सवय.
जेवणं झाली की ती दोघं गच्चीत जायची.
पिसोरी वारा.
चंद्राचा डीमलाईट.
आणि शेजारची त्याची ड्रीमगर्ल.
कधी पुनवेचा तो बिल्लोरी चंद्रमा.
नाहीतर आवसेचा मंदधुंद चांदणचुरा.
त्या दोघांना काहीच फरक पडायचा नाही.
हातात हात आणि तिची साथ.
तो हरवून जायचा.
हरखून जायचा.
शब्दफुलांची उधळण आणि प्रेमाचे गजरे.
तासाभरानं झुलत दोघं खाली यायची.
दिवसच तसे होते.
झोपाळ्यावाचून झुलायचे.
दोन एक महिने झाले असतील लग्नाला.
पाहणाऱ्याला वाटावं,
यांचा जनम जनम का साथ है !
जीवापाड जपायची एकमेकांना.
अशीच एक रात्र.
नेहमीप्रमाणे दोघं गच्चीत.
तिला त्याला काही तरी सांगायचंय.
कधीपासून वाट बघतेय ती.
ती हलकेच त्याच्याशी कानगोष्टी करत्येय.
तो ऐकतो.
आनंदी खिंकाळतो.
ज्वालामुखीसारखा उधळतो.
आनंदाचा लाव्हा त्याचं अवघं विश्व व्यापून टाकतो.
तो बाप होणार असतो.
बेफाम होऊन तो तिला उचलतो.
गिरकी घुमेर नाचतो.
अरे, हलके हलके..
काय हे?
कुणीतरी बघेल.
'बघू देत...'
'कोण बघणार ?
तो आकाशातला चंद्र ?
चांगला मित्र आहे माझा.'
तो सहज आकाशाकडे बघतो.
त्याच्या त्या मित्राला ,
कुणाची तरी नजर लागलेली.
कुठली तरी अभद्र सावली.
त्याच्या प्रकाशाला गिळू पाहणारी.
अरे हो ...
आज ग्रहण.
ग्रहण पाहू नये म्हणतात.
चुकून बघितलं दोघांनी.
काही वाईट तर....?
काहीही होत नाही.
"चल, खाली जाऊ यात."
ती दोघं खाली.
एरवीही त्याचा जीव तिच्यात अडकलेला.
आता तर काय?
जीवात जीव आलेला.
तिला कुठे ठेवू अन् कुठं नको, असं झालेलं.
ऑफिस संपलं की तो तडक घरी.
सगळ्या मित्रांशी डायव्होर्स घेतलेला.
तिच्यामागे सारखी रेकॉर्ड.
हे करू नको.
ते करू नको.
सगळं घर तिच्या दिमतीला.
तिकडे तिच्या आईचा जीव वरखाली.
तिच्या आईला कळलं आणि
उलट टपाली तिची आई तिच्या पुढ्यात.
गळाभेट.
आसवांची त्सुनामी.
तोही भरून पावला.
सतराशे साठ सूचनांचा डाटा पॅक मारून
त्याची सासू परत गेली.
एकदा असेच त्यानं घड्याळाच्या काट्यांना पुढं ढकललं...
जरा लवकरच घरी आलेला.
"अट युवर सर्विस मॅम.."
तिचं लक्षच नाही.
ती फोनला चिकटलेली.
फेविकॉलसारखी.
तिकडून तिची आई.
अर्धा तास झाला.
त्याची सटकली.
तो धुसफूसला.
फुगला.
गच्चीत गेला.
आज गच्ची उगाचच, लोडशेडींग असल्यासारखी अंधारी.
इन्फानाईट टाईमनंतर ती बोलणं आवरतं घेते.
त्याला शोधत गच्चीत.
"तू कधी आलास?
मला दिसलाच नाहीस?"
कसाबसा त्याला समजावून ती दोघं खाली.
हल्ली असं बरेचदा व्हायचं.
तो यायचा.
ती फोनवर असायची.
त्याला बघून बोलणं आवरतं घ्यायची.
त्याच्यावर फुल्ली कॉन्सन्ट्रेट करायची.
तरीही..
त्याला वाटायचं.
आपल्या सुखाला ग्रहण लागलंय.
आनंदात वाटेकरी आलाय.
तो थोडासा हर्ट झालेला.
सहज एका मित्राशी बोलला.
"सांभाळ रे..
हल्लीच्या आयांची ही सवयच आहे.
लेकीच्या संसारात सारखी ढवळाढवळ करतात.
अनुभवाचे बोल आहेत हे."
तो अजूनच कन्फ्युजला.
दुसऱ्या दिवशी तिचा सेल काढून घेतला.
'जे काही बोलायचंय ते लॅन्डलाईनवर बोल'
त्याचा अमरीश पुरी झालेला.
ती कसनुशी हसली.
आत खोल दुखावलेली.
फोनमुळे लांबची माणसं जवळ येतात म्हणे..
इथं अंतर वाढलेलं.
तरीही ती हसमुख वावरायची.
पण सहज समजायचं.
दुःख लपवणारं पांघरुणी हसू ते.
तो आंधळा झालेला.
अलीकडे तिचं मन त्याला वाचताच यायचं नाही.
निगरगट्ट दिवस पुढे चाललेले.
दोन एक महिन्यांनी ती सहज म्हणाली.
"आई म्हणतेय, बाळंतपण तिकडेच करू."
'काही नको.
आयत्या वेळी काही गरज पडली, तर त्या एकट्या काय करणार?
इथे आम्ही सगळे आहोत.'
विषय संपला.
सातव्या महिन्यात, बाळंतविड्याचं गाठोडं घेऊन आलेली त्याची सासू.
हा फारच तुटक तुटक वागला.
आल्या दिवशी परत गेली.
कुणालाच काही वाटलं नाही.
अगदी त्याच्या आई-बाबांना सुद्धा.
दिवस भरत आले.
आनंदी आनंद.
चंद्रशेखर बाप माणूस झालेला.
परीसारखी लेक जन्माला आलेली.
दुसऱ्या दिवशी तिची आई आली.
दीर्घोत्तरी प्रश्नाच्या लांबलचक उत्तरासारखी,
तिची आई गळ्यात पडून रडली.
का?
काय उत्तर देणार?
ग्रहणाचा साईडईफेक्ट...?
थाटात बारसं झालं.
नक्षत्रा.
छान आहे ना नाव?
तिची आई दूरच्या नातेवाईकासारखी बारशात वावरली.
दुसऱ्या दिवशी परत.
तिचा वेळ नक्षत्रासाठीच जाऊ लागला.
त्या दोघांचं पूर्वीसारखं काहीच न राहिलेलं.
क्वचित शरीरं जवळ यायची.
मनं कधीच फार फार अवे गेलेली.
एकच बॉन्ड दोघांमधे.
नक्षत्रा.
सगळी प्रेमाची बरसात तिच्यावर.
गच्ची?
आभाळच फाटलेलं.
त्यात गच्ची कधीच हरवून गेलेली.
वर्षातून एखाद वेळी तिची आई यायची.
नातीला डोळे भर के पाहायची.
त्या आठवणीवर दिवस रेटायची.
नक्षत्रा मोठी होत चाललेली.
शाळेत जायला लागली.
आता चौथीत.
तिची ट्रीप गेलीय.
त्याचे आई बाबाही गावाला गेलेत.
ती दोघंच घरी.
दोघांना करमत नाहीये.
लेकीच्या आठवणीनं तो व्याकुळ.
भरकटल्यासारखे ती दोघं गच्चीत.
सहज वर नजर.
ग्रहण.
ग्रहण सुटत चाललेलं.
चंद्र मोकळा होत चाललेला.
लख्ख प्रकाश.
त्याच्या डोक्यात पडतो.
'दहा वर्षाची पोर.
तिच्या आठवणीपायी मी पागल...'
त्याच्या सासूच्या फिलींग्ज तो आता समजू शकतो.
बाप झाल्यावर.
तो खरंच बाप माणूस झालेला.
तिला म्हणतो,
"मी दोन तासात आलोच.
जेवण आल्यावर."
गाडी काढतो.
तासाभराच्या अंतरावर सासुरवाडी.
सासूला घेऊन दोन तासात परत
"माझं चुकलंच जरा.
चुकीचा विचार करत होतो मी.
जाऊ देत.
ते काही नाही सासूबाई ,
आता इथंच राहायचं.
नातीबरोबर आणि लेकीबरोबर."
तिचा चेहरा.
मोगरा फुलल्यासारखा.
कौतुकानं ती त्याच्याकडे बघते.
मनापासून हसते.
अगदी पहिल्यासारखी.
मी म्हणलं नव्हतं...?
ग्रहण सुटलंय आता.
चंद्रग्रहण?
छे! छे!
मनला लागलेलं ग्रहण.
आता फक्त आनंदी चांदणचुरा.
जीयो जी भरके !
(रेखाचित्रः अमोल ठाकूर)