Dil-e-Nadaan: रिम झिम पाऊस अन् प्रेमाचा फ्लू... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 06:54 PM2018-08-01T18:54:52+5:302018-08-01T18:55:43+5:30

प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी प्रेमकथांचं टवटवीत सदर... 'दिल-ए-नादान'! :)

Dil e Nadaan love story in rain | Dil-e-Nadaan: रिम झिम पाऊस अन् प्रेमाचा फ्लू... 

Dil-e-Nadaan: रिम झिम पाऊस अन् प्रेमाचा फ्लू... 

- कौस्तुभ केळकर नगरवाला

पाऊस कसा असावा ?
हवामान खात्यानं सांगितल्यासारखा.
मुसळधार..
गावातल्या पारोशा जमिनीला, छान मृद्गंधाचं उटणं लावून न्हाऊमाखू घालावं त्यानं.
सगळं मळभ दूर व्हावं.
पन्हाळीच्या पाण्याचेही झरे व्हावेत.
गल्ली गल्लीतून, टुकार पोरांसारखी या झऱ्यांची गँग व्हावी.
एकत्र धुडगूस घालत मेनरोडवरनं पावसाची मोठी नदी व्हावी.
या नदीनं वाया गेलेल्या पोरासारखं, बेधुंद गावाबाहेरच्या दिशेनं वाहावं.
दोनच दिवसांत डांबरी रस्त्याच्या तुळतुळीत टकलाच्या कडेनं, हिरवी झालर उगवेल इतपत तजवीज करावी..
पाऊस असा ओलेता, उगवता हवा.
रोमांटी पाऊस.

....माझं एक स्वप्न  होतं.
स्वप्नही मी 'औकात में रह के' बघतो.
लव मॅरेज वगैरे  प्रकरण मला स्वप्नातही परवडत नाही. 
म्हणजे बघा, माझा नुकताच साखरपुडा झालेला असतो.
लग्नाला दोन-एक महिने अवकाश असतो.
ही पी.एल. फार महत्त्वाची.
पी. एल. म्हणजे प्रीप्रेशन लीव्ह.
एक दुसरे को जानने के लिए, समझने के लिए, वगैरे वगैरे...
नेमके पावसाळ्याचे दिवस असतात.
मी लर्निंग लायसन मिळाल्यासारखा तिच्या घरी.
तिला गाडीवर घेऊन पुष्पक विमानात बसल्यासारखा उंडारायला निघतो.
अचानक 'मुसलाधार बारीश' सुरू.
कुठल्यातरी बंद दुकानाच्या शटरचं 'आधार कार्ड' होणं.
तिच्या ओल्या केसांतून गालावर ओघळणारे मोती.
मी स्वतःला गाडगीळांपेक्षा श्रीमंत समजायला लागतो.
हावरटासारखे अजून मोती हवे असल्यासारखे, 
तिची ओंजळ पावसाला गोळा करते.
बारीश रुकने का नाम नही लेती...
गाडीची चाकं अर्धी पाण्यात बुडतात.
बंद पडणाऱ्या गाडीचं दोघांनाही कौतुक.
तिच्यातली अल्लड मुलगी जागी होते.
एका छत्रीखाली दोघांची मनं चिंब भिजतात.
अचानक पाऊस वाऱ्याला घेऊन येतो.
त्यांची छत्री उडवून लावतो..
आता ते उघड उघड  प्रेम करू लागतात.
पावसात गिरक्या घेऊन नाचतात.
उड्या मारून, पावसाच्याच पाण्यानं पावसालाच भिजवतात.
आपला  हमसफर आपल्यासारखाच येडा आहे.
इसकी अपनी खूब जमेगी...
अॅरेंज्ड मॅरेजचं सगळं टेन्शन वाहून जातं.
जुनी ओळख असल्यासारखे त्यांची प्रेमनैया पाण्यात पोहू लागते.
पूर्वजन्मातल्या बिछडे प्रेमीओंको मिलानेवाला पाऊस एक मध्यस्थ होऊन जातो...

परवा असाच धुंद पावसात, बंद रस्त्याशेजारी, शटरखाली उभा होतो...
वाईट वाट्या.
आपण हे सगळं मिस केलं...
साखरपुडा मेमध्ये.
लग्न जूनमध्ये. 
मधल्या महिन्यात पाऊस आलाच नाही. 
ते चिंब भिजणं , 
प्रेमाचा फ्ल्यू .....
झालाच नाही. 
घरी पोचलो....
माझी भज्यांची भूक टेलिपथीनं बायकोपर्यंत पोचलेली.
गरम भजी खात सोफ्यात रेललो.
कचकन् हिरव्या मिरचीचा तुकडा तोडला.
टीव्हीच्या स्क्रीनवर अमिताभ मौषमी भिजत होते.
गात होते.
....रिम झिम गिरे सावन..
सुलग सुलग....
मला स्क्रीनवर आम्ही दोघंच दिसायला लागलो...
मिर्चीनं रोमांटी झिणझिण्या आल्या.
तश्शीच प्रेमाची सर्दी  झाली.
प्रेमाची कणकण..
प्रेमाचा फ्लू...
वाटलं, फ्लू नही ये तो प्यार का ग्लू है...
मनं चिकटवणारा.
पावशा नवऱ्याला न मागता भजी देते ती खरी प्रेमाची बायको.
माझी शिट्टी रियाझ करू लागली.
रिमझिम  गिरे सावन...चे सूर उमटू लागले.

....प्रेमाच्या फ्लूची लक्षणं दिसू लागली.

(रेखाचित्रः अमोल ठाकूर)

Web Title: Dil e Nadaan love story in rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.