Dil-e-Nadaan : ती नजर... तो स्पर्श... अन् सोनचाफ्याचा गंध!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 01:06 PM2018-04-09T13:06:06+5:302018-04-09T13:06:06+5:30

प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी प्रेमकथांचं टवटवीत सदर... 'दिल-ए-नादान'! :)

Dil e Nadaan relationship beyond love | Dil-e-Nadaan : ती नजर... तो स्पर्श... अन् सोनचाफ्याचा गंध!

Dil-e-Nadaan : ती नजर... तो स्पर्श... अन् सोनचाफ्याचा गंध!

- कौस्तुभ केळकर नगरवाला

इ. स. 1990चा काळ.
बस नं 144.
वेळ सकाळी 8.40.
माझं आयुष्य या बसशी बांधलं गेलेलं.
ही बस चुकली तर संपलंच.
नुकतंच ग्रॅज्युएशन झालेलं.
पहिली नोकरी.
नवा गाव.
एका खोलीत पाच सहा जण कोंबून राहायचो.
ती फक्त आडवं व्हायची जागा.
बाकी जास्तीत जास्त वेळ ऑफिसमधे.
कशालाही नाही म्हणायचं नाही.
दिवस उगवेपर्यंत संपून जायचा.
बॉसही खूष होता.

एक दिवस घाईचा.
पळत पळत बस पकडली.
कटलेल्या पतंगाच्या मांज्याचं शेवटचं टोक पकडावं तसं.
सगळी बस भरलेली.
एकच जागा.
जावं की नको ?
तिथवर पोचलो अन् ..
सगळं अॅटमॉस्फीयर सुगंधी झालेलं.
मस्त सोनचाफा.
सोनचाफ्याचा वास मला प्रचंड आवडायचा.
अगदी सेम टू सेम तसाच वास.
मनाला गुदगुल्या झाल्या.
तिनं तसला कुठला तरी सेंट मारला असावा.
मला एकदम होमली फील झालं.
ती एकटीच बसलेली.
मानेला झटका देत तिनं माझ्याकडे बघितलं.
'बस ना.."
टप्पोरे काळेभोर डोळे.
ठाशीव नाजूक भुवया.
निर्मळ आश्वासक नजर.
"घाबरतोस काय?..."
मी अंग चोरून बसलो.
बसवर मागे लिहिलेलं असतं ना.
सुरक्षित अंतर ठेवा तसं.
तीही मस्त मोकळ्या आभाळासारखी हसली.
हळूहळू बस भरत चालली.
मोकळ्या जागेत माणसं कोंबलेली.
मी फार तिकडे सरकून बसलेलो.
येणाऱ्या जाणाऱ्यांचे सारखे धक्के बसू लागले.
एक जण तर म्हणालाही.
जरा आत सरकून बसा.
ती पुन्हा तशीच हसली.
खांदा खेचून मला आत सरकवलं.
अगदी सहज.
स्पर्श..
आपलेपणाचा हक्क गाजवणारा.
खरंच एखादा स्पर्श इतका नितळ असू शकतो?
शब्दात नाही सांगता यायचा.
पण खरंच..
तसाच होता.
"लाजू नकोस रे..."
मी सावरून बसलो.
हळूहळू चेहरा ओळखीचा झाला.
लांबसडक काळेभोर केस.
तजेलदार चेहरा.
हलकाच मेकअप.
मंद स्मित करणारे राजहंसी दात.
सगळ्यात महत्त्वाचे ते काळेभोर डोळे.
न बोलता बरंच काही बोलणारे.
जुनी गहिरी ओळख असल्यासारखी ती नजर.
हळूहळू जागा पकडणं सुरू झालं.
तशी ती माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठी असावी.
पण मला आवडायची.
माझी पहिली मैत्रीण म्हणून.
आमच्या नात्याला कुठलं लेबल लावावसं वाटलंच नाही कधी.
रोज गप्पा होत.
तिचा नवरा तिला स्टॉपपर्यंत सोडायला यायचा.
दोघांचं खूप छान ट्युनिंग असावं.
दोघांच्या नजरेत ते जाणवायचं.
पर्सनल कधीच बोललो नाही.
माझा जॉब.
जॉब हन्टिंग.
सहज सुचवलेला एखादा कोर्स.
मला गाईड वाटायची ती.
सहज म्हणून सांगायची.
पण मला खूप फायदा व्हायचा.
एखाद्याशी बोलायला कशी सुरुवात करावी?
काय बोलावं?
कसं बोलावं?
बॉडी लँग्वेज कशी असावी?
अगदी शेक हॅन्ड कसा करावा?
इंग्लिश कसं सुधारलं पाहिजे?
काय वाचलं पाहिजे?
त्या अर्ध्या तासात माझी शाळा.
खरंच मी सुधारत होतो.
गावाकडचा म्हणून असणारा, टिपीकल कॉम्प्लेक्स कमी कमी होत होता.
एखादा सिनीयर ज्युनियरला गाईड करतो तस्सं.
ती मला गाईड करायची.
कॉन्फिडन्स वाढत चाललेला.
तिचं टापटीप राहणं.
सहज आणि नेमकं बोलणं.
मी खूप इम्प्रेस व्हायचो.
वाटायचं, मी जर पुढे सेटल झालो तर..
तिच्या नवऱ्यासारखा दिसेन.
गाडीतून तिला सोडेन ऑफिसला.
माझी बायको तिच्यासारखी असेल.
कॉन्फिडन्ट.
स्मार्ट.
अॅम्बिशिअस.

कधी कधी तिच्या डब्यातला खाऊ.
नारळाची वडी.
नाहीतर खमण ढोकळा.
एक दिवस तिनं दोन कार्डस् दिली.
एक तिच्या नवऱ्याचं.
दुसरं कुठल्यातरी एच. आर. वाल्याचं.
"याला जाऊन भेट.
माझ्या नवऱ्याचा रेफरन्स दे.
जॉब प्रोफाईल तुझ्याशी मॅच होणारं आहे.
बेस्ट लक."
तिथं गेलो.
छोटासा इन्टरव्ह्यु.
मला तो जॉब मिळालासुद्धा.
मनासारखं काम.
सॅलरीही जास्त.
कधी एकदा तिला सांगतो असं झालेलं.
दुसऱ्या दिवशीची सकाळ.
बसस्टॉपवर ती उभी.
सांगावं लागलंच नाही.
माझा चेहराच बोलून गेला असावा बहुतेक.
मनातलं बरोब्बर ओळखायची ती.
हातात हात घेऊन तिनं काँग्रॅटस् म्हटलं.
पुन्हा तसाच स्पर्श.
स्वच्छ.
निरागस.
शब्दांपलीकडचा.
ती बस मुद्दामहून चुकवली आम्ही.
तिनं कॉफी पाजली मला.
साधंसं पण मनसे सेलिब्रेशन.

जॉब बदलला तरी बस तीच.
तिचं भेटणं मला बोर्नव्हिटासारखं वाटायचं.
दिवसभराची एनर्जी मिळायची.
कुणीतरी कॉफीशॉपमध्ये बघितलं.
माझ्या गँगमधे कुजबूज.
असल्या बायका नवऱ्याला कंटाळलेल्या असतात.
एखाद्या पोराला नादी लावतात.
जिंदगी बरबाद करून टाकतात त्याची.
बरंच काही ऐकवलं गेलं.
माझं मन सांगत होतं.
ती तशी नाहीये.
खरी मैत्रीण आहे.
तरीही...
घाबरलो.
नको ते खरं वाटायला लागलं.
ती बसच बदलून टाकली.
पुन्हा कधीच दिसली नाही ती.
नवं ऑफिस..
कामात डिंकासारखं बुडवून घेतलं.
तिथंच हिची भेट झाली.
तशीच आहे ही.
डीट्टो तशीच.
अगदी तिच्यासारखी.
मोकळ्या आभाळासारखी.
मनकवडी.
बोलक्या डोळ्यांची बाहुली.
मनभावन.
कधी प्रेमात पडलो कळलंच नाही.
एकदा हिनं विचारलंही.
"काय पाहिलंस माझ्यात?"
सगळं सांगून टाकलं.
हिलाही पटलं.
"प्रत्येक जण आपल्या होणाऱ्या बायकोत कुणाला तरी शोधत असतो.
कधी आई, ताई, नाहीतर वहिनी.
तू तुझ्या मैत्रिणीला शोधलीस.
आवडलं.
एकदा भेटव तुझ्या सोनचाफ्याला."
मी म्हटलं नाही, ही डीट्टो तशीच आहे.
सरळ.
सहज समजून घेणारी.

कॅलेंडरची पानं खूप फडफडली.
बरीच वर्षं गेली मधे.
मीही बऱ्यापैकी सेटल झालोय.
बऱ्याच वरच्या पोस्टपर्यंत पोचलोय.
अचानक कधीतरी सोनचाफा आठवतो.
वाटतं, आपण चुकीचं वागलो.
माज केला.
आता इलाज नव्हता.
गेल्या महिन्यात एक लग्न होतं.
सख्ख्या मित्राच्या मुलीचं.
मित्रांच्या गराड्यात गप्पा कुटत होतो.
एकदम सराउंडींग हॅप्पी हॅप्पी.
सोनचाफेरी माहौल.
तोच सुगंध.
मी 180 डिग्रीत मान वळवली.
तीच.
तशीच.
फक्त लांबसडक काळ्याऐवजी, लांबसडक पांढरे केस.
तीच ओळखीची नजर.
तेच निर्व्याज हसू.
"किती दिवसांनी भेटतोयस!
बरं वाटलं."
मधली वर्ष वायपरनं पुसल्यासारखी धूसर.
ही मित्राची विहीणबाई.
पाचच मिनटं.
मस्त गप्पा मारल्या.
हिला बोलावून आणली.
सांगावं लागलंच नाही.
"सोनचाफा ना?" ही कानात कुजबुजली.
मित्रानं विचारलं.
'तुमची ओळख आहे?'
ती सहज म्हणाली.
"फार जुनी.
मी याची जुनी मैत्रीण.
हा घाबरायचा असं म्हणायला.
आपलं हेच चुकतं.
लेबलं लावत बसतो.
एक तर बहीण नाहीतर डायरेक्ट बायको.
जाने दो.
आता तर भीती वाटत नाहीये ना?
बिनधास्त सांग, ही माझी मैत्रीण आहे म्हणून."
हातात हात घेऊन ती मला हॉलभर फिरवत होती.
सगळ्यांशी ओळखी करून दिल्या.
"हा माझा जुना मित्र".
मला बिलकुल ऑड वाटत नव्हतं.
खरी ओळख पटलेली.
मित्रासारखा माझा हात तिच्या हातात.
तोच स्पर्श.
हवाहवासा.
खऱ्या मैत्रीचा.
माझ्या मनात सोनचाफा दरवळू लागला.

(रेखाचित्रः अमोल ठाकूर)

Web Title: Dil e Nadaan relationship beyond love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.