स्वीकारा, वेळ द्या... नात्याला ‘स्पेस’ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:03 AM2018-02-11T01:03:44+5:302018-02-11T01:03:59+5:30

आजकाल कोणतेही नाते घ्या, ते टिकविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पूर्वीसारखी समाजाच्या नीतिमत्तेची बंधने गळून पडल्याने असेल कदाचित, पण कोणतेही नाते तुटताना त्याचे फार वाईट वाटून घेतले जात नाही.

Accept, give time ... give 'space' to the relationship | स्वीकारा, वेळ द्या... नात्याला ‘स्पेस’ द्या

स्वीकारा, वेळ द्या... नात्याला ‘स्पेस’ द्या

- डॉ. मधुरिमा तेलंग

आजकाल कोणतेही नाते घ्या, ते टिकविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पूर्वीसारखी समाजाच्या नीतिमत्तेची बंधने गळून पडल्याने असेल कदाचित, पण कोणतेही नाते तुटताना त्याचे फार वाईट वाटून घेतले जात नाही. नाती तुटण्याचा दूरगामी परिणाम काय होणार आहे, याचा विचार करायलाही कुणाकडे वेळ नसतो, पण नाती ही मनासाठी टॉनिकचे काम करत असतात. त्यामुळे नाती जपणे हे मनाचे स्वास्थ्य जपण्यासाठी फार गरजेचे झाले आहे. मला कुणाशी काही देणे-घेणे नाही, म्हणणाºया लोकांनाच नात्यांची, माणसांची फार गरज असते.


नाती टिकवायची कशी, हा आजच्या जमान्यातला मोठा प्रश्न आहे. नाती टिकविताना आपण टोकाची भूमिका तर घेत नाही ना, हे पाहणे फार गरजेचे झाले आहे. पूर्वीसारखे अमुक एका नात्याकडून विशिष्ट अपेक्षा करणे आता रास्त नाही. मुलांनी आई-वडिलांचा सांभाळ करावा किंवा नवरा- बायकोने वाट्टेल ते सहन करून एकत्र राहावे, असे आज मानले जात नाही. त्यांना आपापल्या मार्गाने जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. नव्हे, तोच आजच्या सामाजिक अवस्थेचा पाया बनत आहे. अशा वेळी नाती टिकवायला काय करायला हवे, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे.
नाती टिकविताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, हा एकतर्फी मामला नाही. कुणाला तरी एकाला वाटतेय, म्हणून नाते टिकत नाही, तर ती दोन्ही पक्षाची मंजुरी असावी लागते. मात्र, ही आत्मीयता निर्माण करणे आपल्या हातात असू शकते. एक तर अवास्तव अपेक्षांना फाटा दिला पाहिजे आणि अधिकारापेक्षा प्रेमाची भाषा वापरायला शिकले पाहिजे. नात्यांत विश्वासाला खूप महत्त्व आहे. एकमेकांवर अविश्वास दाखवून काही मिळणार नाही. आजच्या धकाधकीच्या युगात माणूस एकटा पडत चालला आहे. नवरा-बायको, भाऊ, बहिणी, घरातल्या वयस्क व्यक्ती, मित्र-मैत्रिणी अशी कितीतरी नाती आपल्यासाठी असूनही कधी-कधी अगदी एकटेपणा येतो. या नात्यांचा एक सुंदर गोफ तुमच्याभोवती असेल, तर किती आश्वस्त वाटते नाही? पण ही नाती आणि त्यांची उब एकाएकी निर्माण होत नाही, तर हे बंध निर्माण करावे लागतात. त्यासाठी प्रत्येक नात्याला त्याची एक ‘स्पेस’ द्यायची गरज आहे.
सध्याचा काळ हा संक्रमण काळ आहे. पूर्वी ३० वर्षांची एक पिढी समजली जायची. आता ५ वर्षांतच जीवनशैली बदललेली असते. संवाद, सहवास आणि सोबत यातून नाती घडतात, रुजतात, पण व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकच्या जमान्यात त्यांच्याही व्याख्या बदलत चालल्यात. सांस्कृतिक देवाण-घेवाणीसोबत सांस्कृतिक धक्केही वाढले. बदलाचा वेग एवढा आहे की, पालकांच्या विश्वात मुले रमू शकत नाहीत आणि पालकांना तर मुलांचे विश्व सुधारताच येत नाही. प्रियकर-प्रेयसी, ब्रेक अप्स, लिव्ह इन, घटस्फोट, दत्तक पालकत्व याही गोष्टी आता नवीन राहिलेल्या नाहीत. त्यामुळे नात्यांनाही नवे आयाम आले. संवाद-सहवास-सोबत पूर्वीसारखे राहिले नाहीत.
पती-पत्नीमधले नाते मैत्रीचे असले पाहिजे, हे आत्ता कुठे पचायला लागलेय. त्यात दोघांनी नोकरी करण्यामुळे दोघांच्याही आयुष्यातला खूप जास्त वेळ इतरांच्या सहवासात जातो, बायकोचा मित्र, नवºयाची मैत्रीण याची सवय व्हायला लागली आहे. प्रत्येक नात्यात सर्वांना स्पेस मिळायला हवी हे मान्य होतेय, पण पिढ्यान्पिढ्यांच्या जुन्या विचारपद्धती एवढ्या पटकन बदलत नाहीत. काळासोबत खेचले गेल्याची एक जबरदस्ती वाटते. त्यामुळे वागताना आत्मविश्वास वाटत नाही, अधांतरी वाटते. आत्ता-आत्तापर्यंत रूढी-परंपरांना महत्त्व असणाºया कुटुंब-समाजकेंद्री जीवनशैलीत सगळे ठरलेलेच असायचे. आता समजत चाललेय की, अशा निवाड्याने प्रश्न संपत नाहीत. चूक आणि बरोबर असे वर्गीकरण व्हावे, ही अपेक्षा नात्यातली लवचीकता संपविते. स्वीकार आणि विश्वासाच्या पायावर उभी असणारी, ‘असेच हवे’ हा ‘च’चा अट्टाहास न धरणारी नाती जास्त आनंददायी असतात.

(लेखिका या मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)

(शब्दांकन - स्नेहा मोरे)

Web Title: Accept, give time ... give 'space' to the relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई