पुराव्यासह आरोप; बदलत्या 'राज'कारणाची आधुनिक शैली!
By प्रविण मरगळे | Published: April 7, 2019 11:42 AM2019-04-07T11:42:11+5:302019-04-07T11:42:53+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेलं भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाचं उत्तम उदाहरण आहे. एखाद्या राजकीय पक्षाकडून आणि त्या पक्षाच्या नेत्यांकडून असाच प्रकारच्या भाषणाची अपेक्षा असते.
- प्रविण मरगळे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेलं भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाचं उत्तम उदाहरण आहे. एखाद्या राजकीय पक्षाकडून आणि त्या पक्षाच्या नेत्यांकडून असाच प्रकारच्या भाषणाची अपेक्षा असते. राज यांच्या भाषणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या भाषणाची आणि त्यांनी डंका वाजवलेल्या कामाची पोलखोल करणं हे हल्लीच्या राजकारणात बहुदा पहिल्यांदा घडत असेल.
राजकीय पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. एकमेकांचे मुद्दे खोडून लोकांच्या मनावर आपली छाप पाडणं हे उत्कृष्ट वक्त्याचं भाषण कौशल्य असतं. शेवटी काविळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं तसं राज ठाकरेंचा विरोध करणा-यांना त्यांचे भाषण मनोरंजन म्हणून दिसणार यात शंका नाही. देशाच्या लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जितका महत्त्वाचा असतो तितकाच विरोधी पक्ष महत्त्वाचा असणं गरजेचे असते. सरकारच्या योजनेची, नरेंद्र मोदींच्या भाषणाचे व्हिडिओ पुरावे देऊन राज ठाकरे यांनी सरकारवर आणि भाजपावर जोरदार टीका केली.
खरंतर देशातील सगळ्याचं राजकीय पक्षांनी भाषण करताना एकमेकांचे मुद्दे खोडून काढले पाहिजे. मात्र देशभक्ती, लोकांच्या भावनांशी खेळून अनेक पक्ष आणि नेते स्वतःची राजकीय पोळी भाजतात. राज ठाकरे यांच्या भाषणाची शैली बदलतेय. टीका करताना त्याचे पुरावे, कागदपत्रांचे दाखले, व्हिडिओ दाखवून लोकांशी संवाद साधतायेत. त्यामुळे देशाच्या बदलत्या राजकारणामध्ये ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे.
शेवटी इतकंच राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे हीच अपेक्षा सत्ताधारी पक्षाकडून आहे. जर या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे अथवा भाजपा नेत्यांकडे नसतील तर राज यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात ते धन्यता मानतील हे नक्की!