अमेझॉनचा ‘ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:47 AM2017-12-03T01:47:55+5:302017-12-03T01:49:02+5:30
८ नोव्हेंबर २0१६ची नोटाबंदी आणि १ जुलै २0१७ रोजी जीएसटीची अंमलबजावणी या दोन घटनांनी संपूर्ण भारतीय जनमानस ढवळून निघाला ही वस्तुस्थिती असून या निर्णयांचे दीर्घकालीन परिणाम अजून सिद्ध व्हायचे असले तरी अल्पकाळात सर्वसामान्य लोकांच्या जीवनाची त्रेधातिरपीट उडाली याची असंख्य उदाहरणे देता येतील.
- सुरेंद्र जाधव
८ नोव्हेंबर २0१६ची नोटाबंदी आणि १ जुलै २0१७ रोजी जीएसटीची अंमलबजावणी या दोन घटनांनी संपूर्ण भारतीय जनमानस ढवळून निघाला ही वस्तुस्थिती असून या निर्णयांचे दीर्घकालीन परिणाम अजून सिद्ध व्हायचे असले तरी अल्पकाळात सर्वसामान्य लोकांच्या जीवनाची त्रेधातिरपीट उडाली याची असंख्य उदाहरणे देता येतील. अर्थव्यवस्थेची सर्वच क्षेत्रे या निर्णयांनी प्रभावित झाली असून त्यांच्यावरील ब-या - वाईट परिणामांची आकडेवारी आता हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. मोठ्या आणि अवजड उद्योगांची कुठलाही आर्थिक धक्का सहन करण्याची ताकद अधिक असल्याने त्यांना या निर्णयांचा फारसा फरक कदाचित पडणार नसेल परंतु अतिशय किरकोळ उद्योगांची मात्र अशी परिस्थिती नाही. विशेषत: नोटाबंदीनंतर सर्वसामान्य लोकांच्या घटलेल्या क्रयशक्तीमुळे देशभरातील किरकोळ उद्योगांचे दिवाळे निघाले ही वस्तुस्थिती आहे.
परंतु अशा परिस्थितीतसुद्धा काही किरकोळ विक्रेत्यांनी वेगळी वाट चोखाळून आशेचा नवा किरण दाखवला आहे, त्याची नोंद घेतलीच पाहिजे. अमेरिका आणि पाशात्त्य देशांमध्ये विशेषत: ‘ख्रिसमस आणि नववर्षाचा’ सोहळा मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. याच कारणामुळे आपल्या किरकोळ उद्योगाला बरे दिवस येणाची चिन्हे दिसत आहेत. भारतातील किरकोळ उद्योगाने आगामी ख्रिसमस आणि नववर्षाच्या सोहळ्याचे निमित्त साधून या वर्षी जय्यत तयारी केली आहे, या व्यावसायिकतेबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. भारतातल्या किरकोळ उद्योगांमध्ये अल्प-प्रमाणात का होईना जी नवी ऊर्जा संचारली आहे त्याचे कारण
आहे ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘सायबर मंडे’ या दिवशी अमेझॉनच्या रिटेल आउटलेट आणि संकेतस्थळावरून होणारी आॅनलाइन खरेदी-विक्री. आता ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘सायबर मंडे’ हे प्रकरण नीट समजावून घेऊ.
‘ब्लॅक फ्रायडे’ हे मुळात अनौपचारिक नाव असून ते १९५२पासून अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांत प्रचलित आहे आणि त्याचा संबंध ‘आभार मानण्याच्या दिवसाशी’ (थँक्स गिविंग-डे) आहे. आभार मानण्याचा दिवस अमेरिकेत १७८९पासून साजरा केला जातो. शेत पिकांची कापणी संपली की
त्यानंतर या उत्सवास सुरुवात होते. १८६३पासून या उत्सवास राष्ट्रीय स्वरूप आले. स्वर्गात वास्तव्य करणाºया आपल्या परोपकारी पित्याचे स्मरण करून, त्याची स्तुती करून त्याचे यानिमित्ताने आभार मानले जातात. यानंतर खºया अर्थाने ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताच्या जय्यत तयारीला सुरुवात होते. नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी ‘आभार दिवस’ साजरा केला जातो.
भारतीय संदर्भात पिकांच्या कापणीनंतर साजºया केल्या जाणाºया उत्सवांशी ‘ब्लॅक फ्रायडे’चे साधर्म्य जोडता येऊ शकते. भारतात प्रामुख्याने - मकर संक्रांती (उत्तर भारत), बैसाखी (पंजाब - हरियाणा), भोगली बिहू (आसाम), वांगला (मेघालय आणि आसाम), नौखाई (ओडिशा), नबाना (प. बंगाल), ओणम (केरळ), पोंगल (तामिळनाडू) आणि उगाली (आंध्र आणि कर्नाटका) इत्यादी उत्सव पिकांची कापणी झाल्यानंतर साजरे केले जातात.
ब्लॅक फ्रायडे मुख्यत: नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारपासून वापरात आहे आणि ही प्रथा प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड्स आणि आफ्रिकेच्या काही देशांत आजतागायत चालू आहे. या दिवशी भल्या पहाटे किरकोळ विक्रेते आपली दुकाने सुरू करतात, सवलतीच्या दरांत विविध वस्तूंची जाहिरात करून वस्तूंची विक्री करतात. ब्लॅक फ्रायडेच्या खरेदीसाठी ग्राहकांनीदेखील जंगी तयारी केलेली असते आणि म्हणूनच हा दिवस ‘सर्वाधिक स्वस्त खरेदीचा दिवस’ म्हणूनही ओळखला जातो. उदाहरणार्थ - २0१४ साली आठवड्याच्या शेवटच्या चार दिवसांत ५0९0 कोटी रुपयांची विक्र ी झाल्याची नोंद आहे.
(लेखक अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)
हा तर मार्केटिंग फंडा
‘सायबर मंडे’ ही मुळात ‘विपणन’ (मार्केटिंग)ची संज्ञा असून ‘आभार मानण्याच्या दिवसानंतर’ येणारा पहिला सोमवार हा ‘सायबर मंडे’ म्हणून ओळखला जातो. ही संकल्पना मुळात मार्केटिंग कंपन्यांनी जन्मास घातली असून ‘आॅनलाइन’ खरेदीसाठी प्रोत्साहन देणे हाच त्यांचा मूळ हेतू आहे. २00५ साली एलेन डेव्हिस आणि स्कॉट सिल्व्हर्सन यांनी ही संकल्पना जन्मास घातली. अल्पावधीत ‘सायबर मंडे’ हा सर्वाधिक आॅनलाइन शॉपिंगचा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. २0१५ साली २९८ कोटी रुपयांची रेकॉर्ड विक्र ी नमूद करण्यात आली. यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने भारतातील छोट्या किरकोळ विक्रेत्यांना ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘सायबर मंडे’ या दोनही दिवसांचा भरघोस फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत.