आनंदमूर्ती सर्वांग सुंदर गवय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 03:30 AM2017-10-01T03:30:11+5:302017-10-01T03:30:23+5:30
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक प्रतिभावान गायक कलाकार. ज्यांच्या गायकीचा आदर्श ठेवून संगीत साधकांनी अनुकरण करावे, असे विद्वान गवय्या म्हणजे पं. राम मराठे.
-आनंद भाटे
२५ सप्टेंबर रोजी दिवं. पं. राम मराठे यांचा पुुण्यस्मरण दिन होता. जागतिक संगीत दिन आणि मराठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त परममित्र प्रकाशनतर्फे, ‘नादब्रह्म स्वरयोगी’ हे संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन आज १ आॅक्टोबर रोजी ठाण्यात होत आहे. या निमित्ताने या पुस्तकातील एक प्रकरण.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक प्रतिभावान गायक कलाकार. ज्यांच्या गायकीचा आदर्श ठेवून संगीत साधकांनी अनुकरण करावे, असे विद्वान गवय्या म्हणजे पं. राम मराठे.
पं. राम मराठे यांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवते, ते त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, ठुमरी, चित्रपट संगीत, अभंग इत्यादी संगीतातील सर्व प्रकार त्यांनी गायले. प्रत्येक प्रकारावर त्यांचे तेवढेच प्रभुत्व होते. अनेक चित्रपटांतून व नाटकातून त्यांनी भूमिका केल्या, संगीत दिग्दर्शन केले. उत्तम तबला वादक म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. संगीताच्या विविध क्षेत्रात त्यांनी तितक्याच उंचीचे काम केले.
अभिजात संगीतातील जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर या तीन घराण्यांतील गुरूंबरोबर, किराणा घराण्याचे ऊर्ध्वयू सवाई गंधर्व पं. रामभाऊ कुंदगोळकर यांच्याही गायकीचे संस्कार झाले असावे, असे त्यांचे ध्वनिमुद्रण ऐकताना जाणवते. प्रत्येक घराण्यातील चांगल्या गोष्टींचे उत्तम मिश्रण त्यांनी आपल्या गायकीत सामाविष्ट केले. त्यातूनच स्वत:ची अशी खास शैली निर्माण केली. एक प्रकारचे संपूर्ण गाणे ज्यात सुरेलपणाबरोबरच आलापीची उत्तम बढत, लयकारी, तान अशी सर्व अंग प्रभावीपणे मांडलेली दिसतात.
शास्त्रीय संगीताच्या बाबतीत बोलायचे, तर त्यांच्या गाण्यात शास्त्र व कलात्मकता या दोन्हींचा समन्वय साधलेला दिसतो. रागाचे स्वरूप चटकन सिद्ध होते. लयीवर प्रचंड प्रभुत्व, तानेतील आक्रमकता, स्पष्टता, फिरत व विविध तान प्रकारांचा फार मोठा आवाका होता. अफाट कल्पनाशक्ती, प्रचंड क्षमता, गळ््याची फिरत हे तीन गुण त्यांच्या गायकीत ठळकपणे जाणवतात.
जोडराग गायन यात तर त्यांचा हातखंडाच होता. जोडरागातील दोन रागांची उकल अतिशय बेमालूमपणे ते करत. एका रागातून दुसºया रागात इतक्या सहजतेने प्रवेश करून, पुन्हा मूळ रागात येण्याची त्यांची हातोटी लक्षवेधक होती. या दोन्ही रागांचे वातावरण कायम ठेवून, कौशल्यपूर्ण मिश्रणातून जोड राग गात. नाट्यसंगीतातील नाट्य, भाव, बुद्धी, गळा, अनेकविध स्वरावलींना शब्दांत गुंफून वेगवेगळ््या प्रकारे गाणे खुलविण्याचे कसब, एखाद्या जागेतील बारकाव्यामध्ये थोडा-थोडा फरक करून सौंदर्यात भर टाकत. आवाज फिरतो, म्हणून प्रत्येक गाण्यात तानबाजी न करता, गाण्याला पोषक घटकांचा वापर ते आपल्या गाण्यात करत. बालगंधर्व गायकीची नजाकत, लालित्य व शास्त्रीय संगीताचा बाज या तिन्हींच्या मिलाफातून ते आपले गायन सादर करत.
स्वत:च्या गाण्यावर अपार श्रद्धा व भक्ती ठेवून, पूर्वीचे सर्वच गायक कलाकार आपली कला जोपासत. आपले जीवन संगीतासाठी वाहून घेत. त्यांना ध्यास होता, तो फक्त संगीताचा. हा समान धागा माझे गुरूवर्य पं. भीमसेन जोशी यांच्याप्रमाणेच रामभाऊंच्याही बाबतीत जाणवतो. गाण्यातील सर्व गान प्रकारांना त्यांनी समान दर्जा दिला. प्रत्येक गान प्रकार एका उंचीवर नेला. सर्वच संगीतातील साधकांनी या कलाकारांचा आदर्श ठेवून, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची जोपासना करावी. अशा या प्रतिभावान गायक कलाकाराला माझा शतश: प्रणाम!