व्यावसायिक कर्ज देताना बँका नेमके हे पाहतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 04:08 AM2018-07-01T04:08:12+5:302018-07-01T04:08:37+5:30
एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करताना उद्योजकाला भांडवल उभारणी या मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते. आणि म्हणूनच उद्योजकाने भांडवल उभारणीच्या विविध पर्यायांकडे बारकाईने पाहणे हे आग्रही ठरते.
- प्रतीक कानिटकर
एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करताना उद्योजकाला भांडवल उभारणी या मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते. आणि म्हणूनच उद्योजकाने भांडवल उभारणीच्या विविध पर्यायांकडे बारकाईने पाहणे हे आग्रही ठरते. बँका आणि आर्थिक संस्था कंपन्यांना व्यवसाय जीवनचक्राच्या सर्व टप्प्यांसाठी आर्थिक मदत देतात, परंतु नेमके कोणते घटक लक्षात घेऊन बँका कर्ज देतात याबद्दल व्यावसायिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालेले पाहण्यात येतात. या प्रश्नांची उकल करण्याकरिता घेण्यात आलेला हा आढावा.
१. उत्तम प्रोजेक्ट रिपोर्ट
सर्वप्रथम व्यावसायिकाने एक सक्षम व्यवसाय योजना बनविणे तसेच व्यवसायातील कामगिरीचा सशक्त ट्रॅक रेकॉर्ड बँकेला प्रदर्शित करावा. प्रोजेक्ट रिपोर्टअंतर्गत काही प्रमुख मुद्दे असणे हे आवश्यक ठरते जसे:-
व्यवसायाचे स्वरूप म्हणजेच प्रमुख उत्पादने आणि सेवांचा सारांश
प्रमोटर्सचा व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव
उद्योगाची भविष्यातील समस्या संभावना
लक्ष्य बाजार
आर्थिक स्टेटमेन्ट
उत्पादनाची माहिती आणि उत्पादनाची निवड करण्याची कारणे
मार्केटिंगच्या योजना
कर्जा$चा हेतू
करानंतरचा सकारात्मक नफा (पॅट- प्रॉफिट आफ्टर टॅक्स)
२. कर्ज परतफेड करण्याची क्षमता प्रस्थापित करा
कर्जासाठी अर्ज करताना, कर्जदारांनी सर्वप्रथम बँकांना स्पष्ट केले पाहिजे की तो कंपनीच्या रोख मिळकतीमधूनच म्हणजेच व्यावसायिक उत्पन्नामधूनच कर्जाची परतफेड कशा प्रकारे करू शकतो. कर्ज देताना बँक हे जरूर लक्षात घेते की भविष्यात जर व्यावसायिकाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले तर कर्जाच्या परतफेडीला अडचण येऊ नये, आणि हे मांडण्याकरिता योग्य आर्थिक अंदाजानुसार चांगले बजेट सादर करणे इष्ट ठरते.
३. भांडवल उभारणीमध्ये व्यावसायिकाचे स्वत:चे योगदान
बँका कर्ज देताना व्यावसायिक भांडवल उभारणीच्या प्रक्रियेमध्ये व्यावसायिकाने आजवर केलेले भांडवल योगदान जरूर लक्षात घेतात त्यालाच ओन काँट्रीब्युशन असेही म्हणतात. जर मालक स्वत:च्या व्यवसायात स्वत:च गुंतवणूक करीत नसेल तर बँकांनी तरी ही गुंतवणूक का करावी, हा प्रश्न व्यावसायिकाला कर्जासाठी अर्ज करताना विचारला जाऊ शकतो. जेव्हा व्यवसायामध्ये व्यावसायिकाचे अधिक वैयक्तिक भांडवल लागलेले असते, तेव्हा तो व्यवसाय जतन करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिक काटेकोर असतो हे पहिले जाते आणि म्हणूनच बँक कर्ज देताना व्यावसायिकाने व्यवसायात आजवर केलेल्या गुंतवणुकीवर अधिक भर देते.
४. उत्तम सिबिल स्कोअर
मागील ‘उत्तम सिबिल स्कोअर - व्यावसायिकाची नितांत गरज’ या लेखाअंतर्गत आपण सिबिल स्कोअरबद्दल जाणून घेतले. सिबिल स्कोअर किंवा अहवाल हा ‘क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड’तर्फे व्यक्तीच्या वित्तीय डेटावर म्हणजेच बँकेतील व्यवहारांवर तसेच आजवर घेतलेल्या कर्ज परतफेडीच्या व्यवहारांवर आधारित तयार केला जातो. बँका तसेच वित्तीय संस्था सिबिल स्कोअर पाहून मगच कर्जदाराची कर्ज घेण्याची पात्रता ठरवितात. सिबिलमधील उत्तम स्कोअर हा चांगला क्रेडिट इतिहास आणि जबाबदार कर्जाच्या परतफेडीचे वर्तन सूचित करतो. सिबिल स्कोअर जितका जास्त असेल तितकी कर्जमंजुरीची शक्यताही अधिक असते. सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० गुणांदरम्यान असतो, आणि ७५०पेक्षा अधिक गुण हे सामान्यत: चांगला स्कोअर म्हणून ओळखला जातो. सिबिल स्कोअर जर ७५०हून अधिक असल्यास, अशा कर्जदारांना सर्वोत्कृष्ट व्याजदरांसह कर्ज आणि क्रेडिट कार्ड उपलब्ध केले जाते.
आणि म्हणूनच ज्या व्यक्तीला व्यवसाय कर्ज भविष्यात घेण्याचा मानस असल्यास, त्यांनी सिबिल स्कोअरवर विशेष लक्ष देऊन उत्तम क्रेडिट रेटिंग्स मिळविण्याच्या दृष्टीने पावले उचलणे हे योग्य ठरेल.
५. संपार्श्विक (कोलॅटरल) म्हणजेच तारण म्हणून आपण काय वापरू शकता हे जाणून घ्या स्थावर मालमत्ता, व्यवसाय इन्व्हेंटरी (स्टॉक) आणि प्राप्य खाते (अकाउंटमधील बॅलन्स) :
आपल्या व्यवसायासाठी पैशाची जलदगती प्राप्त करण्यासाठी मालमत्ता-आधारित कर्ज देणे हा एक उत्तम मार्ग असू शकतो. तसेच आपल्या कंपनीला एक मोठी खरेदी आॅर्डर मिळाल्यास, काही प्रकरणांमध्ये, बँक एखाद्या कंपनीला खरेदीची आॅर्डर संपार्श्विक (तारण) म्हणून वापरण्याची परवानगी देते. वैयक्तिक बचत खात्यांमधील बाकी रक्कम, तसेच आवर्ती ठेव हेदेखील तारण म्हणून बँका स्वीकारतात; कारण, बँकेसाठी हे सगळ्यात कमी धोकादायक कर्ज ठरते. जर व्यावसायिकाने कर्ज परतफेडीत चालढकल केल्यास बँक या बचतीचा ताबा घेऊ शकते.
६. इन्कमटॅक्स रिटर्न्सवर सर्वाधिक भर
जर आपण भविष्यात गृहकर्ज, वाहन कर्ज, कार कर्ज इत्यादीसाठी अर्ज करण्याची योजना आखत असाल तर, बहुतेक बँका मागील (३) तीन वर्षांच्या इन्कमटॅक्स रीटर्न्सचा पुरावा मागतात. तसेच, आपल्या कर्जासाठी सह-कर्जदार (गॅरेंटर) म्हणून उपस्थित व्यक्तीचे परतावे दाखल करणेदेखील अनिवार्य आहे.
इन्कमटॅक्स रिटर्न्स वेळेत दाखल केल्याने बँकांना आपली आर्थिक स्थिती आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता समजण्यास मदत होते. आपल्या कर्जाच्या अर्जाची जलद परवानगी मिळविण्यामध्ये इन्कमटॅक्स रिटर्न्सना विशेष महत्त्व आहे. आणि म्हणूनच इन्कमटॅक्स रिटर्न्स देय तारखेच्या आत दाखल करणे हे कर्ज मिळविण्याच्या दृष्टीने नेहमीच आग्रही ठरते.
७. आपले जीएसटी रिटर्न वेळेत दाखल करा
खासगी क्षेत्रातील कर्जासाठी काही बँकांनी नवीन प्रकारच्या कर्जाचा शुभारंभ केला आहे ज्यामध्ये छोट्या व्यावसायिकांना त्यांनी फाईल केलेल्या जीएसटी रिटर्नवर आधारित सुरक्षित कर्ज मिळू शकेल. ह्या स्वरूपाचे कर्ज हे उत्पादन सूक्ष्म, लघू व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांसाठी ओव्हरड्राफ्ट प्रकारच्या कर्ज स्वरूपात दिले जाते, ज्याद्वारे लघुउद्योग त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या आधारे आणि जीएसटी रिटर्नस् पाठिंबा देऊन कर्ज घेऊ शकतात. आणि म्हणूनच जीएसटी रिटर्न देय तारखेच्या आत दाखल करणे हे कर्ज मिळविण्याच्या दृष्टीने नेहमीच आग्रही ठरते.
८. रजिस्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची कर्ज घेण्याची क्षमता अधिक
एखाद्या रजिस्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला निधी उधार घेण्यासाठी उत्तम संधी मिळू शकतात. बँकिंग आणि वित्तीय संस्थादेखील भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप फर्म किंवा प्रोप्रायटरी स्वरूपाच्या व्यवसायापेक्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मोठी आर्थिक मदत देण्यास पसंत करतात. आणि म्हणूनच व्यावसायिकाने, व्यावसायिक गरजेनुसार व्यवसाय प्रकारात बदल करणेही इष्ट ठरते. थोडक्यात, व्यावसायिकाने जर उत्तम बँकिंग तसेच सिबिल रेकॉर्ड, इन्कम टॅक्स रिटर्न्स व जीएसटी रिटर्न्सचा वेळेत भरणा व योग्य प्रकारे कंपनीचे रजिस्ट्रेशन केले तर व्यावसायिक कर्ज मिळविणे हे अधिक सोपे होऊ शकते.