Mumbai CST Bridge Collapse: जीना यहाँ, मरना यहाँ...
By बाळकृष्ण परब | Published: March 15, 2019 12:38 PM2019-03-15T12:38:34+5:302019-03-15T13:49:48+5:30
दंगेधोपे, बॉम्बस्फोट, अतिवृष्टी, अग्नितांडव, छोटेमोठे अपघात आणि इतर अनेक आपत्ती झेलून मुंबईतील सामान्य माणूस गेली अनेक वर्षे झेलत उभा आहे
बाळकृष्ण परब
कालची संध्याकाळ नेहमीसारखीच. साधारण सव्वा सात, साडेसातची वेळ. चाकरमानी मुंबईकर कामावरील अजून एक दिवस भरून लगबगीने घरी निघाले होते. वाटेत फुटपाथवर कुणी किरकोळ खरेदी करत होता, तर कुणी तिथल्याच ठेल्यावर नाश्तापानी करून भूक भागवत होता. अमुक अमुक लोकल मिळाली पाहिजे म्हणून अनेकांची लगबग सुरू होती. मुंबईतील उपनगरीय वाहतुकीचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने अशा चाकरमान्यांचे नेहमीसारखेच जथ्थेच्या जथ्थे येत होते. ओव्हरब्रिजवर गर्दी झाली होती. तेवढ्यात एक मोठ्ठा आवाज झाला. मग काही वेळ शांतता आणि नंतर आर्त किंकाळ्या, विव्हळण्याचे आवाज यांनी परिसर हादरला. मग सुरू झाली जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठीची लगबग, पोलीस, बचाव पथकांची परिस्थिती सावरण्यासाठी घाई, राजकारण्यांचे आरोप-प्रत्यारोप. एकीकडे आपलेच मरण हतबलपणे पाहणारा, जीव मुठीत धरून ये जा करणारा सामान्य मुंबईकर हे सर्व निमुटपणे पाहत होता. काल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरचे हे चित्र.
खरंतर मुंबईकरांसाठी हे चित्र काही नवे नाही. दंगेधोपे, बॉम्बस्फोट, अतिवृष्टी, अग्नितांडव, छोटेमोठे अपघात आणि इतर अनेक आपत्ती झेलून मुंबईतील सामान्य माणूस गेली अनेक वर्षे झेलत उभा आहे. असं काही झालं की त्याच्या स्पिरीट वगैरेचं फार कौतुक होतं. पण ते तेवढ्यापुरतं. आठ पंधरा दिवस उलटले की लोक अशा घटना विसरून जातात.असो. मुंबईत जीवन किती धोकादायक आहे हे अशी एखादी घटना घडल्यावरच समोर येते. बाकी मुंबईकर हा रोजच प्राण तळहातावर घेऊन घराबाहेर पडत असतो. कधी काय होईल हे सांगता येत नाही. बरं मोठे अपघातच नाही, अगदी किरकोळ कारणांमुळेही मुंबईकरांचा बळी जातोय. कधी गटार कोसळून, कधी खड्ड्यात गाडी सापडून तर कधी एखाद्या झाडाची फांदी पडून मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. त्यात लोकल पकडताना, रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही भयावह आहे. मात्र असे अपघात मोठी घटना ठरत नसल्याने त्याची साधी चर्चाही होत नाही.
मोठी दुर्घटना घडली की मग त्यावरून चर्चा, वादविवाद होतात. संबंधितांच्या निलंबन, बरखास्तीचे देखावे उभे केले जातात. कुठेतरी तात्पुरती कारवाई केली जाते. उपाययोजनांचे कागदी घोडे नाचवले जातात. संबंधित समस्या सोडवण्यासाठी समित्या नेमल्या जातात. पण समस्येवर उपाय काही सापडत नाही. सामान्य मुंबईकरही झालं गेलं विसरून पुन्हा कामाला लागतात. हे गेली कित्येक वर्षे सुरू आहे.
आज मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. येणारे लोंढे थांबत नाहीत. त्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे, अशी सबब दिली जाते. काही अंशी त्यात तथ्यही आहे. पण मुंबईकरांच्या समस्या पूर्णपणे सोडवणे शक्य नसले तरी त्या काही प्रमाणात कमी करून सर्वसामान्यांचे जगणे काही प्रमाणात सुसह्य करणे नक्कीच शक्य आहे. आज मुंबईतील फुटपाथवर फेरीवाले आणि बाजूच्या दुकानदारांनी कब्जा केल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते. मग अपघात होतात. जर हे फुटपाथ मोकळे झाले आणि रस्त्यांचा दर्जा काही प्रमाणात जरी सुधरला तर मुंबईतल्या वाहतुकीच्या बऱ्याच समस्या सुटतील.
सामान्य मुंबईकरांची परीक्षा पाहणारी गोष्ट म्हणजे इथली लोकलसेवा. तिला मुंबईची जीवनवाहिनी वगैरे म्हणतात. पण हीच लोकलसेवा दररोज काही मुंबईकरांच्या जीवावर उठते. लोकलसेवेवर प्रचंड वाढणाऱ्या प्रवासीसंख्येचा ताण आहेच. पण रेल्वेकडून लोकलऐवजी मेल/एक्स्प्रेस वाहतुकीला प्राधान्य दिले जात असल्याने बहुतांश लोकल उशिराने धावतात. पण घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरासाठी हा उशीर न परवडणारा असतो. त्यामुळेच मग घाईगडबडीत अपघात होतात. अनेकजण बळी पडतात. पण प्रभावी उपाययोजना काही राबवली जात नाही.
आताही काल रात्री एवढा मोठा अपघात घडल्यानंतर सकाळी मुंबईकर घराबाहेर पडलाय. आपण चालत असलेला ब्रिज सुस्थितीत आहे की धोकादायक याचा विचार न करता तो त्यावरून चालतोय. त्याला घराबाहेर न पडणे परवडणारे नाही. कारण त्याच्यापैकी कुणावर कुटुंबाची जबाबदारी आहे. कुणाला मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च भागवायचाय. कुणाच्या डोक्यावर कर्जाचे हप्ते आहेत, तर कुणाच्या घरी आजारपण आहे. त्यामुळे ''जिना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ'' या गीतातील पंक्तीप्रमाणे जीवन मरणाची काळजी न करता मुंबईकर घराबाहेर पडतोय. पण त्याच्या जीवन-मरणाची फिकीर आहे कुणाला???