थंडीच्या लाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 02:37 AM2017-11-26T02:37:42+5:302017-11-26T02:41:22+5:30
आता मस्त थंडी पडायला लागली आहे. अशा वेळी गरम काही तरी प्यायला मिळावं अशी इच्छा होते. त्यासाठी आरोग्यपूर्ण अनेक पर्याय आहेत.
- भक्ती सोमण
हळूहळू थंडी सुरू झाली आहे. ही थंडी सुरू झाल्यावर मध्यंतरी पाऊसही पडला. त्यामुळे सगळीकडेच पर्यावरणाच्या बिघाडाविषयी चर्चाही झाली. पाठोपाठ आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी याविषयी अनेकांनी चर्चा केली. त्यामुळे या वेळच्या थंडीत आरोग्याच्या दृष्टीने काय खावे काय नाही याचेही मेसेजेस् यायला लागले. पण कुठलाही महिना असला तरी आपल्याला आरोग्याची काळजी ही घ्यावीच लागते. या काळात सरदी तर हमखास होतेच. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढवणे गरजेचे असते; आणि या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावते ती हळद. सध्या याच हळदीचं जगभरात महत्त्व एकाएकी खूपच वाढत चाललं आहे. एवढंच नाहीतर, गूगलवर स्पाईस असं सर्च केलं तर हळद आणि तिचं महत्त्व शोधणाºयांची संख्या सर्वाधिक आहे.
सरदी झाल्यावर हळद घालून दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. नाक मुरडत का होईना ते दूध प्यावं लागतं. पण एकाएकी हेच हळदीचं दूध आता तरुणाईला आपलंसं वाटतंय. हळदीच्या दुधाला नाव वेगळं दिलं, ते देण्याची स्टाईल बदलली तर... असंच गेल्या काही वर्षांपासून होतंय. ‘मिल्क लेट्टे’, ‘चाय लेट्टे’, ‘कॉफी लेट्टे’ ही हळदीचा समावेश असलेली पेयं लोक आनंदाने प्यायला लागली आहेत. हा प्रकार गेल्या आठवड्यात प्यायला मिळाला. ‘मिल्क लेट्टे’ या नावाच्या वेगळेपणामुळे ते प्यायलं तर होतं काय तर हळदीचं दूध आणि त्यासाठी मोजले चक्क २०० रुपये. याविषयी त्या हॉटेलच्या कर्मचाºयाने सांगितलं की, सध्या हळदीचं दूध पिण्याचं प्रमाण खूप वाढतं आहे. लोक आरोग्याचा विचार जास्त करतात त्यासाठी त्यांची कितीही पैसे मोजायची तयारी असल्याचे त्याने सांगितले. परदेशात हेच दूध ‘टर्मरिक लेट्टे’ नावाने मिळते आहे.
चाय किंवा कॉफी लेट्टेचाही असाच प्रकार. चहा किंवा कॉफीत लवंग, दालचिनी, चक्रीफुल, मिरी, सुंठ, वेलची, थोडीशी हळद घालून हे लेट्टे तयार होते. नावात वेगळेपणा आणि आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असल्याने या प्रकारांना आता ग्लॅमर प्राप्त झाले आहे. हळदीत अनेक शक्तिवर्धक गुणधर्म असल्याने तसेच ती अॅण्टीआॅक्सिडीन असल्याने आता नव्याने लोकांना तिचे महत्त्व खूप पटायला लागले आहे. त्यामुळे हळदीचा प्रभाव गेल्या काही वर्षांत खूप वाढत असल्याचे आहारतज्ज्ञ कांचन पटवर्धन यांनी सांगितले.
थोडक्यात काय तर, लोकांनी कितीही आधुनिक पद्धतीची पेयं प्यायली तरी पारंपरिक गोष्टींचं महत्त्व हे नेहमीच कायम राहणार यात शंका नाही.
गरमागरम सूप
हिवाळ्याच्या दिवसांत भाज्या मुबलक आणि ताज्या मिळतात. त्यामुळे या काळात विविध प्रकारचे सूप पिता येते. पौष्टिकतेच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर पालक सूप, टॉमेटो सूप हिवाळ्यात अत्यंत चांगले.
याशिवाय गाजर, मटार, फ्लॉवर, मश्रूम अशा भाज्यांचे मिक्स व्हेजिटेबल सूपही या काळात करता येते. त्यात कॉर्नफ्लॉअर घालून त्याला घट्टपणा आणण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा ते न घालता त्याचे पौष्टिकमूल्य जपता येऊ शकेल. हे सूप आता ग्लासमध्ये देण्याची पद्धतही सुरू झाली आहे.