गुगल माहितीवीरांचा डॉक्टरांशी वाद...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:22 AM2018-02-25T00:22:44+5:302018-02-25T00:22:44+5:30
आॅनलाइनच्या जमान्यामध्ये आजकाल बरेच रुग्ण हे त्यांच्या फॅमिली डॉक्टरपेक्षा आॅनलाइन उपलब्ध असलेल्या डॉक्टर गुगलचे जास्त जवळचे मित्र झाले आहेत. बरेच रुग्ण हे आपल्या आजाराविषयी आॅनलाइन माहिती वाचून येतात.
- डॉ. अमोल अन्नदाते
आॅनलाइनच्या जमान्यामध्ये आजकाल बरेच रुग्ण हे त्यांच्या फॅमिली डॉक्टरपेक्षा आॅनलाइन उपलब्ध असलेल्या डॉक्टर गुगलचे जास्त जवळचे मित्र झाले आहेत. बरेच रुग्ण हे आपल्या आजाराविषयी आॅनलाइन माहिती वाचून येतात. तसेच काही जण आॅनलाइन उपचारही घेतात. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, एखाद्या आजाराबद्दल आॅनलाइन माहिती घेणे यात काही वावगे नाही, पण ही बाब माहिती घेण्याइतपतच मर्यादित ठेवावी. गुगलच्या माध्यमातून आॅनलाइन माहिती घेऊन उपचार करणे म्हणजे सध्या तरुण पिढीमध्ये प्रचलित असलेल्या आॅनलाइन लाँग डिस्टन्स रिलेशनशिपसारखे असते. थोडक्यात आॅनलाइन उपचार म्हणजे मुलीचा फोटो बघून तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यासारखे आहे. तुम्हाला असलेल्या त्रासाबाबत आॅनलाइन निदान करण्यासाठी सर्च करता तेव्हा त्या आजाराचे साध्यातले साधे लक्षण सर्दी-खोकल्यापासून ते अगदी कॅन्सरपर्यंतची यादी समोर येते. त्यामुळे उगीचच मनामध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता असते.
आपल्या आजाराविषयी आॅनलाइन माहिती जरूर घ्यावी, पण त्याविषयी डॉक्टरांशी चर्चा करताना थोडासा संयम बाळगावा. डॉक्टरनी आपल्याला निदान समजून सांगितल्यानंतर हवे तर त्यांना आपण वाचलेल्या आॅनलाइन माहितीविषयी शंका विचारावी. हे विचारत असताना त्यांचे मत पूर्ण चुकीचेच आहे, असा आभास मात्र टाळावा.
हे दशक माहिती तंत्रज्ञानाचे दशक असल्याने वैद्यकीय क्षेत्रातही अशी माहिती तंत्रज्ञानाची क्रांती होणे अपेक्षित आहे. पण ही माहिती उपचारांना पूरक असावी, मारक नाही. आज गुगल हे फक्त माहितीचे स्रोत नसून ते पनणाचे एक साधनही आहे. त्यामुळे गुगलचे सर्च इंजीन आॅप्टिमायझेशनच्या माध्यमातून अनेक विक्रेत्यांनी एखाद्या आजाराबद्दल विचारल्यास आपलीच माहिती दाखवली जावी अशी व्यवस्था केलेली असते. त्यामुळे बºयाच रुग्णांची फसवणूक होण्याची शक्यता असते. यात काही आॅनलाइन जाहिरातबाजीच्या माध्यमातून रुग्णांच्या गळी उतरवल्या जाणाºया औषधांचाही समावेश असतो.
वैद्यकीय शास्त्र हे रुग्णांची शारीरिक तपासणी केल्यानंतर व त्याच्याशी सविस्तर संवाद साधल्यानंतर निदान पक्के करण्याचे शास्त्र आहे. बºयाचदा असे दिसून येते की, आॅनलाइन तासन्तास वाचणारे लोक मात्र डॉक्टरकडे आल्यावर तपासणीसाठी घाई करत असतात. पण स्टेथोस्कोपने व डॉक्टरांच्या स्पर्शाने झालेल्या फिजिकल एक्झामिनेशनची जागा की-बोर्ड व माउस घेऊ शकत नाही. एखाद्या आजारासाठी डॉक्टरांची नावे सुचविणाºया व डॉक्टरांची जाहिरात करणाºयाही बºयाच वेबसाइट आज बाजारात उपलब्ध आहेत. कुठलाही डॉक्टर पैसे भरून या वेबसाइटवर आपली जाहिरात करू शकतो. पण आपल्या ओळखीच्या माध्यमातून मिळालेल्या डॉक्टरांचा रेफरन्स हा जास्त विश्वासार्ह असतो. नाही तर केवळ आॅनलाइन नाव आहे म्हणून जास्त विश्वासार्ह या फसव्या समजुतीतून दिशाभूल होऊ शकते. थोडक्यात आॅनलाइन माहिती घेणे काही वाईट नाही, पण आपल्या समोर थेट संपर्कात असलेल्या डॉक्टरपेक्षा आॅनलाइन माहितीवर जास्त विश्वास ठेवणे आपल्या उपचारांना घातक ठरू शकते.