किल्ले केळवे माहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:29 AM2017-10-15T00:29:16+5:302017-10-15T00:29:40+5:30
- गौरव भांदिर्गे
किल्ल्यावर पोहोचण्याच्या वाटा :
केळवे बीच तर सर्वांना परिचित आहे. याच केळवे-पालघर रस्त्यावर, केळवे गावापासून ४ कि.मी.वर माहिम गाव आहे. माहिमच्या सरकारी दवाखान्याच्या मागे माहिमचा किल्ला आहे.
किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे :
खरे तर पोर्तुगीजांनी ज्या वेळी हा किल्ला बांधला, त्या वेळी किल्ल्याभोवती त्रिकोणी तट होता. प्राचीन काळी समुद्राचे पाणी किल्ल्याच्या तटास भिडत असे. त्या वेळी किल्ल्याचा आकार बराच मोठा होता. आता केवळ बालेकिल्ल्याचा भाग शिल्लक आहे. किल्ल्याच्या पूर्व, दक्षिण व उत्तर या तीनही दिशांना गडावरील शिबंदीसाठी घरे बांधण्यात आली होती व किल्ल्याच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळ दोन पंचकोनी भक्कम बुरूज बांधण्यात आले होते. याच पूर्व प्रवेशद्वाराने आपण किल्ल्यात प्रवेश करायचा, हे पंचकोनी बुरूज खरोखर सुंदर आहेत. आपण मूळ किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या समोरच्याच बाजूला एक कोरडी विहीर व पोर्तुगीज कचेरीचे काही अवशेष आपणास पाहायला मिळतात व समोर नजर फेकताच डोळ्याचे पारणे फेडणारे दर्शन घडते, ते म्हणजे या किल्ल्याला असलेला दुहेरी जिना. या जिन्याने आपण किल्ल्याच्या तटावर दोन्ही बाजूने जाऊ शकतो. जिन्याने चढून गेल्यावर आपण फांजीवर पोहोचतो. त्यावरून किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते. जिन्याच्या टोकाला दुसरे प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या पंचकोनी भागात प्रवेश करतो. या भागात तटबंदीत अनेक झरोके आहेत. त्यांचा उपयोग टेहळणीसाठी व तोफा ठेवण्यासाठी केला जात असे. किल्ल्याच्या बाहेर भवानी मंदिर आहे.
इतिहास : केळवे माहिमचे मूळ नाव मत्स्यमत्, त्याचे पुढे झाले महिकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचीन काळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या म्हणजेच आजच्या मुंबई समुद्रकिनाºयावर आपले राज्य स्थापन करून, त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. राजा बिंबाने निर्माण केलेले स्थान म्हणून या राज्याला ‘बिंबस्थान’ म्हणूनसुद्धा ओळखले जाऊ लागले. त्याच काळात माहिमचा मूळ किल्ला बांधण्यात आला. पुढील काळात सरदार भीमराव याने हा किल्ला ताब्यात घेतला. १४व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला. इ. स. १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी हा गड जिंकून घेतला व त्याची डागडुजी करून त्यास मजबुती आणली. छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स. १६८४ मध्ये माहिमवर हल्ला चढविला होता, पण वेढा देऊन बसण्याइतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे किल्ला ताब्यात आला नाही. इ.स. १७३७ साली मराठ्यांनी माहिम किल्ल्याला वेढा घातला. त्या वेळी मराठे व पोर्तुगीज यांच्यात मोठी लढाई झाली. मराठ्यांची संख्या कमी होती, त्यातच रामचंद्रपंत यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे मराठ्यांनी माघार घेतली. ९ जानेवारी १७३९ रोजी चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली आठ हजार घोडेस्वार, सहा हजार हशम व १२ तोफांच्या मदतीने माहिमला वेढा घातला. २० जानेवारी १७३९ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.