घाटकोपर विमान दुर्घटना : वर्ष उलटल्यानंतरही चौकशीमध्ये प्रगती नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 03:23 AM2019-06-28T03:23:19+5:302019-06-28T03:24:16+5:30
घाटकोपर येथे छोटेखानी विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानातील ४ जण व एक पादचारी अशा ५ जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबई - घाटकोपर येथे छोटेखानी विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानातील ४ जण व एक पादचारी अशा ५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला एक वर्ष होत आले तरी अद्याप याबाबत प्राथमिक चौकशी अहवालदेखील सादर करण्यात आलेला नाही.
२८ जून २०१८ रोजी घाटकोपर येथे १२ आसनी किंग एअर सी ९० विमानाचे चाचणी उड्डाण करताना अपघात झाला होता. विमान कोसळून त्यामधील सर्व चार व्यक्ती व एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या अपघाती विमानाची २०१५ पासून दुरुस्ती सुरू होती. कॅप्टन प्रदीप सिंह राजपूत व सहवैमानिक मारिया जुबेरी विमान चालवत होते. त्यामध्ये मेंटेनन्स इंजिनीअर सुरभी गुप्ता व तंत्रज्ञ मनिष कुमार पांडे हे प्रवास करत होते. जुहू येथील विमानतळावरून विमानाने उड्डाण केले होते व जुहू येथे पुन्हा लँडिंग करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मुंबईतील यूवाय एव्हिएशन प्रा.लि. मालकीचे हे विमान दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोसळले. त्या वेळी महिनाभरात प्र्नाथमिक अहवाल सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप हा अहवाल तयार झालेला नाही.
एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अद्याप प्राथमिक तपास अहवाल जाहीर केलेला नाही. या अपघातात जवळची व्यक्ती गमवावी लागलेल्यांनी वर्षभरात अनेकदा न्यायासाठी प्रयत्न केले़ अद्याप त्यांना न्याय मिळू शकलेला नाही. सहवैमानिक मारिया जुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया यांनी याबाबत अनेकदा दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला़ त्यांना पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. मनिष पांडेची पत्नी सुनीता चतुर्वेदी यांच्या घरात दुसरे कोणी कमावणारे नसल्याने त्यांना आपल्या पित्याकडे आर्थिक मदतीसाठी पाहावे लागत आहे. अद्याप त्यांना इन्शुरन्सची रक्कमदेखील मिळालेली नाही. कितीही अडचणी आल्या तरी या प्रकरणी पाठपुरावा करून दोषींना शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या अपघाती विमानाची २०१५ पासून दुरुस्ती सुरू होती. कॅप्टन प्रदीप सिंह राजपूत व सहवैमानिक मारिया जुबेरी विमान चालवत होते. त्यामध्ये मेंटेनन्स इंजिनीअर सुरभी गुप्ता व तंत्रज्ञ मनिष कुमार पांडे हे प्रवास करत होते.