उगवणारा प्रत्येक दिवस : मराठी भाषा दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 04:33 AM2018-02-25T04:33:22+5:302018-02-25T04:33:22+5:30
अभिजनांच्या रांगेत बसायचे, तर त्यांच्यासारखंच मुलांना इंग्रजी शाळेत घालायचे, हे यांच्या मनावर नकळत पण पक्क कोरलं गेलं आहे. तरीही हा वर्ग आपली भाषा जागतिक झाल्याचा अभिमान बाळगतो.
- साधना गोरे
अभिजनांच्या रांगेत बसायचे, तर त्यांच्यासारखंच मुलांना इंग्रजी शाळेत घालायचे, हे यांच्या मनावर नकळत पण पक्क कोरलं गेलं आहे. तरीही हा वर्ग आपली भाषा जागतिक झाल्याचा अभिमान बाळगतो.
उद्यावर येऊन ठेपलेल्या ‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने, एका संवादाची आठवण सांगाविशी वाटतेय. मागे मुंबईतल्या एका नामांकित प्रकाशकांच्या कार्यालयात काही कामानिमित्ताने गेले असताना, तिथे मराठी मालिकेत अन् चित्रपटात काम करणारे एक अभिनेते आले होते. मराठीतल्या एका नावाजलेल्या वर्तमानपत्रात त्यांनी लिहिलेले स्तंभलेखन त्यांना पुस्तक रूपाने प्रकाशित करायचे होते. मराठी भाषेचे-शाळेचे काम करणारी कार्यकर्ती म्हणून प्रकाशकांनी माझी ओळख करून दिली. लगेचच त्यांच्या चेहºयावर या काळात लोक अजूनही मराठी भाषेसाठी अन् शाळेसाठी काय म्हणून काम करत असतील? असा भाव आतापर्यंतच्या अशा अनेक अनुभवाने वाचता आला. पुढे आमचा जो संवाद झाला, तोही अर्थातच अनेक अनुभवांपैकीच एक होता.
अभिनेता म्हणाला, मी माझ्या मुलाला कॉन्वेंटमध्ये घातलेय. एकदा त्याच्या टीचरने तो शाळेत इंग्रजी बोलत नाही, म्हणून कम्प्लेंट केली. तेव्हा त्यांना भेटून सांगितले की, त्याच्यावर इंग्रजी बोलायची अजिबात सक्ती करू नका. त्याला वाटेल, तेव्हा तो इंग्रजी बोलू लागेल. आम्ही घरी मुलाशी मराठीतूनच बोलतो. मी स्वत: कॉन्वेंटमध्ये शिकलोय, तरी माझे मराठी उत्तम आहे. उलट माझे स्तंभलेखन वाचून लोक मला विचारतात की, कॉन्वेंटमध्ये शिकूनही तुझी मराठी एवढी चांगली कशी? तेव्हा मला वाटते की, माध्यमाचा अन् भाषा येण्याचा तसा काही संबंध नसतो.
इथं मराठी भाषा अन् माध्यमाविषयी या अभिनेत्यानं व्यक्त केलेलं मत हे आपल्या समाजातील उच्चवर्गातील अनेकांचं प्रातिनिधिक मत आहे. हे उच्चवर्गीय कुणी अभिनेते असतात, वकील असतात, पत्रकार असतात, शिक्षक असतात, तर कुणी साहित्यिक असतात. समाजातल्या अनेक प्रश्नांवर पोटतिडकीने बोलणारा अन् खोलात जाऊन विचार करणारा हा वर्ग, भाषेबाबत एवढा विसंगत कसा वागू शकतो? एकीकडे भाषा अन् शाळेच्या माध्यमाचा संबंध नाही म्हणायचा अन् मुलासाठी शाळा निवडताना मात्र इंग्रजी निवडायची. या वर्गाच्या विचारांतील ही विसंगती इथंच संपत नाही, तर यातले अभिनेते, पत्रकार, शिक्षक, साहित्यिक यांचे पोटपाणी अन मानसन्मान तर थेट मराठी भाषेच्या अस्तित्वावरच अवलंबून आहे, तरी त्यांना आपली भाषा टिकायला हवी असेल, तर आधी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, यातील थेट सुसंगती लक्षात येत नाही का? कशी लक्षात येईल? आपल्या साहित्यिकांना तर मराठी भाषा अन् शाळेचा प्रश्न अजूनही मुंबई-पुण्यापुरताच मर्यादित वाटतो. खेड्यात पसरलेल्या इंग्रजी शाळांचे जाळं लक्षात यायला आधी या साहित्यिकांचा एखाद्या खेड्याशी तेवढा संबंध तर हवा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासंबंधी एखादी सह्यांची किंवा तत्सम एखादी मोहीम राबविली की, साहित्यिकांचे भाषाकार्य कळस गाठते. मग मराठी शाळेत आमची मुले शिकली नाहीत, तरी चालतील. वकिलाने न्यायाधीशांसमोर काय बाजू मांडली अन् न्यायाधीशाने खटल्याचा काय निकाल दिला, हे गरीब अडाण्याला नाही कळले तरी बेहत्तर. आम्ही लिहीत असलेल्या कथा-कादंबºया वाचायला भविष्यात त्या भाषेतला कुणी वाचक नाही मिळाला तरी चालेल. एवढं आम्हाला आमच्या भाषेबद्दल वैराग्य आलेलं आहे.
मराठी शाळा टिकल्या, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान, समाजमाध्यमे यांतील मराठी भाषेचा वापर वाढला, तर उगवणारा प्रत्येक दिवस मराठी भाषेचाच असेल, असं वाटतं.