एक पवित्र बंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:09 AM2018-02-11T01:09:15+5:302018-02-11T01:09:30+5:30
पाश्चात्त्य देश कौटुंबिक कलहाने इतके त्रस्त आहेत की, ते भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. नि आपण? वेड्यासारखे ‘वेस्टर्न’ व्हायला बघतोय.
- डॉ. विजया वाड
पाश्चात्त्य देश कौटुंबिक कलहाने इतके त्रस्त आहेत की, ते भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. नि आपण? वेड्यासारखे ‘वेस्टर्न’ व्हायला बघतोय.
मुळात विवाहसंस्थेला धक्का मारण्याचे काम पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव हेच आहे, असं वाटतं. ‘मी, माझं, मला’ यातून बाहेर पडून ‘आपण, आपलं, आपल्यासाठी असं वाटायला वेळ लागतोच. आजकाल ‘हम दो हमारे एक’च्या जमान्यात मुलीही एकुलत्या, लाडाकोडात वाढलेल्या असतात. सासरी आल्यावर साºया सवयी एका रात्रीत उचकटणं शक्यय का? बरं मुलगा ‘शेअर’ करणं त्याच्या आईला जड जातं ते वेगळंच!
हल्ली व्हॉटस्अपवर एक विनोद फार बोकाळला होता. दोन मैत्रिणी हितगुज करतायत. ‘‘माझा मुलगा गं! बायकोचा बैल गं नुसता. भांडी घासतो. स्वैपाक करतो. आईशीला केली होती का कधी अशी मदत?’’
‘‘खरंच गं! नि तुझा जावई गं?’’
‘‘जावई माझा देव माणूस बघ! भांडी घासतो, स्वैपाक करतो. माझ्या लेकीचं मन जाणतो.’’ वा! आहे ना मज्जा, सुनेस मदत? बायकोचा बैल! लेकीस मदत? देव माणूस! असा भेदभाव करू नका बायांनो. तुमची सूनही कुणाची तरी मुलगीच आहे, हे कधीही विसरू नका.
‘विवाह’ हा दोन व्यक्तींपुरता मर्यादित न राहता, तो दोन कुटुंबांवर दीर्घकालीन परिणाम करतो, ही गोष्ट प्रत्येक कुटुंबाने लक्षात घ्यायला हवी. आणि खरं सांगू का रसिकांनो, पाश्चात्य देश कौटुंबिक कलहाने इतके त्रस्त झाले आहेत की, ते भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. नि आपण? वेड्यासारखे ‘वेस्टर्न’ व्हायला बघतोय. मी १४ देशांतल्या उमलत्या वयाच्या मुलांबरोबर संवाद साधला आहे. शपथ सांगते, प्रत्येक पाचवं घर मोडकं. एकतर सावत्र बाप नाहीतर सावत्र आई! मुलं रडवेली. अहो, ११ ते १४ मधली ‘गोरी’ ‘काळी’ सारी सारखीच हो चिमणपाखरं. मी आपल्या मुलांना सांगते, ‘चिडले भांडले, तरी तुमचे आई-बाबा तुमच्यासाठी एकत्र जगतात.’.. पण यासाठी विवाह संस्थेचं पावित्र्य लक्षात घ्यायला हवं ना?
माझ्या लग्नाला आता ५० वर्षे झाली. विशीतली मी खूप लाडावलेली नि हट्टी होते. आई नि दादाची ‘जान’ होते. वाडांकडे हे हट्टी! एकुलते एक! मग युद्ध. बाहेर मी मसाले डोसा मागविला तर हे फक्त चहा घेणार. मला देवानंदचा पिक्चर हवा, तर हे अशोककुमारसाठी अडणार! मी आईला माझे ‘दु:ख’ सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘विजू, चार वेळा ‘त्यांच्या’ मनासारखं वाग. पाचव्यांदा लाज वाटून नवरा तुझ्या मनाजोगं वागेल, न वागला तर ये परत!’’ पण हे वागले पाचव्यांदा मनाजोगा! लाज वाटून का होईना! पण म्हणूनच लग्न टिकलं ना! संसार असेच चालतात गं पोरींनो, थोडं तुझं थोडं माझं! थोडं ‘आपलं’ दोघांचं.
आणि खरं सांगू का? दुसºया घरात पोरीचं ‘कलम’ होतंय हे सासूनं ध्यानी घ्यावं. तिला नवं घर ‘आपलं’ वाटेल अशी वागणूक द्यावी. तुम्ही बघा ना! सासरे तेवढे का हवेहवेसे वाटतात? नि सासू का बरं नक्कोशी वाटते? कारण ‘तिला’ घरात नि मुलात प्रेमाची वाटेकरीण सहन होत नाही. मला तर वाटतं, मॅरेज काउन्सिलिंग फक्त मुलगा नि मुलगी यांचे होऊ नये, तर मुलाचे आणि मुलीचे आईवडील यांचेही व्हावे.
मुलीचे आईवडील मुलींच्या लग्नानंतर फार एकटे पडतात. मी दोन मुलींची आई आहे. दोन्ही मुलींनी एका महिन्यांच्या अंतराने लग्ने केली नि आम्ही दोघे अपार एकटे झालो. हे एकटेपण फार भयाण, डिप्रेसिंग असते. मुलींच्या माता मग सतत सासरी फोन करून हैराण करतात. मुलींच्या संसारात फार डोकावू नका. ‘असं बोलला तुला? ये माहेरी निघून...’ असले ‘ब्रेकिंग’ सल्ले नकोत. पझेसिव्हपणा कमी करा. ‘आमची मुलगी... आमची मुलगी!’ सारखं तुणतुणं नको. नाहीतर मुलगी ‘केविलवाणी’ होते. आणि सासरच्यांनो, तीही कमावते. पगारातला छोटासा हिस्सा तिला आईबापाला द्यावासा वाटला, तर ‘ना’ नको. समजूतदारपणा फार महत्त्वाचा.
आपल्यात ‘सेक्स’ हा विषय उघडपणे बोलला जातच नाही. हे चुकीचे आहे. ‘शिघ्रपतन’ होणारे पुरुष बायकोला कमालीचे दु:खी करतात. हे वैवाहिक समुपदेशन करताना मी वारंवार अनुभवले आहे, तसेच ‘थंड’ स्त्रिया पुरुषांना नाउमेद करतात. साद-प्रतिसादाविना कामेच्छा पूर्ण होत नाही, पण अर्धवट ज्ञान खूपदा दु:खाला निमंत्रण देते. ‘विवाह’ या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. ‘वि’संवाद विसरू या. एकच सूर ‘वा’जवू या. ‘ह’सत-खेळत सहजीवनाची सुंदर वाट चालू या.
(लेखिका या ज्येष्ठ साहित्यिका आहेत.)