सेकंड मॅरेज करताय... तर जरा जपून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:56 AM2018-02-11T00:56:36+5:302018-02-11T00:59:42+5:30
वाढती स्पर्धा. जबाबदारी. त्यात अर्ध्यावर सोडून गेलेल्या जोडीदारामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी, बरेच जण घरच्यांच्या आग्रहाखातर सेकंड मॅरेजला पसंती देतात. कुटुंबीयांकडूनच मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर त्यांच्या माहितीचे भले मोठे प्रोफाइल टाकले जातात. ‘ती’ आणि ‘तो’ मात्र त्याच्या आयुष्यात व्यस्त असतात.
- मनीषा म्हात्रे
वाढती स्पर्धा. जबाबदारी. त्यात अर्ध्यावर सोडून गेलेल्या जोडीदारामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी, बरेच जण घरच्यांच्या आग्रहाखातर सेकंड मॅरेजला पसंती देतात. कुटुंबीयांकडूनच मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर त्यांच्या माहितीचे भले मोठे प्रोफाइल टाकले जातात. ‘ती’ आणि ‘तो’ मात्र त्याच्या आयुष्यात व्यस्त असतात. लग्नाची आशा सोडून दिली असताना, अचानक आलेल्या चांगल्या मागणीने आशा पल्लवित होतात आणि भावनिक ओढ निर्माण होते. याचाच फायदा घेत, सध्या या आॅनलाइन वधू- वरांच्या रांगेत आॅनलाइन ठग दबा धरून बसलेले आहेत. त्यामुळे सेकंड मॅरेज करत असाल, तर जरा जपूनच.
उच्चशिक्षित. मनोरंजन कंपनीची मुख्याधिकारी असलेल्या नेहाचा (नावात बदल) वयाच्या ४५व्या वर्षी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर लग्नाचा शोध सुरू होता. एका बहुराष्ट्रीय कंपनीत उपाध्यक्ष असलेल्या नेहाला ब्रिटिश नागरिक असलेल्या तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. नेहमी यशामागे धावणारी नेहा सध्या त्याच्या प्रेमात वाहू लागली. आपले सुख-दु:ख त्याच्यासोबत शेअर करू लागली. पीटरने आपल्या आई-वडिलांशीही नेहाचे बोलणे करून दिले. नेहा या कुटुंबीयांमध्ये इतकी गुंतत गेली की, तिने त्यांना ‘मॉम-डॅड’ असे बोलायला सुरुवात केली. यातच ‘आमचा इंग्लंडमध्ये वडिलोपार्जित व्यवसाय आहे, पण सध्या आईला कॅन्सर झाल्याने, त्यावर औषध शोधण्याच्या कामाला लागलोय, त्यासाठी तुझीही मदत लागेल...’ असे तरुणाने सांगितले आणि तिच्याकडून ‘उपचारांसाठी औषधी बिया विकत घ्यायच्या आहेत,’ असे सांगून तब्बल १ कोटी १ लाखांहून अधिक पैसे उकळले. यामध्ये ती कर्जबाजारी झाली. पैसे मिळाल्यानंतर या टोळीने संपर्क तोडला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली आणि यामागील नायजेरियन टोळीचा पदार्फाश झाला.
नेहासारख्या अशा अनेक तरुणी सध्या या जाळ्यामध्ये अडकत आहेत. या संकेत स्थळावर आपला संपूर्ण बायोडाटा असतो. ही ठग मंडळी वधू व वराच्या यादीत आपली नावे नोंदवितात. खोटे प्रोफाइल टाकतात. बसल्या जागी सर्व माहिती उपलब्ध होत असल्याने, घटस्फोटीत, विधवा अशा सेकंड मॅरेजसाठी इच्छुक आणि वयस्कर महिलांना ते रिक्वेस्ट पाठवतात. या वयात आपल्याला एवढे चांगले स्थळ आलेले पाहून महिला, पुरुष त्या स्वीकारतात. यातून ओळखीचे रूपांतर प्रेमात होते. लग्नाचे आमिष दाखवून विविध कारणे सांगून त्यांची फसवणूक केली जाते.
एनसीआरबीने जाहीर केलेल्या २०१६च्या आकडेवारीत सायबर गुन्ह्यांत ७११ जणांची फसवणूक झाली. या गुन्ह्यांत विवाह संकेतस्थळावरील फसवणुकीचे प्रकार अधिक आहेत.
आॅनलाइन लग्न ? नको रे बाबा
या आॅनलाइन लग्नाच्या ठगीच्या बाजारात तरुण-तरुणीही ब्लॅकमेलिंग, लूट, बलात्कारासारख्या गुन्ह्यांना बळी ठरताना दिसतात. काहींची जुळलेले विवाह यशस्वीदेखील झाले. काही ठिकाणी लग्न करून नंतर पैसे आणि दागिने घेऊन ठग पसार झाल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे यात फसल्या गेलेल्या तरुण-तरुणीकडून ‘आॅनलाइन लग्न नको रे बाबा’चा सूर उमटताना दिसत आहे.
जनजागृती महत्त्वाची
मुंबई सायबर सेलकडून अशा विवाह संकेत स्थळाबाबत वेळोवेळी जाहिरात, बड्या कंपन्या, सामाजिक संस्थाच्या मदतीने जनजागृतीचा विडा उचलला जातो. मात्र, दुर्दैव म्हणजे, यामध्ये फसले जाणारे हे उच्चशिक्षितच असतात. त्यामुळे याबाबत जनजागृतीसाठी सुजाण नागरिकांनीच पुढे येणे गरजेचे आहे.
जबाबदारी संकेतस्थळांची
विवाह संकेतस्थळ संस्थापकांनीही याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे होत असलेल्या नोंदणीची खातरजमा करणे त्यांचीही जबाबदारी आहे. मात्र, अनेक ठिकाणी मोफत नोंदणीच्या नावाखाली ही मंडळी आकडेवारीवर भर देताना दिसतात.
हे करा...
आॅनलाइन स्थळ आल्यानंतर त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे.
सबंधित व्यक्ती आणि त्याच्या माहितीबाबत कुटुंबीयांना सांगा.
समोरची व्यक्ती कोण आहे, हे जाणून घेतल्याशिवाय त्याच्याशी संवाद साधू नये.
अनेकदा समोरच्या फोटोमागील व्यक्ती कोण आहे हे ओळखणे कठीण असते. अशा वेळी त्याच्या अन्य सोशल साइटवरील माहिती पाहणे गरजेचे आहे.
हे करू नका...
एखादे आॅनलाइन स्थळ येताच ते लगेच स्वीकारू नका. त्याची माहिती घेणे गरजेचे आहे.
आपले फोटो, गोपनीय माहिती, पासवर्ड शेअर करू नका. एखादी माहिती इंटरनेटवर शेअर झाल्यास ती कधीच काढू शकत नाही.
लग्नाचे आमिष दाखवून ती व्यक्ती पैशांचा व्यवहार करू इच्छित असेल, तर असे व्यवहार करूच नयेत. जिथे पैशांची मागणी होत आहे, ते बनावट खाते असण्याची ९९ टक्के शक्यता आहे. तुम्ही पैसे देण्यास नकार दिल्यास, सबंधित व्यक्ती तुमच्याशी आपोआपच संपर्क तोडेल.
एकटे भेटायला जाऊ. नका पहिल्या भेटीदरम्यान कुटुंबीयांना सोबत घ्या. त्यांना याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.