कळतंय पण वळत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:05 AM2018-02-18T01:05:39+5:302018-02-18T01:05:53+5:30
जीवनावश्यक बाब निसर्गाने अन्न, पाणी आणि निद्रा जगण्यासाठीच्या आवश्यक बाबी म्हणून मानवावर लादल्या आहेत. त्यापासून जगभरच्या कुठल्याही मानवाची सुटका नाही. यातली एखादी गोष्ट दीर्घकाळ मिळाली नाही तर त्याचा जीव धोक्यात येतो. वस्त्रं ही सांस्कृतिक व संरक्षक गरज मानवाने स्वत:च विकसित केली.
- माधव शिरवळकर
जीवनावश्यक बाब निसर्गाने अन्न, पाणी आणि निद्रा जगण्यासाठीच्या आवश्यक बाबी म्हणून मानवावर लादल्या आहेत. त्यापासून जगभरच्या कुठल्याही मानवाची सुटका नाही. यातली एखादी गोष्ट दीर्घकाळ मिळाली नाही तर त्याचा जीव धोक्यात येतो. वस्त्रं ही सांस्कृतिक व संरक्षक गरज मानवाने स्वत:च विकसित केली. मानवाव्यतिरिक्त कुठल्याही प्राणिमात्राला वस्त्राची गरज लागत नाही. वस्त्रानंतर कितीतरी शतकांनी मानवाने नवी गरज तयार केली ती मोबाइल किंवा सेलफोनच्या रूपाने. आपल्या अंगावर आकर्षक, बहुरंगी, उंची, श्रीमंती फॅशनने युक्त असे वस्त्र असावे ही मानवाची उपजत इच्छा त्याला समजायला लागल्यापासून मनात तयार होते. नवे कपडे, इतरांपेक्षा चांगले कपडे दिले की अजाण बालकाला कोण आनंद होतो. तसाच प्रकार आता मोबाइल फोनच्या बाबतीत झाला आहे. डॅडींसारखा, ममीसारखा मोबाइल फोन हवा, अशी इच्छा आता दोन वर्षांच्या बालकाचीही असते. मोबाइल फोनमध्ये जे चित्र दिसते, हलते, बोलते, स्पर्श केला की प्रतिसाद देते, हसवते, गंमत करते, त्यातले काही त्या बालकाला कळो न कळो पण हवेहवेसे वाटते. गरज प्रस्थापित होते ती त्या टप्प्यापासूनच. पुढे ही
गरज फुलत जाते.
त्या फुलण्यात काही फुलं आणि बरेच काटे असतात. यातली गंमत म्हणजे, एकीकडे गरज फुलत जाते आणि दुसरीकडे वय. वाढत्या वयातल्या एका क्षणी मोबाइलच्या बाबतीत माणूस इतका आत्ममग्न बनतो की ते एक प्रकारचे कोमात जाणेच असते. मान खाली घालून मोबाइलच्या डबीत डोके घालणारा किंवा कानात वायरचे बोळे घालून फक्त स्वत:च्या अंतरंगात जागेपणी डुलक्या घेणारा समाज आजकाल रस्त्यावर चालताना, वाहनांमध्ये वा कुठे कुठे भेटत राहतो. मोबाइलच्या पडद्याने, खरे तर, माणसाचे जग मोठे करायचे, पण प्रत्यक्षात मात्र त्याचे जग त्याच्याच चिमटीत मावणारे म्हणजे बोन्साय होऊन जाते. ही स्थिती आली की मग मोबाइलचे व्यसन अनिष्ट आहे वगैरे चर्चेला उधाण येऊ लागते. चहा-कॉफी, सुपारी, तपकीर, दारू, तंबाखू, धूम्रपान, अमली पदार्थ सेवनासारख्या व्यसनाच्या पगड्याच्या आपल्या मर्यादा आहेत. पण, कोणत्याही व्यसनातील पदार्थ ही जीवनावश्यक गोष्ट कधीच नसते. मोबाइल आणि इतर व्यसनांमध्ये हाच मोठा फरक आहे. मोबाइल ही एकाच वेळी जीवनावश्यक गोष्टही असते आणि त्याच वेळी कोमात नेऊन व्यसनाधीन करणारी गोष्टही तीच असते. व्यसन सोडावे तर जीवन कसे जगायचे हा प्रश्न पडतो.
मोबाइल : उपाय आणि अपाय
1मोबाइल हातात असला की वेगळाच अनामिक आत्मविश्वास मनाला जाणवतो. सगळं आपल्या हातात आहे, सुरक्षित आहे ही अर्धखोटी भावना मनात पूर्ण फुललेली असते. ते आपलं वाचन असतं, ते आपलं श्रवण असतं, ते आपलं दृश्य माध्यम असतं, ती आपली बँक असते, ती आपली रोजनिशी असते, तो आपला अल्बम असतो, तो आपला कॅमेरा असतो, ते आपल्या प्रियजनांशी संवाद करण्याचं साधन असतं. ते आपलं सगळं काही असतं. असं ‘सगळं काही’ (म्हणजे सर्वस्वच की !) हातात घट्ट व पासवर्डच्या एकनिष्ठतेने राहत असताना ते कोण कसं गमावणार? कसं सोडणार? त्यामुळे प्रश्न वा मुद्दा व्यसन लागलं म्हणून मोबाईल सोडण्याचा नसून, मोबाइल न सोडता व्यसनाला लक्ष्मणरेषेच्या बाहेर ठेवण्याचा आहे.
2गोम तेथेच आहे. व्यसनाला लक्ष्मणरेषेच्या आत जो जो किंवा
जी जी, येऊ देईल त्याची त्याची किंवा तिची तिची सीता होईल. अशोकवन भले कितीही रम्य असो, पण शेवटी तो बंदिवासच असणार. आजच्या जगाने लक्ष्मणरेषेची ही वास्तवता ओळखली आहे. नाही असं नाही. कळतंय, पण वळत नाही अशा मोडमध्ये सध्याच्या मोबाइल वापरकर्त्यांचं जग आहे. मात्र, सध्या फक्त चर्चा चाललेली आहे. वास्तवतेवर नेमकं बोट ठेवलं जातं आहे. नेमके उपाय अमुक
तमुक आहेत. आठवड्यातून एक दिवस सेलफोनला सुट्टी द्या.
मुलांबरोबर खेळा.
(लेखक हे माहिती आणि तंत्रज्ञान विषयाचे तज्ज्ञ आहेत.)