वेडे आतले नि बाहेरचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 03:02 AM2017-09-10T03:02:20+5:302017-09-10T03:02:45+5:30
खरे म्हणजे, वेडेपणा हा नेहमीच वेडाचार नसतो. कधी-कधी तर वेडेपणाने इतिहास घडतो. नव्हे... वेड्यांनीच इतिहास घडविलेला दिसतो.वेडेपणा अन् शहाणपणा यात फारसे अंतर नसते.
- डॉ. नीरज देव
खरे म्हणजे, वेडेपणा हा नेहमीच वेडाचार नसतो. कधी-कधी तर वेडेपणाने इतिहास घडतो. नव्हे... वेड्यांनीच इतिहास घडविलेला दिसतो.वेडेपणा अन् शहाणपणा यात फारसे अंतर नसते. प्रत्येक शहाणपणात वेडेपणा व वेडेपणात शहाणपणा भरलेला असतो. त्या शास्त्रज्ञाची गोष्ट आठवते का, त्याने मांजरासाठी एक व मांजराच्या पिल्लासाठी दुसरे अशी दोन छिद्रे पाडली होती अन् एकाच छिद्र्रातून दोहोंना बाहेर येताना पाहून चकीत झाला होता. त्याने पाडलेली दोन स्वतंत्र छिद्र्रे हा व्यावहारिक वेडेपणा होता, तर त्यावरून मांडलेला सिद्धांत विलक्षण शहाणपणा होता.
वेडेपणा आणि शहाणपणा यातले नेमके अंतर किती? मला वाटते चिमूटभर! वा फार तर मूठभर! चिमूटभर वेडेपणा शहाणपणा ठरतो, तर मूठभर शहाणपणा वेडेपणा ठरतो!
खरे म्हणजे, वेडेपणा हा नेहमीच वेडाचार नसतो. कधी-कधी तर वेडेपणाने इतिहास घडतो. नव्हे... नव्हे... वेड्यांनीच इतिहास घडविलेला दिसतो. बघा नं चिमुकल्या शिवबाच्या मागे उभी राहिलेली मूठभर तरी
मणभर माणसे, त्या काळी तरी वेडीच होती ना?
पण मनोरुग्णालयाच्या जोड भिंतीमागे कोंडलेले वेडे वेगळेच असतात. त्यांचे विश्व त्यांचेच असते. त्या विश्वात तेच असतात, त्यांचे राजे अन् त्यांचे गुलाम! रमत असतात ते त्यांनीच निर्माण केलेल्या कोशात! तसे प्रत्येकाचे आपापले कोश असतातच की, श्रद्धेचे... अंध:श्रद्धेचे. या कोशातूनच घडत असते, आपल्याला हवे असलेले वा नको असलेले व्यक्तित्त्व.
...तर सांगत काय होतो, वेडेपणा अन् शहाणपणा यात फारसे अंतर नसते. प्रत्येक शहाणपणात वेडेपणा व वेडेपणात शहाणपणा भरलेला असतो. तुम्हाला त्या शास्त्रज्ञाची गोष्ट आठवते का, त्याने मांजरासाठी एक व मांजराच्या पिल्लासाठी दुसरे अशी दोन छिद्रे पाडली होती अन् एकाच छिद्र्रातून दोहोंना बाहेर येताना पाहून चकीत झाला होता. त्याने पाडलेली दोन स्वतंत्र छिद्र्रे हा व्यावहारिक वेडेपणा होता, तर त्यावरून मांडलेला सिद्धांत विलक्षण शहाणपणा होता. तीच गोष्ट त्या पागलखान्याची. गोष्ट खरी की खोटी ठाऊक नाही, पण त्यातील भावार्थाचे काय?
घडलेली गोष्ट अशी- हिंदुस्थान व पाकिस्तानच्या सीमेवर एक पागलखाना होता. तो दोन्ही देशांना नको होता. हे म्हणत, आम्हाला नको तुम्ही घ्या. ते म्हणत, तुम्हालाच खरी गरज आहे तुम्ही घ्या. शेवटी असे ठरले, आतील वेड्यांनाच विचारावे, त्यांचेच बहुमत घ्यावे. मग त्यांनी त्यासाठी एक समिती नेमली शहाण्यांची समिती ती; तिने पागलखान्यातील सर्व वेड्यांना एकत्र जमवून विचारले, ‘तुम्हाला
कोठे जायचे हिंदुस्थानात
की पाकिस्तानात?’ त्यावर सर्व
वेडे उत्तरले, ‘कोठेच नाही. आम्ही
जेथे आहोत, तेथेच चांगले आहोत.’ त्यावर त्यांना समजाविण्याच्या सुरात
ते म्हणाले, ‘अरे तुम्ही कोठेच
जाणार नाहीत, येथेच राहणार
आहात, तुमची जागा बदलणार नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे की, तुम्हाला राहायचे कोठे हिंदुस्थानात की पाकिस्तानात?’
त्यांच्या या वेडगळ प्रश्नावर एक शहाणपणा जपलेला वेडा खळखळून हसला व म्हणाला, ‘का हो, वेडे आम्ही आहोत की तुम्ही? आम्हाला म्हणता तुम्ही येथेच राहणार, जागा बदलणार नाही, मग हिंदुस्थान पाकिस्तानला जाण्याचे येतेच कोठून?’
त्याच्या या शहाणपणाच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे, त्यातील कोणालाच सूचेना. शेवटी शहाणपणाने त्यांनी निर्णय घेतला. पागलखान्याचे दोन भाग करायचे. अर्धे वेडे तिकडे व अर्धे इकडे टाकायचे. त्यातही त्यांनी शक्कल लढविली. पागलखान्याच्या मधोमध एक भिंत बांधायची. अर्धा पागलखाना हिंदुस्थानात अन् अर्धा पाकिस्तानात. म्हणजे कमी खर्चात काम.
मला असे कळले, आतले ते वेडे आजहीे त्या भिंतीवर चढतात व एकमेकांशी बोलतात. बोलता-बोलता आश्चर्याने विचारतात, ‘अरे खरे वेडे कोण? आपण आतले की ते बाहेरचे? तुम्ही आहात तेथेच आहात, आम्ही आहोत तेथेच आहोत. मध्ये एक भिंत काय चढली, तुम्ही पाकिस्तानात गेलात अन् आम्ही हिंदुस्थानात. मग खरे वेडे कोण?’
खरे तर यावर वेगळ्या भाष्याची गरजही नसावी, पण एक प्रश्न मला सतावतोय. एकाच पृथ्वीवर राहणारे, एकाच सूर्य-चंद्राचा प्रकाश वापरणारे, कटाक्षाने प्राणवायूच घेणारे, सारखीच शरीररचना असणारे आपण सारे तथाकथित देश-धर्माच्या, जातीपातीच्या अभेद्य भिंतीत राहतो, हा खरोखर शहाणपणा आहे का?
(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत.)