भूगर्भाची रचना लक्षात घ्या अन् मगच उत्तुंग इमारती बांधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:57 AM2018-07-01T03:57:32+5:302018-07-01T03:57:43+5:30
‘मुंबई ही पूर्वी आठ बेटांची नगरी होती. आठ बेटे एकत्र करून समुद्रात भराव टाकून वसाहत स्थापन करण्यात आली होती. वडाळ्यात झालेल्या प्रकारामध्ये मातीचा भराव टाकून मानवी कृती करण्यात आली होती.
- के.पी. चौधरी
‘मुंबई ही पूर्वी आठ बेटांची नगरी होती. आठ बेटे एकत्र करून समुद्रात भराव टाकून वसाहत स्थापन करण्यात आली होती. वडाळ्यात झालेल्या प्रकारामध्ये मातीचा भराव टाकून मानवी कृती करण्यात आली होती. कुठल्याही भागात वस्ती तयार करत असताना, एक म्हणजे, भौगोलिक दृष्टीकोनातून प्राकृतिक रचनेचा अभ्यास करावा लागतो. दुसरे, भूगर्भीय दृष्टीकोनातून भूअंतर्गत क्रियांचा अभ्यास करावा लागतो.
भूगर्भीय दृष्टीकोनातून खाली कोणत्या प्रकारचा खडक आहे. मृदेची रचना काय आहे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. भूबाह्य प्राकृतिक रचनेचा, तसेच भौगोलिक घटकांचा विचार करता, पर्वत, पठारे, मैदाने यांचा अभ्यास करावा लागतो. राज्यातील दख्खनचे पठार हे ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेले पठार आहे. त्यामुळे ते स्थिर आहे, तसेच सह्याद्री पर्वतही स्थिर आहे.
ब्रिटिश जेव्हा जगभर इमारती बांधत, तेव्हा ते सर्वांत आधी तेथील भौगोलिक परिसराचा अभ्यास करायचे. म्हणजेच प्राकृतिक रचना कशी आहे, हवामान कसे आहे, मृदा कशी आहे, नैसर्गिक वनस्पती कोणत्या आहेत, कोणता लाकूडफाटा, दगड उपलब्ध होणार आहेत, तेथील परिस्थिती काय आहे, तसेच भौगोलिक घटकांसोबत सामाजिक घटकांचाही अभ्यास केला जायचा. त्यामुळे ब्रिटिश काळातील इमारती २०० ते ३०० वर्षांपर्यत टिकून राहिल्या आहेत, परंतु सध्याचे आरसीसी बांधकाम जास्त वर्षे टिकत नाही. कारण नैसर्गिक घटक आणि मानवी घटक यांच्या समन्वयाचा अभाव आहे.
कोकणातील माती आणि लाकडाचा वापर करून बांधलेले वाडे १०० वर्षे टिकून राहतात. आरसीसीची घरे मात्र २० वर्षांत कोसळतात. यामागे मुख्य दोन कारणे आहेत. आरसीसीचे बांधकाम उन्हाळ्यात खूप तापते आणि हिवाळ्यात खूप थंड होते. परिणामी, नैसर्गिक साधनसंपत्तीने बनविलेली घरे उन्हाळ्यात व हिवाळ्यातही सौम्य राहतात. मानवाने पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात, हवामानाच्या परिसरामध्ये वन, टू आणि थ्री बीएचके घरे बांधली आहेत, परंतु पूर्वी हवामानानुसार घरांची रचना वेगवेगळी होती. मात्र, आता सगळीच घरे सारखी दिसून येतात. याचे कारण असे की, आपण आपल्या नैसर्गिक घटकांचा अभ्यास न करता कृती करायला लागलो. उच्च राहणीमानाची हाव, दळणवणाचा अवाजवी विकास, यांच्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या.
मुंबई ही अरबी समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांच्या चिंचोळ्या भागात विकसित झालेला भाग आहे. प्रामुख्याने मुंबई आणि मुंबई परिसरात जास्तीतजास्त भराव टाकून जमिनी तयार करण्यात आल्या आहेत. मुळात भूगोलाच्या दोन क्रिया किंवा कार्य होत असतात. एक वेगवान हालचाली आणि दुसरी हळुवार हालचाली. वेगवान हालचालीत ज्वालामुखी, भूकंप, भूस्खलन या वेगवान हालचाली असतात. हळुवार हालचालीला ‘मास मूव्हमेंट’ असेदेखील म्हणतात. एकंदरीत जमिनीचा वरचा थर हळूहळू उताराच्या दिशेने सरकत असतो. २० ते २५ वर्षांपूर्वीचे जुने विजेचे पोल पाहिले, तर ते हळूहळू झुकताना दिसतात, यालाच ‘मास मूव्हमेंट’ असे म्हणतात, पण ती प्रक्रिया काळाच्या तुलनेत हळुवार होत असल्यामुळे ती दिसत नाही. त्या मानाने भूकंप, ज्वालामुखी आणि कडे कोसळणे हे पटकन होत असल्याने ते आपल्याला दिसून येतात. नदीच्या खोऱ्यांचा विचार केला, तर पूर तट, पूर मैदाने ही मानवी वस्तीसाठी अयोग्य ठरविलेली असतात. कारण पूर तटापर्यंत पुराचे पाणी असते. पूर मैदानामध्ये नदी जेव्हा पुराची सीमा ओलांडते, तेव्हा पाणी पूर तटामध्ये जाते. मुंबई आणि किनारपट्टीच्या प्रदेशात ‘कोस्टल रिक्लेमेशन झोन’ (सीआरझेड) आणि ‘रिव्हर रिक्लेमेशन झोन’ (आरआरझेड) या दोन्ही गोष्टींचे मानवाने पालन केलेले नाही.
मुंबईतील जमिनीच्या वरचा थर हा सगळ्यात अस्थिर असतो. तिथे जाड खडकाळ, वाळूचा भाग आणि मृदा जमा झालेली असते. गाळ जेव्हा नदी वाहून आणते, तेव्हा गाळ नदीच्या मुखाजवळ आल्यानंतर समुद्राचे खारट पाणी आणि नदीचे गोडे पाणी एकत्र होते. पाणी एकत्र आल्यानंतर समुद्राला जेव्हा भरती आलेली असते, तेव्हा वाहणारी नदी कुठेही न थांबता समुद्राच्या मुखाजवळ थांबावे लागते. ज्या वेळी पाणी थांबते, तेव्हा खडकाळ, वाळूचा भाग आणि मृदा त्याजागी जमा होतो. जेव्हा ओहोटी येते, तेव्हा पाणी निघून जाते आणि गाळ तिथेच जमा राहतो. कालांतराने गाळाचे थर एकमेकांवर साचून त्रिभूज प्रदेशाची निर्मिती होते. त्रिभूज प्रदेशात जेव्हा आपण एखादा पूल बांधताना खड्डे खणतो किंवा मेट्रो, सी-लिंकसारखे प्रकल्प येतात, तेव्हा हा भाग परत अस्थिर होतो. जमिनीचा भाग अस्थिर झाल्यानंतर पिलर खोदून भराव टाकण्याचे काम केले जाते. कोरडी मृदा पाण्याने संतृप्त होते. कोरड्या मृदेचे वजन हे ओल्या मृदेच्या किती तरी पट कमी असते. मग अशा वेळी पिलर, जाड्या भिंती आणि पातळ भिंती कोसळू लागतात.
इमारत बांधत असताना पर्यावरणीय आघात मूल्यांकन याचा आधी अभ्यास करावा लागतो. तसेच पर्यावरणीय आघात मूल्यांकन झाल्यावर आजूबाजूच्या लोकांच्या सूचना किंवा हरकती, यावर जनसुनावणी घ्यावी लागते. जनसुनावणी झाल्यानंतर, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाची एन्व्हार्नमेंटल अॅप्रायझल कमिटी यावर विचार करते. मग ही समिती सर्वांचा पाठपुरावा करून, हरकती आणि सूचनेचा विचार करून दुरुस्ती आणि कोणकोणती खबरदारी घ्यायची ते सुचविते, याला ‘एन्व्हार्नमेंटनल मॅनेजमेंट प्लॅन’ असे म्हणतात. एन्व्हार्नमेंटनल मॅनेजमेंट प्लॅनचे तीन भाग पडतात. एक प्रकल्प सुरू करण्यापूर्वी करायची कामे, दुसरे प्रकल्प करत असताना करायची कामे आणि तिसरे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर करायची कामे यासाठी आर्थिक तरतूदही असते.
इमारत बांधणारा, बिल्डर लॉबी किंवा कंपनी स्ट्राँग जर असेल, तर या सगळ्या बाबी कागदावर केल्या जातात. एखादा अपघात झाल्यावर विचारणा केल्यास सांगितले जाते, आम्ही सूचना केल्या होत्या, परंतु यांनी सूचनेप्रमाणे कारवाई केली नाही. एन्व्हार्नमेंटनल मॅनेजमेंट प्लॅनप्रमाणे काम झाले नसेल, तर केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय विकासकांना बांधकामाची परवानगी देते, परंतु जर ईएमपी पूर्ण झालेला नसेल, तर आदिवास प्रमाणपत्र मिळत नाही. आदिवास पत्रासाठी मग योग्य व अयोग्य मार्गाचा वापर करतात आणि मग लोकांच्या जिवांशी खेळ होतो.
(लेखक हे भूगर्भ अभ्यासक आहेत)
ज्या जागेवर आपण इमारती बांधणार आहोत, त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे, तसेच तिथे भराव किती टाकण्यात येणार आहे. आपण जेव्हा भराव टाकतो, तेव्हा बाजूच्या मोकळ्या ठिकाणाची हरकत घेत असतो. तर ती हरकत घेऊ नये, म्हणून आपण आधीच कुंपण घालून, मग भराव टाकतो.
त्यामुळे भराव टाकल्यानंतर
निर्माण होणारा ताण पुढच्या दिशेने जाण्यासाठी नेहमी तयार असतो. आधी एक इमारत बांधलेली असेल, मग दुसºया जुन्या इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरू झाले की, तिकडे खड्डा खोदला जातो. परिणामी, एकीकडे लो प्रेशर आणि दुसरीकडे हाय प्रेशर असते.
त्यामुळे मग जमिनी खचल्याच्या घटना घडतात. यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणीय आघात मूल्यांकन (एन्व्हार्नमेंटल इम्पॅक्ट अॅसेसमेन्ट) कुठल्याही इमारतीची पुनर्बांधणी करताना नियम व अटी घालून दिलेल्या आहेत.
विकासकामे करताना पर्यावरणीय आघात मूल्यांकन व्यवस्थित बनविले जात नाही. विकासकाने सर्व गोष्टी कागदावर केल्याने जमिनी खचण्यासारखे दुर्दैवी प्रकार घडतात.