टिकटिक वाजते डोक्यात; 'इंजिना'च्या ब्रेकमागील 'राज की बात'
By प्रविण मरगळे | Published: March 18, 2019 06:32 PM2019-03-18T18:32:35+5:302019-03-18T18:34:35+5:30
मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेने घेतलेला निर्णय योग्य वाटतो त्याला कारणे ही तशीच आहेत
प्रविण मरगळे -
मुंबई - आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार नाही असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मनसेच्या भूमिकेबाबत ज्या चर्चांना उधाण आलं होतं त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मनसेला आघाडीत घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही होते मात्र उत्तर प्रदेशमध्ये उत्तर भारतीय मतांवर त्याचा परिणाम होऊ शकेल यासाठी काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यास विरोध केला. मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेने घेतलेला निर्णय योग्य वाटतो त्याला कारणे ही तशीच आहेत.
मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फटका मनसेला जोरदार बसला होता. मनसेचे विधानसभेतील दोन आकडी संख्याबळ घटून फक्त एका आमदारावर समाधान मानावं लागलं होतं. महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी 6 नगरसेवकांनी पक्षाला रामराम केला आहे तर उरलेल्या एकमेव आमदारानेही मनसे सोडून शिवबंधन हातात बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका मनसेच्या भवितव्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच दृष्टीकोनातून गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांनी मनसे संघटना पातळीवर केलेले दौरे, विविध मुद्द्यांवर मनसेनी घेतलेली भूमिका मग ती फेरीवाले हटाव मोहीम असो की बेस्ट संपात घेतलेली उडी. कोणत्या ना कोणत्या विषयांवरुन मनसे लोकांमध्ये चर्चेत राहिली आहे. ज्या पक्षाचा एकही आमदार नाही एकही खासदार नाही तो पक्ष फक्त राज ठाकरे यांच्या नावाच्या वलयावर चर्चेत आहे. हे असं असताना आगामी लोकसभा निवडणुकीत जर मनसेचे उमेदवार पडले तर त्याचा फटका सहा महिन्यांत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेला बसू शकतो.
मनसेकडे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सक्षम उमेदवार नाहीत हे खरं असलं तरी मनसेकडे स्वतः ची एकगठ्ठा मतं आहेत जी मतं निवडणुकीत हार आणि पराजय यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना दुर्लक्षित करून चालणार नाही, त्यांच्यामागे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे असं भाष्य केलं होतं. मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहरी भागात मनसेची ताकद नक्कीच आहे त्याचा फायदा करुन घेण्यासाठी मनसेला आघाडीत द्यावं यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते.
देशाच्या निवडणुकीत सर्वच विरोधी पक्ष एकत्र येताना दिसतंय. मनसे हा राष्ट्रीय पक्ष नाही तो प्रादेशिक पक्ष आहे त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीवर मनसेचं लक्ष जास्त आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मनसैनिकांचे मनोबल नक्की खचू शकतं याची जाणीव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मनसे कोणताही धोका पत्करण्यासाठी सध्यातरी तयार नाही.
भविष्यात विधानसभा निवडणुकीत बहुदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आघाडी करुन मनसे विधानसभेत आपलं खातं उघडण्याचा प्रयत्न करु शकते. उत्तर प्रदेशात सपा बसपासारखे कट्टर विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात, तसेच सत्तेत असतानाही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे शिवसेना-भाजप आज निवडणुकीसाठी एकत्र आलेत, ज्या काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करुन दिल्लीत आम आदमी पार्टी सत्तेत आली, तो आप पक्ष आज काँग्रेससोबत जाण्याच्या तयारीत आहे. तर लोकसभेपेक्षा विधानसभेत बेरजेचे राजकारण करण्यासाठी मनसे राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशी चर्चा देखील आहे कारण काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राज्यात मनसेची ताकद दिसेल हे सूचक विधान देखील केलेलं आहे.
आता राहिला प्रश्न महाराष्ट्र सैनिकांचा तर निश्चितच विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी सहा महिने पुरेसे आहेत, 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही मनसेने लाखो मतं घेतली होती, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे.तसेच राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा प्रचार करणार, निवडणूक न लढविण्यामागे काय भूमिका होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कार्यकर्त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेच देऊ शकतील, त्यामुळे प्रतिक्षा करा 19 मार्चची