मराठी जागतिक होतेय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 04:43 AM2018-02-25T04:43:47+5:302018-02-25T04:43:47+5:30
मराठी भाषेच्या विकासाच्या गेल्या पन्नास वर्षांच्या टप्प्यात काही नवी साधने; उदा. सिनेमा, टेलिव्हिजन, इंटरनेट ही मराठीला मिळाली आहेत. त्या साधनांच्या माध्यमाने मराठीचा उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. ही साधने मराठी भाषिकांनी नीट हाताळायला पाहिजेत; आणि त्यावर प्रभुत्व मिळवायला पाहिजे.
- गणेश देवी
मराठी भाषेच्या विकासाच्या गेल्या पन्नास वर्षांच्या टप्प्यात काही नवी साधने; उदा. सिनेमा, टेलिव्हिजन, इंटरनेट ही मराठीला मिळाली आहेत. त्या साधनांच्या माध्यमाने मराठीचा उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. ही साधने मराठी भाषिकांनी नीट हाताळायला पाहिजेत; आणि त्यावर प्रभुत्व मिळवायला पाहिजे. मराठीसाठी मराठी माणसाने गतिशील राहिले पाहिजे तरच मराठी गतिशील राहील.
मराठी साहित्याची दरवर्षी वेगवेगळी तीनशे संमेलने होत असतात. फक्त साहित्य परिषदेचीच नाही, तर गावोगावी संमेलने होत असतात. दलित लेखक, स्त्री लेखक, कोकण, उत्तर, दक्षिणेतले लेखक यांची संमेलने होत असतात. ही सगळी मराठी एक समृद्ध भाषा असण्याची लक्षणे आहेत. यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे जगभर जेथे जेथे इंग्रजी भाषा गेली तेथे तेथे वसाहतवादामध्ये इंग्रजीने इतर देशीय भाषांचा विनाश केला. पण इंग्रजांचे राज्य येथे असले तरी येथे मराठी फक्त टिकलीच नाही, तर वाढतही राहिली. यात अन्य आधुनिक भारतीय भाषाही वाढत राहिल्या. यात या भाषांचा दमदारपणा दिसून येतो.
सगळ्यात जमेच्या बाजू ध्यानात घेतल्या तर मराठीविषयी आपल्याला ज्याच्यामुळे चिंता वाटतेय त्या वजा म्हणजे निगेटिव्ह बाजू तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. मराठी माध्यमांच्या शाळा कमी होत चालल्या किंवा बंद पडत आहेत. मराठीच्या जागी इंग्रजी माध्यमाच्या शाळा पुष्कळ वाढल्या आणि फोफावल्या. मराठी बोलणाºयांच्या बोलण्यात आजकाल मराठीबरोबर जोडीने इंग्रजी शब्दांची संख्या वाढत चालली आहे. दोन मराठी बोलणाºया व्यक्ती एकत्र भेटल्यावर बºयाचदा मराठीत बोलण्याऐवजी हिंदी किंवा इंग्रजी अशा अन्य भाषेत संभाषण करताना दिसतात. या चिंतेच्या बाजू आहेत. पण याची चिंता करत असताना काही बाबींची आठवण आपण स्वत:ला करून दिली पाहिजे. ती म्हणजे मराठीच्या प्रारंभापासून ते आतापर्यंतच्या दीर्घ प्रवासात मराठीचा जो अनेक अंगाने विकास झाला त्या विकासात शाळांचा हिस्सा अत्यंत थोडा होता. साधारणपणे अकरा ते विसाव्या शतकापर्यंत मराठीचा झालेला विकास हा शाळांमुळे झालेला नव्हता. त्यामुळे आता मराठीत शाळा नाही म्हणून मराठीचा विकास थांबेल अशी जी भीती आहे; ती इतिहास पाहता तेवढी सार्थ नसावी.
दुसरी गोष्ट मराठी भाषेच्या जडणघडणीत संस्कृत, प्राकृत, अरेबिक, फ्रेंच, पोर्तुगीज, पार्शियन, तुर्की, स्पॅनिश, इंग्रजी, गुजराती, कानडी आणि कोकणी शब्दांची मराठीत आवक होत गेली; म्हणून मराठीचा विकास झाला. त्याचप्रमाणे इंग्रजी शब्द मराठीत लाखो किंवा हजारोने आले तर मराठीचे नुकसानच होईल, असे हमीपूर्वक सांगता येत नाही. उलट मराठीची अर्थ अभिव्यक्तीची रुंदी वाढू शकेल हीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मराठी विरुद्ध इंग्रजी; अशी निराधार भीती निर्माण केल्याने मराठीचे हित आहे, असे मी मानत नाही. कारण जी इंग्रजी दीडशे-दोनशे वर्षांमध्ये मराठीला मारू शकली नाही ती येणाºया दोनशे वर्षांत मराठीला मारू शकेल, असे मी मानत नाही.
मराठी भाषेच्या विकासाच्या गेल्या पन्नास वर्षांच्या टप्प्यात काही नवी साधने; उदा. सिनेमा, टेलिव्हिजन, इंटरनेट ही मराठीला मिळाली आहेत. त्या साधनांच्या माध्यमाने किंवा सोशल मीडियावर मराठीचा उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. ही साधने मराठी भाषिकांनी नीट हाताळायला पाहिजेत; आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवायला पाहिजे. दुसºया शब्दात मराठीसाठी मराठी माणसाने गतिशील राहिले पाहिजे तरच मराठी भाषा गतिशील राहील. मराठी भाषा जगातल्या पहिल्या वीस महत्त्वाच्या भाषांमध्ये मोडते. त्या वीस भाषांकडे संख्यात्मक आणि इतिहासाच्या दृष्टीने बघितले तर त्यापैकी ज्या भाषांचा इतिहास हजारो वर्षांपेक्षा जास्त आहे अशा केवळ बाराच भाषा आहेत. त्या बारांमध्ये ज्या भाषांमध्ये महाकाव्ये लिहिली गेली आणि ज्या भाषांमध्ये ज्ञानकोश निर्माण केले गेले अशांत मराठीचा क्रम येतो. आणि ज्या भाषांमध्ये निपुण चिंतनात्मक लिखाण झाले आहे अशा बारांपैकी आठ भाषांमध्ये मराठीचा क्रमांक येतो. त्यामुळे मराठी ही जगातल्या चांगल्या रीतीने प्रस्थापित झालेल्या भाषांपैकी आहे याचे भान आपल्याला असायला पाहिजे.
सतत आपल्यावर हल्ला होतो आहे, ही मनोभूमिका मराठी बोलणाºयांनी आता सोडून द्यायला हवी. उलट महाराष्ट्रात ज्या गोंडी, कोरकू, वारली वगैरे आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या इतर ५८ भाषा आहेत त्यातून मराठीला चांगले शब्द मिळत गेले आहेत. अभिव्यक्तीची नवी रूपे त्यातून मिळाली आहेत. या भाषा सांभाळणे हे मराठीचे कर्तव्य मानले पाहिजे. कारण त्या भाषा, किंवा महाराष्ट्रातल्या इतर भाषा ज्या जमिनीच्या भाषा आहेत. त्यांना मराठीची मुळे मानले पाहिजे. मराठी महान वृक्ष आहे असे मानले तर तिची मुळे, पारंब्या त्या भाषा आहेत. आणि आकाश इंग्रजीचे मानले पाहिजे. कारण जगभर इंग्रजी चालते. परिणामी आकाश झाडावर कोसळेल ही भीती वाटण्यापेक्षा मुळे वाळली तर झाड कोसळेल ही भीती जास्त सार्थ आहे. याचा अर्थ मराठी भाषेने आता वडीलकी स्वीकारली पाहिजे.
वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले तर मराठी भाषा जगातल्या अन्य ३५ देशांत बोलली जाते. याचा अर्थ असा नाही की तिथे फक्त मराठीच बोलली जाते. मराठी बोलणारे लोक जगातल्या पस्तीस देशांत पसरले आहेत. परिणामी मराठी एक प्रकारे जागतिक भाषा होत आहे. जगातून नवे शब्द स्वीकारणे, स्वत:ची अभिव्यक्ती अधिक समृद्ध करणे हे काम मराठीला करावे लागणार. तरच स्पॅनिश किंवा इंग्रजीप्रमाणे मराठीचा विकास भविष्यात होईल. मराठीचे चित्र निराशाजनक नाही; पण मराठी माणसाची भाषेकडे बघण्याची दृष्टी मात्र निराशाजनक आहे. ही दृष्टी बदलणे गरजेचे आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत मराठी माणूस काम करू लागला तर मराठी आपोआपच वाढत राहील. सरकारी प्रयत्नांनी भाषा जन्मालाही येत नाही, जिवंतही राहत नाही आणि मरतही नाही. सरकारने आपली प्रतिबद्धता व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. बाकी भाषा वाढत राहते ती श्रमिक, गृहिणी, बालकांमुळे. ते शब्दांचे नवे आकार निर्माण करत राहतात. या दिवशी मराठी भाषिकांना समाधान वाटले पाहिजे. या दिवशी आनंद वाटला पाहिजे. कारण जगातल्या सहा हजार भाषांपैकी सुमारे चार हजार भाषा वाईट स्थितीत आहेत. मरणान्मुख अवस्थेत आहेत. तर आपली भाषा समृद्ध होत आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. भाषांतराची सवय, अनुवादाची संस्कृती जोपासली पाहिजे. कारण त्याने भाषा जोपासली जाते. ज्ञानेश्वरी हा अनुवादित ग्रंथ होता. गीतेचा अनुवाद होता. म्हणून अनुवाद, भाषांतर झाले पाहिजे. हे काम म्हणजे मराठीला दंडवत असेल.
(लेखक हे भाषातज्ज्ञ आहेत.)