स्मृतिचिन्हांचा सांभाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:04 AM2017-09-03T01:04:04+5:302017-09-03T01:06:32+5:30
भारतरत्न बिस्मिल्ला खान यांचा स्मृतीदिन २१ आॅगस्ट रोजी असतो. त्यानिमित्ताने त्यांना मिळालेली मानसन्मान पदके, स्मृतीचिन्हे आदि गोष्टींचे प्रदर्शन त्यांचे कुटुंबीय दरवर्षी भरवते. ही गोष्ट आजतागायत फारशी माहित नव्हती.
- रविप्रकाश कुलकर्णी
भारतरत्न बिस्मिल्ला खान यांचा स्मृतीदिन २१ आॅगस्ट रोजी असतो. त्यानिमित्ताने त्यांना मिळालेली मानसन्मान पदके, स्मृतीचिन्हे आदि गोष्टींचे प्रदर्शन त्यांचे कुटुंबीय दरवर्षी भरवते. ही गोष्ट आजतागायत फारशी माहित नव्हती. मात्र यंदा माहित झाली ती त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली बातमी. उस्तादना मिळालेले पद्मविभूषण सन्मानपत्र वाळवीने खाल्ले.
त्यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबियांनी कैफियत मांडली की, त्यांच्या आर्थिक दुरावस्थेमुळे उस्तादांचा हा सगळा व्याप सांभाळणं कठीण होत आहे. थोडक्यात हा सांभाळ करण्यासाठी त्यांना मदत करण्यात यावी. तशी त्यांना मदत मिळेलही. पण त्याने प्रश्न सुटणार का?
कागद ही गोष्टच अशी आहे की वाळवीच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी त्याची अतोनात काळजी घ्यायला लागते. एकदा का कागदाला वाळवी लागली की कागद जवळजवळ बादच होऊन जो. तो जाळून नष्ट करणे, एवढाच पर्याय असतो. बिस्मिल्ला खान यांना मिळालेले पद्मविभूषण मानपत्र, ज्याला आता वाळवी लागली आहे ते बादच करायला हवे. ते मानपत्र नव्याने देता येऊ शकते. त्याला फार खर्च येणार नाही. हा प्रश्न लालफितीत अडकू नये.
नोबेल पुरस्काराच्या स्मृतीचिन्हाची वेळ आल्यास त्यांच्याकडून नवी प्रतिकृती दिली जाते. तिथे साध्या कागदावरच्या प्रमाणपत्रात ते सहजशक्य व्हावे. बिस्मिल्ला खान यांचं कुटुंबिय उस्तादांच्या सन्मानचिन्हाचं प्रदर्शन भरवत असतील तर त्यांच्या नजरेत वाळवी लागलेलं प्रमाणपत्र लक्षात कसं आलं नाही? याचा अर्थ दुर्लक्ष झालं असा असू शकतो. मग समजा नव्यानं हे प्रमाणपत्र दिलं गेलं तर ते तरी नीट सांभाळलं जाईल याची खात्री देता येईल का? अशी महत्त्वाची, प्रतिष्ठेची मानपत्रं कागदाऐवजी दुसºया माध्यमावर देता येवू शकतील की नाही?
मला वाटतं, आता असे पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी फार खर्च करायला लागत नाही. सगळेच व्यवहार पेपरलेस करण्याकडे कल होत आहे. त्याला प्रमाणपत्र वगैरे गोष्टी तरी अपवाद का कराव्यात?
स्मृतीचिन्ह, मेमोन्टो अशा गोष्टीच सुरुवाती सुरुवातीला निश्चित अप्रुप असतं. पण नंतर अशा गोष्टीची अडगळ तरी होते किंवा त्यांचा सांभाळ कसा करावा हा प्रश्न उद्भवतो. एखादा आपल्या हयातीत मोठ्या मुश्किलीने ते सांभाळेल देखील. पण त्याच्या नंतर? असल्या गोष्टी भंगारात जातात?
प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सोहराब मोदी यांचं फाळके पुरस्कार स्मृतीचिन्ह चोरबाजारात आले. आणि ते विकत घेणाºया तिथल्या दुकानदारानं सांगितले की, ते त्यांच्या मुलानेच विकायला आणलं होते. याबाबतीत अधिक तपास केला तेव्हा त्यांच्या संबंधीतांनी, नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं होतं, ‘‘या पदकाचं काय करावं हा प्रश्न आहे. ‘‘गांधी’ -चित्रपटाची वेशभूषा भानू अथैय्या यांनी केली होती. त्यासाठी त्यांना आॅस्कर मिळालं. (त्या आधी भानू अथैय्या यांनी कित्येक हिंदी चित्रपटांसाठी अशा प्रकारचं काम केलं होते. पण तेव्हा काही संबंधीत मंडळी सोडली तर त्यांचं हे नाव फारसं कुणाच्या कानावरून देखील गेले नव्हते.) अर्थात भानू अथैया एकदम प्रकाशात आल्या. आॅस्करच्या स्मृतीचिन्ह घेवून त्या उभ्या आहेत असे फोटो झळकले. एवढंच काय ते. हे कशाला, त्या मुळच्या कोल्हापूरच्या राजोपाध्ये. पण आम्हा मराठी मंडळींना त्यांच्या निदान सत्कार करावा, हे सुचलं नाही.
तर अशा भानू अथैया काही वर्र्षांनी हे आॅस्कर स्मृतीचिन्ह आॅस्कर संस्थेला परत केलं. त्यांनी कारणे सांगितलं की, एवढ्या मोठ्या चिन्हाचा मी यथोयोग्य सांभाळ करू शकत नाही!
अर्थात असा निर्लेप विचार एखादीच भानू अथैया करू शकते हे खरंच.
शेवटी प्रश्न तोच - ह्या स्मृतीचिन्हाचं करायचं काय?
बघुया काय काय उत्तरं येतात!