मन ये बहका...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 02:10 AM2017-12-17T02:10:22+5:302017-12-17T02:11:06+5:30
- सुनील पाटोळे
‘मन क्यूँ बहका रे बहका आधी रात को...’ असे रोमॅन्टिक गाणे... गाण्यातल्या प्रणयरमणीय शब्दांसोबत देहावरला एक एक अलंकार दूर सारत प्रणयातुर आवाहन करणा-या सनी लियोनीची देहबोली... हे दृश्य आपल्याला टीव्हीवर अनेकदा पाहायला मिळते. कुटुंबासोबत टीव्ही बघताना जाहिरातीचे हे क्षण आले की आता पुढे काय पाहावे लागणार या भीतीने मग अनेक जण चॅनेल बदलणे पसंत करतात. कुटुंबासोबत टीव्ही पाहताना कंडोमच्या या आणि अशा प्रकारच्या जाहिराती दिसायला लागल्या तर अवघडल्यासारखे वाटतेच. अशा जाहिरातींचे दुष्परिणाम लहान मुलांवर होऊ नयेत म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने या जाहिरातींच्या प्रसारणावर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत बंदी घातली आहे. अर्थात या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याचे स्वागत करत असले, तरी केवळ वेळेच्या निर्बंधामुळे निर्णयाचा मूळ हेतू साध्य होणार नाही असेच अनेकांना वाटतेय. एकीकडे शाळेत लैंगिक शिक्षण देण्याची चर्चा करायची आणि दुसरीकडे गर्भनिरोधकांच्या जाहिराती दिवसा दाखवण्यास बंदी घालायची, हे कोड्यात टाकणारे आहे. म्हणून या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील संबंधितांशी संवाद साधून सेक्स टॉय म्हणून जाहिरातीतून प्रेझेन्ट केलेल्या कंडोमचा प्रसार करण्यातच आपण वाट चुकलोय का? या निर्णयातून काय साध्य होईल, याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न...
जाहिरात प्रसारणावरील वेळेचा निर्बंध हा पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे. खरे तर सेक्स एज्युकेशनच्या दृष्टीने याचा विचार केला तर या विषयावरील जाहिरातींकडे एक संधी म्हणून पाहायला हवे, मात्र जाहिरात निर्मिती करताना याकडे साफ दुर्लक्ष झाल्यामुळेच ही अशी निर्बंध घालण्याची वेळ आल्याचे लैंगिकोपचार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात. ते म्हणाले की, भारतात कंडोमच्या जाहिराती या अतिशय ओंगळवाण्या पद्धतीने सादर केल्या जातात. सेक्शुअली उत्तेजित करणाºया अशा या जाहिरातींची मांडणी असते. त्यामुळे अशा जाहिराती तर कुठल्याच वेळेत दाखवू नयेत. अतिरंजित जाहिरातींवर आक्षेप घेण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे, त्यामुळे त्याच्या निर्मितीवर अंकुश ठेवायला हवा. प्रसारणाच्या वेळेचे बंधन ठेवल्याने काहीच साध्य होणार नाही.
जाहिरातीला वेळेचे बंधन ठेवल्याने फारसा काही परिणाम होणार नाही. उलट अशा जाहिराती बघितल्यानंतर त्या उत्पादनांचे चांगले-वाईट परिणाम पालकांनी मुलांना समजावून सांगायला हवेत. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सगळ्या गोष्टी इतक्या सहज उपलब्ध असल्यामुळे अगदी शाळकरी मुलांनाही ‘नको त्या गोष्टी’ नको त्या वयात समजू लागल्या आहेत. त्यामुळे असे वेळेचे बंधन घालून आपण काही थांबवू शकत नाही. उलट त्यांनी कुटुंबासोबत बसून अशा कंडोमसारख्या बोल्ड जाहिराती पाहिल्या, तर त्यातली नकारात्मकता कशी घालवता येईल याचा विचार पालकांनी करायला हवा, असे मत पहिल्या महिला ब्रँडगुरू जान्हवी राऊळ यांनी व्यक्त केले आहे. त्या सांगतात की, जाहिरात निर्मितीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आपल्याकडे कंडोमच्या जाहिराती बोल्ड असतात हे मान्य आहे. त्याच्या योग्य-अयोग्यतेवर वाद होऊ शकतात. पण एक उत्पादन म्हणून विचार केला तर प्रत्येक कंपनीला आपल्या उत्पादनाची विक्री वाढवायची असते, ते केंद्रस्थानी ठेवूनच या जाहिराती केल्या जातात. सेक्स हा विषयच असा आहे की एखाद्या शाळकरी मुलाला काही माहीत नसते म्हणून कुतूहल असते, तर ७० वर्षांच्या आजोबांना सगळे माहीत असूनही उत्सुकता असते. हा एक मानसिकतेचा धागा पकडून कंडोमला सेक्सशी जोडून कंपन्या आपल्या उत्पादनाचा खप वाढवत आहेत. शेवटी मागणी तसा पुरवठा हेच बाजारू सूत्र यामागे आहे.
बंदी घालून कोणतीही समस्या सुटत नाही, उलट त्यातील गुंतागुंत वाढू शकते. कंडोमच्या जाहिरातींवरील वेळेच्या बंदीचेही काहीसे असेच आहे. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत या जाहिराती दाखवल्या नाहीत, तर त्या मुलांना बघायला मिळणार नाहीत असे अजिबात नाही. मग बंदीचा उपयोग काय, यातून मूळ हेतू कसा साध्य होणार, असा प्रश्न मानसोपचारतज्ज्ञ प्रज्ञा दिवाण यांनी उपस्थित केला आहे. त्या म्हणतात की, अशा जाहिरातींचा सेक्स एज्युकेशन म्हणून कसा उपयोग होईल याचा विचार करून जाहिरातीत तसा आशय ठेवावा आणि त्या पद्धतीने त्या दाखवल्या जाव्यात, अशी खरे तर सक्ती करण्याची गरज आहे. नुसत्या टीव्हीवरच्या जाहिरातींना निर्बंध कशासाठी, मुद्रित माध्यमांमध्येही आक्षेपार्ह छायाचित्रे असलेल्या जाहिराती येतातच त्याचे काय करणार? त्यामुळे अशा जाहिरातींच्या निर्मितीवर निर्बंध आणण्यासाठी काही मर्यादा येत असतील तर अशी वेळेची बंधने टाकून वरवरची मलमपट्टी करणे काही उपयोगाचे नाही. अशा वेळी पालकांनीच पुढाकार घ्यायला हवा. कुटुंबासोबत टीव्ही पाहताना अवघडल्यासारखे वाटणारी जाहिरात
आलीच तर चॅनेल न बदलता त्यावर
चर्चा करण्याइतका मोकळेपणा असायला हवा आणि पालकांनी मुलांशी संवाद साधायला हवा. सुरक्षा म्हणून कंडोम कसा उपयोगाचा आहे हे सांगायला हवे, मग जाहिरातीत काहीही दाखवू दे, मुलं जाहिरातींपेक्षा पालकांवर नक्की विश्वास ठेवतील.
मन क्यूँ बहेका रे बहेका आधी रात को... हे मूळ गीत खरोखरच श्रवणीय आहे. मात्र, त्यावर आधारलेली कंडोमची दृक्श्राव्य जाहिरात आपल्याला कुटुंबासोबत बघताना मात्र लाज वाटते. पण, मन काही रात्रीच बहकत नाही; हे आधी जाहिरात बनवणाºयांनी आणि मग त्यावर सकाळी ६ ते रात्री १० या वेळात प्रसारण बंदी घालणाºया केंद्रीय प्रसारण खात्याने दाखवून दिले आहे. कारण, आपले उत्पादन विकले जावे म्हणून जाहिरात बनवताना या उत्पादकांना काही तारतम्य बाळगावे असे वाटले नाही. त्याचप्रमाणे, शारीरिक संबंधातील सुरक्षितता जनतेपर्यंत पोहोचिवणारे प्रसारण साहित्य प्रसारित करताना कोणत्या अटी व नियम कटाक्षाने पाळल्या गेल्या पाहिजेत; याबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे असावीत, हे गांभीर्याने जाहिरात निर्मिती संस्था आणि प्रसारण वाहिन्यांपर्यंत रुजविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलेले आहे.
1)कंडोमचा उद्देश लैंगिक आजारांचा प्रसार रोखणे, कुटुंबनियोजन करणे हा असतो. मात्र जाहिरात करताना कंडोमचा संबंध जबाबदारीशी न जोडता लैंगिक सुखाशी जोडला गेला आहे. आमच्या कंडोमने लैंगिक आनंद वाढतो, आमचा कंडोम अमूक फ्लेवरचा आहे, अशा प्रकारच्या जाहिरातींनी कंडोमचा खप वाढला पण कंडोमचा संबंध कायमचा अश्लीलतेशी जोडला गेला. खरे तर कंडोमच्या जाहिराती सरकारी पातळीवरूनच करायला हव्यात. आपल्याला हवा तो संदेश अचूकपणे पोहोचवणाºया जाहिराती कलात्मक रीतीने तयार करून त्याद्वारे लोकशिक्षणाची भूमिकाही पार पाडता येईल. परंतु त्याऐवजी संबंधित जाहिरातींवर दिवसा बंदी घालण्याचा सोपा मार्ग निवडण्यात आला आहे.
2)खरोखरच मन बहकते तेव्हा मनाला भल्याबुºयाची, जननिंदेची आणि सुरक्षिततेचीसुद्धा फिकीर राहत नाही. मनाच्या तशा अवस्थेत आधी आपण सुरक्षिततेचा विचार पहिला करावा आणि मग आनंदाचा; हे बिंबविण्याऐवजी कंडोमच्या जाहिराती सुरक्षेचा विचार न करता फक्त उत्तान शारीरिक सुखाचा बाजारूपणा करतात; असाच प्रत्यय त्या पाहिल्यानंतर येऊ लागला आहे.