मुंबई महापालिकेने कायद्याचे, कायद्याच्या तरतुदींचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:26 AM2018-07-01T00:26:57+5:302018-07-01T00:26:59+5:30
वडाळा पूर्वेकडील विद्यालंकार महाविद्यालय मार्गाजवळील लॉइड इस्टेट (वडाळा हाइट्स को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी)च्या ‘सी’ आणि ‘डी’ विंगच्या पार्किंगचा भाग व कम्पाउंडची भिंत खचली.
- अॅड. गीतांजली गोलतकर-करगुंटकर
वडाळा पूर्वेकडील विद्यालंकार महाविद्यालय मार्गाजवळील लॉइड इस्टेट (वडाळा हाइट्स को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी)च्या ‘सी’ आणि ‘डी’ विंगच्या पार्किंगचा भाग व कम्पाउंडची भिंत खचली. ही घटना अतिशय दुर्दैवी व निंदनीय आहे. विकासकाने केलेल्या खोदकामामुळे आणि बांधकामामुळे लॉइड इस्टेट आणि लगतच्या इमारतींना तडा जाऊन इमारतीच्या पायाला धोका निर्माण झाला. विकासकाकडून सातत्याने सुरू असलेल्या खोदकामामुळे इमारतीचा पाया कमकुवत झाला असल्याने इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना भविष्यात मोठ्या दुर्घटनेला सामोेरे जावे लागण्याची शक्यता आहे. संबंधित विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.
दोस्ती बिल्डरचे काम मागील अनेक वर्षांच्या कालावधीपासून सुरू आहे. या बांधकामामुळे लगतच्या सोसायटीवर विपरीत परिणाम होऊन लगतच्या बहुतेक इमारतींना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच इमारतींच्या पायाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी पालिकेकडे वेळोवेळी तक्रार केली. मात्र पालिकेकडून या तक्रारींचे कोणत्याही प्रकारे निवारण करण्यात आले नाही. अग्निशमन दल विभाग आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या विभागानेदेखील या बांधकामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच दोस्ती बिल्डरच्या सुरू असलेल्या बांधकामादरम्यान लॉइड इस्टेट कम्पाउंडची भिंत आणि पार्किंगचा भाग कोसळल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. घटना घडल्यानंतर पालिकेकडून बिल्डरचे सुरू असलेले काम थांबविण्यात आले आहे. अशी कारवाई रहिवाशांनी तक्रार केल्यावरच केली असती तर आता लॉइड इस्टेटची घटना घडली नसती आणि सात ते आठ गाड्यांचे नुकसान झाले नसते. सातत्याने सुरू असलेले काम थांबविल्यामुळे भविष्यात होणारी वाईट घटना टाळता आली आहे. मात्र आता झालेल्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही रहिवासी येथील घर सोडून दुसºया ठिकाणी वास्तव्यास जात आहेत; तर काही रहिवासी इमारत सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही घटना गंभीर आहे. या घटनेत अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता होती. त्यामुळे घटनेकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. भिंत आणि पार्किंगचा भाग खचल्याने सात ते आठ गाड्या ढिगाºयाखाली दबल्या गेल्याने संबंधित गाडी मालकांचे आर्थिक नुकसान
झाले.
प्रकल्पाच्या बाजूने नक्कीच कोणत्या तरी राजकीय शक्तीचे पाठबळ असल्याने विकासकाने सदर बांधकाम बिनधास्तपणे चालू ठेवल्याचा दाट संशय आहे. तरीही संबंधित घटनेबाबत एक अभिव्यक्ती म्हणून महापालिकेला जनकर्तव्यांचे, जन प्रतिज्ञेची आठवण करून देऊ इच्छिते आणि असे मत प्रदर्शित करते की, पालिकेने कायद्याचे व कायद्याच्या तरतुदींचे योग्य ते पालन करून या प्रकरणात सखोल चौकशी करून दोस्ती विकासकावर योग्य ती कारवाई होणे अपेक्षितआहे.
(लेखिका या ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)