पौष्टिक कोजागरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 03:23 AM2017-10-01T03:23:15+5:302017-10-01T03:23:21+5:30
मी आणि माझी जीवलग मैत्रीण इशा परवा खूप दिवसांनी भेटलो. कॉफी शॉपमध्ये जाण्याचा बेत ठरला. पण वाटेत लागलं मिल्कशेकचं आऊटलेट. ते पाहून आम्ही कॉफी प्यायला जाण्याचा बेत रद्द करून मिल्कशेक प्यायला गेलो.
- भक्ती सोमण
मी आणि माझी जीवलग मैत्रीण इशा परवा खूप दिवसांनी भेटलो. कॉफी शॉपमध्ये जाण्याचा बेत ठरला. पण वाटेत लागलं मिल्कशेकचं आऊटलेट. ते पाहून आम्ही कॉफी प्यायला जाण्याचा बेत रद्द करून मिल्कशेक प्यायला गेलो. मोठ्याला जारमधून दूध, आइस्क्रीम आणि बटर स्कॉच, चॉकलेट फ्लेवरचे ते मिल्कशेक गप्पा मारत पिताना तासभर कसा निघून गेला ते कळलच नाही. वर पोटही इतकं टम्म भरलं की रात्री जेवावंही लागलं नाही. असे हे पेट भरके सुख देणारे मिल्कशेक्स सध्या चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.
गप्पांचा फड जमवायचा असो किंवा त्याची-तिची पहिली भेट घ्यायची असो, खूप वेळ बसायला मिळतं म्हणून कॉफी प्यायला पसंती दिली जायची. पण आता मात्र परिस्थिती चांगलीच बदलली आहे. आता मिल्कशेक्स, ज्यूस पार्लर्सकडे ओढा वाढला आहे. किंबहुना येणाºया कोजागरीला रात्र जागवण्याचा कार्यक्रम आखत असाल तर मिल्कशेक हा एकदम बेस्ट पर्याय आहे.
दूध, साखर, ज्या फ्लेवरचा मिल्कशेक प्यायचा आहे तो फ्लेवर घालून हे रसायन मिक्सरमधून एकजीव करायचं आणि देताना त्यात आइस्क्रीम मात्र मस्ट. या सगळ्याचं जे भन्नाट अफलातून कॉम्बिनेशन तयार होतं ते पिण्यातच खरी मजा आहे. अतिशय पटकन आणि पोटभरीचा असणारा हा मिल्कशेक तरुणाईला म्हणूनच आता आपलासा वाटू लागला आहे.
सध्या लोकांचा विशेषत: तरुणाईचा मिल्कशेककडे ओढा वाढला आहे. लोक आरोग्याविषयी खूपच जागरूक झाल्याने सोडायुक्त कोल्ड्रिंकपेक्षा हेल्दी मिल्कशेक प्यायला पसंती देतात, असे खार येथील शेक स्क्वेअरचे मॅनेजर संदीप गुगलानी यांनी सांगितले. या मिल्कशेक्समध्ये सध्या चिकू, बटरस्कॉच, ओरियो, कोल्ड कॉफी, न्यूटेला फेरोरोशर अशा फ्लेवर्सची जास्त चलती आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आपली केळ्याची शिकरण हीही मिल्कशेक याच प्रकारात मोडणारी आहे.
एकंदरच पौष्टिकतेची पूूर्ण हमी देणारे हे मिल्कशेक्स वेगळ्या रंगढंगात समोर येत आहेत. त्याचा आस्वाद एकटे किंवा मित्रांबरोबर अवश्य घ्या.
मसाला दूध मिल्कशेक
कोजागरीला दूध तर आपण आणतोच. साखर, ड्रायफ्रुट्स घालून ते उकळवतो आणि वाटल्यास थंड करून पितो. या दुधाचा नैवेद्य दाखविल्यानंतर त्याला टिष्ट्वस्ट नक्कीच देता येईल. मसाला दुधात काजू, चारोळ्या, बदाम असे ड्रायफ्रु ट्स असतात. आजकाल तर दुधाचा तयार मसाला वापरतात. तर हे मसाला दूध आणि ड्रायफ्रुट्स आइस्क्रीम एकत्र करून त्याचा मसाला मिल्कशेल्क तयार करता येईल. त्यामुळे येत्या कोजागरीला हा प्रकार नक्की करून बघा आणि मला फोटो पाठवा.