भिश्ती; भारतीयांची तहान भागवणाऱ्या समुदायाबरोबर एक दिवस
By अोंकार करंबेळकर | Published: August 9, 2018 12:19 PM2018-08-09T12:19:40+5:302018-08-10T19:30:08+5:30
'ये देखो हम कहाँ रहतेहे, हमे खाने-पिनेको, रहनेको जगा नहीं तो उनका पेट कैसे पालें', असं सांगत, त्यांनी ते 'तिघांचं घर' मला बोटाने दाखवलं. भिश्ती मोहल्ल्यात भिश्ती राहातच नाहीत. 'वो तो सिर्फ नाम का मोहल्ला रह गया है. सब लोग इधर-उधरही रहते है',
नळबाजार, भेंडीबाजार, पायधुणी किंवा इमामवाड्यामध्ये गेलं की, हजार प्रकारचे व्यवसाय एकाच वेळी अंगावर यायला लागतात. लहान व्यापारी, फळं विकणारे, कुलूप-किल्ल्या विकणारे, पतंग, कपडे, भांडी, रद्दी, मोडलेल्या वस्तू, छत्र्या, घड्याळं अशा शेकडो वस्तू विकणारे शेकडो लोक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी आपापल्या जागा पकडून बसलेले दिसतात. कोणाची पथारी तर कोणाची एक माणूस बसेल इतकीच जागा आहे. प्रत्येकाने जणू फूटपाथच्या चौरस फुटावर हक्कच प्रस्थापित केले आहेत.
वस्तूंची इतकी संख्या आणि विक्रेत्यांमधली विविधता क्वचितच दुसऱ्या ठिकाणी दिसत असेल. या गर्दीच्या, घाई-गडबडीच्या परिसरामध्ये काही लुंगी लावलेले आणि पांढरे मळके किंवा खाकी शर्ट घातलेले अचानक माशासारखे सुळकन जाताना खूप वेळेस पाहिले होते. एका खांद्यावर पाण्याची सॅक घेतल्यामुळे तिरकेतिरके चालणारे हे लोके बघे-बघेपर्यंत गायब होतात. आता एवढे नळ आणि मुबलक पाणी असतानाही यांच्या पखालीतून कोण पाणी घेत असेल, असं वाटायचं, पण त्यांना नीट पाहायच्या आधी ते गायब व्हायचे. हे सटासट पळणारे लोक होते भिश्ती. पखालीतून पाणी भरणाऱ्या लोकांना भिश्ती (भिस्ती) किंवा मशकी, मशक म्हणतात. त्यांच्या पाठीवर असणाऱ्या कातडी पिशवीला मशक म्हणतात त्यामुळेच त्यांना 'मशक' नाव पडलं. तर भिश्ती शब्द फारसी 'बहिश्त'वरून (बहिश्त म्हणजे स्वर्ग) आला, असं म्हणतात. हे लोक स्वत:ला हजरत अब्बास आलमदार यांचे पाईक मानतात.
नागेंद्र सिंग आणि अब्दुल माबुद खान यांनी संपादित केलेल्या 'एन्सायक्लोपीडिया ऑफ द वर्ल्ड मुस्लीम्स: ट्राइब्ज, कास्टस्, कम्युनिटिज'च्या पहिल्या भागातील माहितीनुसार, हजरत अब्बास आलमदार हे दमास्कसच्या वाटेवर असणाऱ्या इमाम हुसैन यांच्या शिष्यांना, कातडी पिशवीतून पाणी आणून देणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी एक होते, त्यामुळे भिश्ती स्वत:ला त्यांचे पाईक मानत असावेत. त्यांच्या स्मृतीसाठी लखनौमध्ये हजरत अब्बास दर्ग्याची स्थापना करण्यात आली आहे. हा दर्गा नवाब असफ उद्दौला यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला आहे, अवधच्या राजघराण्याने या दर्ग्याला विशेष महत्वाचे स्थान दिले होते. दर्ग्याच्या आवारात असणाऱ्या लहानशा बांधीव तळ्यामध्ये मशकची प्रतिकृतीही ठेवण्यात आलेली आहे. १८५७ साली उठावाच्या धामधुमीत हजरत अब्बास दर्गा महत्वाच्या घडामोडींचे केंद्र झाले होते. कंपनीविरोधात लढणारे शिपाई आणि बेगम हजरत महल यांच्या सैनिकांनी इथेच आश्रय घेतला होता. बंडाळी मोडून काढल्यावर ब्रिटीशांनी हा दर्गा लूटला आणि त्यातील काही वस्तूंचा लिलावही मांडला होता.
1857 च्या बंडाचे वर्णन माझा प्रवासमध्ये करणाऱ्या विष्णूभट गोडशांनीही भिश्ती लोकांनी बंडवाल्यांना मदत केल्याचे लिहिले आहे. भिश्ती लोकांनी महत्त्वाची पत्रे पोहोचवण्याचेही काम केले होते. कानपूरमध्ये घुसलेल्या इंग्रजांना पिटाळायला नानासाहेब, रावसाहेब पेशवे गेले तेव्हा लढाई इतकी हातघाईची झाली की कोणालाही क्षणभर उसंत मिळाली नाही. याबाबत गोडसे भटजींना वृत्तांत सांगणाऱ्या दोन ब्राह्मणांनी पेशव्यांच्या सैनिकांनी 'हातावरचे हातावर साखरपुऱ्या खाऊन भिस्ती याजकडून पाणी पिऊन' लढाई सुरु ठेवली होती असे सांगितल्याचे लिहिले आहे.
भिश्ती मुघलांबरोबर भारतात आले असावेत. पाकिस्तानसह, भारतामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कोलकाता, हैदराबाद आणि कर्नाटकमध्ये अगदी अल्पसंख्येने हे लोक आज आढळतात. राजस्थानमध्ये अजमेर शरिफ, दिल्लीमध्ये जामा मशिदीजवळ ते एकवटलेले आहेत. जामा मशिदीच्या आजूबाजूच्या परिसरात मुंबईतील भिश्तींप्रमाणेच तिथल्या भिश्तींची लगबग सुरू असते. काही भिश्ती मशिदीजवळ मशक घेऊन उभे राहतात. त्यांच्या दुसऱ्या हातामध्ये एकात एक ठेवलेल्या मोठ्या कटोऱ्यांची चळत असते. येणारे-जाणारे लोक आणि मशिदीमध्ये आलेले भाविक त्यांच्याकडून पाणी घेऊन तहान भागवतात. मुंबईत पिढ्यानपिढ्या राहिलेले किंवा गेल्या तीस-चाळीस वर्षांमध्ये आलेले भिश्ती प्रामुख्याने राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून आलेले आहेत. मुंबईच्या इमामवाड्यातील एक भाग भिश्ती मोहल्ला म्हणूनच ओळखला जातो. आपल्याकडे त्यांची महाराष्ट्र भिश्ती समाज नावाची संस्थाही आहे म्हणे.
उत्तरेत रजपूत राजे आणि मुघलांनी यांना युद्धकाळात आपल्या सैनिकांना पाणी देण्यासाठी कामावर ठेवलेलं होतं. तहानलेल्या सैनिकांना पाणी देणं हे त्यांचं कामं. भिश्ती लोकांच्या लोककथाही भरपूर आहेत. निझाम नावाच्या त्यांच्या एका पूर्वजाने हुमायून बादशहाचे प्राण वाचवल्याची कथा ते सांगतात. शेरशाह सुरीच्या विरोधात लढताना हुमायून चांगलाच अडचणीत सापडला. त्याचे आप्तस्वकीयच शत्रूला जाऊन मिळाले. जखमी अवस्थेतच लढताना, हुमायून आणि त्याचा घोडा नदीमध्ये बुडू लागले. आपला बादशहा बुडतोय, हे पाहून निझाम नावाच्या भिश्तीने आपले मशक फुगवले आणि त्याच्या मदतीने हुमायूनपर्यंत तो पोहत गेला आणि राजाला वाचवलं, अशी ती कथा आहे. त्या बदल्यात हुमायूनने त्याला एका दिवसासाठी राजगादीवर बसवून सत्ता चालविण्याचे बक्षीस मंजूर केले. काही ठिकाणी अडीच दिवस राज्य चालवायला दिले, या काळात त्याने अनेक निर्णय घेतले व चामडी नाणे आणि चामडी झेंडाही तयार केला, असे म्हणतात. थोडक्यात, मुघलांच्या सततच्या लढाईच्या काळात यांचं महत्त्व वाढलं होतं. ही परंपरा ब्रिटिशांनीही कायम ठेवली होती. रुडयार्ड किपलिंगची एका भिश्तीवर आधारित गुंगा डिन कविता जगप्रसिद्ध झाली होती.
मुंबईच्या इमामवाड्यात एकदा कामासाठी गेलो असता, पखालवाला माणूस दिसला आणि त्याला पकडायचं ठरवलंच. रहदारीच्या रस्त्यावरही भराभर चालणाऱ्या त्याच्यामागे अक्षरश: पळत जावं लागलं. महंमद अली रस्त्याच्या एका बाजूला या भिश्तीने त्याची पाण्याची गाडी लावलेली होती आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लहान विक्रेत्यांसाठी तो पखालीतून पाणी वाहून नेत होता. किल्ली दिलेल्या खेळण्यासारख्या एका ठरावीक चालीत आणि वेगाने जाणाऱ्या त्याच्याशी बोलणं चांगलंच धावपळीचं होतं. त्याच्या कामाची वेळ असल्यामुळं थांबवताही येत नव्हतं. जैरीबुल त्यांचं नाव. गेली चाळीसेक वर्षे मुंबईत पखालीने पाणी भरण्याचं काम जैरीबुल करतात. मळकट लुंगी आणि खाकी शर्टबरोबर एक पाण्यानं भरलेली पखाल अशा त्याची महंमद अली रोडवर इकडून तिकडे खेपा चाललेल्या. दिवसभराच्या त्यांच्या काही ऑर्डर ठरलेल्या असतात. या रस्त्यावर फळं, रस विकणारे भरपूर लोक आहेत, त्यांना पाण्याची गरज असते आणि रस्त्यावर थेट नळ नसल्यामुळे त्यांना या पखालवाल्या भिश्तींचाच आधार होता. या फळवाल्या आणि रसवाल्यांची पिंपं भरण्याचं काम जैरीबुलकडे होतं.
ते म्हणाले, आम्ही एरिया वाटून घेतलेत. दोघं-दोघं हे काम करतो. बावडीवरून पाणी भरून हे ढकलगाडीवरचे टँकर ठरावीक जागी लावून ठेवायचे. मग मशकमध्ये पाणी भरायचं आणि जागोजागी पिंपं भरून यायची. जैरीबुलच्या मते मशकमध्ये पाणी थंड राहतं, म्हणून त्यांच्याकडून लोक पाणी घेतात. जैरीबुल बिहारचे होते, मुंबईत जगणं महाग असल्यामुळं सगळं कुटुंब गावाकडेच ठेवलंय. पिढ्यानपिढ्या दुसरा कोणताच उद्योग घरी केला नसल्यामुळे, त्यांनी हेच काम स्वीकारलं.
जैरीबुलचा निरोप घेऊन आणखी भिश्ती कोठे सापडतील? असे विचारलं, तर ते लगेच म्हणाले, 'इस गलीसे कहाँ भी जाओ आपको वो लोग मिलेंगे'. जरा पुढं गेल्यावर नळबाजारात खरंच एक भिश्ती दिसले. एरव्हीसुद्धा हे लोक डोळ्यांसमोरच असतील, पण या गर्दीत ते कोठेतरी मिसळून जातात. भराभर चालण्यामुळे ते गर्दीत दिसेनासे होतात, पण आज अचानक ते दिसायला लागले होते.
एका कोपऱ्यावर दोन चाकाचे हाताने ढकलायचे टँकर लावून फूटपाथवरच्या एका बाजूने उघड्या झोपडीत सर्फुद्दीन बसले होते. रविवार असल्यामुळं निवांत होते. ते राजस्थानमधून मुंबईला आलेले आहेत. एक माणूस एका कुशीवर झोपू शकेल, एवढ्याशा त्या झोपडीत त्यांनी सगळ्या गरजेच्या वस्तू बसवलेल्या होत्या. पेव्हिंग ब्लॉक एकावर एक ठेवून दीड-दोन फूट उंचीवर हा आडोसा तयार केलेला. (तसेही हे ब्लॉक्स निरुपयोगीच असतात, किमान यांनी तरी त्याचा उपयोग केला हे पाहून बरं वाटलं). रेडिओ, फॅन, उर्दू कॅलेंडर, डोक्यावर येणाऱ्या कपडे वाळत घालायच्या दोऱ्या, चिमटे, बादल्या असं मोड्युलर किचनसारखं त्यांचा मोड्युलर संसार होता.
त्यांच्याशी गप्पा मारेपर्यंत आणखी दोन भिश्ती समोरून पाण्याचा टँक ढकलत आले. हे उमरदिन आणि सारिफ. हे सगळे पन्नाशी ओलांडलेले आणि क्वचित साठीचेही असावेत. वषार्नुवर्ष एकच काम करून थकलेले होते. ही जड बॅग खांद्याला दिवसभर लावल्यामुळे त्रास होत नाही का? असं विचारताच उमरदिन म्हणाले, 'तकलिफ तो बहोत होती है, लेकीन करना पडता है'.
हे दोघेही राजस्थानचेच होते. अजमेर शरिफजवळही हेच काम करत होते, पण सत्तरच्या दशकात तिकडच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील, म्हणून स्थलांतर केलं. उमरदिन यांचे वालिदही मुंबईतच पाणी भरायचे काम करत होते. त्यांच्यापाठोपाठ हे इकडे कामासाठी आलेले. या दोघांचीही मुलं शाळा-कॉलेजात जातात, पण इकडे पोट भरत नाही, म्हणून त्यांना गावाकडं ठेवलंय. 'ये देखो हम कहाँ रहतेहे, हमे खाने-पिनेको, रहनेको जगा नहीं तो उनका पेट कैसे पालें', असं सांगत, त्यांनी ते 'तिघांचं घर' मला बोटाने दाखवलं. भिश्ती मोहल्ल्यात भिश्ती राहातच नाहीत. 'वो तो सिर्फ नाम का मोहल्ला रह गया है. सब लोग इधर-उधरही रहते है', असं सारिफ म्हणाले.
तुमचा हा पिढीजात धंदा तुमची मुलं पण करणार का? असं विचारताच, ते म्हणाले, 'नाही. मुलांनी शिक्षण घेतलंय, ती हा धंदा करणार नाहीत, त्यांच्या नशिबात असेल ते त्यांना मिळेल, पण ते या धंद्यात येणार नाहीत. आम्ही सगळे संपलो की भिश्ती व्यवसायही संपेल'. खरंच होतं, ते त्या दिवसात जितके भिश्ती दिसले, ते सगळे पन्नाशी उलटलेलेच होते. ह्यनयी पिढी नही आयेंगी, इसमे नयी भरती नहीं है, असं म्हणत उमरदिन आणि सरिफ दोघेही हसले. सर्फुद्दिनना आमच्या बोलण्यात आजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यांनी सरळ झोपडीत जाऊन आमच्याकडे पाठ करून वामकुक्षी सुरू केली.
उमरदिन आणि सारिफनी पाण्याच्या गाडीवर टाकलेले दोन मशक दाखवले. मशक ही खरी त्यांची पिढीजात 'अॅसेट'. या एकमेव भांडवलावर ते धंदा करतात. अख्ख्या बकरीच्या पूर्ण कातडीने बनवलेल्या या पिशवीत पाणी भरतात आणि एका खांद्यावर घेऊन ती वाहतात. त्या तिघांच्या मते हे कातडं कमावणं साधसुधं काम नाही. नेहमीचे चप्पलवाले हे काम करूच शकत नाही, असं उमरदिन म्हणाले. 'अगर कोई दुसरा ये मशक बनायेगा, तो उसमेसे पानी टपकेगा'. मग म्हटलं, 'या' मशक कोणी शिवून दिल्या आहेत. तर ते म्हणाले, त्यांचा शिवडीला कोणी एक रेहमान नावाचा भिश्तीच 'कारिगर' आहे म्हणे, तो या बनवून देतो. तो फिरतफिरत येतो इकडे कधीकधी आणि नव्या मशक बनवून देतो, नाहीतर दुरुस्ती करून देतो. मशकची किंमतही दोन-तीन हजारांच्या पुढे सुरू होते. या एका मशकमध्ये तीस लीटर पाणी मावते आणि मशकच्या एका खेपेसाठी त्यांना तीस रुपये मिळतात. दिवसभरात अशा तीस-चाळीस खेपा कराव्या लागतात.
उन्हाळ्यात किंवा सणासुदीच्या काळात यांच्याकडच्या पाण्याला मागणी वाढते, पण आता नळ आले असताना तुमच्याकडून पाणी घ्यायची काय गरज पडते, असे या दोघांना म्हटलं, तर सारिफ म्हणाले, 'अहो ते नळ तुमच्यासाठी, इथं रस्त्यावर राहणाऱ्यांचं काय? उनका नहाना-धोना कहाँ करे? या लहानलहान विक्रेत्यांना लागणारं पाणी ते कुठून आणतील?' असं म्हणून त्यांनी शेजारच्या लोकांकडे बोट दाखवले. खरंच, आजूबाजूचे फूटपाथ लोकांनी खच्चून भरलेले होते. त्या सगळ्यांना घरं नव्हती. या अशा टीचभर झोपड्यांचे आडोसे त्यांनी सगळ्यांनी केलेच असतील, पण पाण्यासाठी भिश्तींशिवाय पर्याय नव्हता.
एके काळी या भिश्तींना पाण्यासाठी विहिरीवर (त्यांच्या भाषेत बावडीवर) जाऊन पाणी भरावं लागे. आता ते सी. पी. टँकच्या बावडीवर हे चाकाचे लहान टँक ढकलत घेऊन जातात, तिथून भरून आणलेले टँकर आपापल्या एरियात लावतात आणि एकेक मशक भरून पाणी वाटतात. या बोलण्यात बराच वेळ गेला होता. दोघांच्याही ऑर्डरची वेळ झाली होती. चाकाच्या टँकची तोटी उघडून त्यांनी आपापले मशक भरले आणि खांद्यावर अडकवले. मशकची मान पिरगाळून एका हातात धरली आणि मशकच्या हँडलवरती जोडलेल्या वादीने तोंड बंद केलं आणि बोलताबोलता ते गर्दीत नाहीसेही झाले.
गुंगा डिन
गुंगा डिन (काही ठिकाणी उच्चार गंगाडिन असा केला जातो) नावाच्या काल्पनिक भिश्तीवर रुडयार्ड किपलिंगने १८९२ साली कविता लिहिली. हा गुंगा लढाईच्या काळामध्ये जिवाची पर्वा न करता सैनिकांना पाणी देत असे. एका युद्धाच्या प्रसंगी पाणी आणायला उशीर झाला, म्हणून ब्रिटिश अधिकारी त्याला मारतो आणि त्याचा अपमान करतो, मी तुज्यापेक्षा उच्च दर्जाचा आहे याची जाणीव करून देतो. दुर्दैवाने या युद्धात गुंगाला गोळी लागते आणि त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यास आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो आणि गुंगाच्या शवाजवळ बसून माणूस म्हणून माझ्पेक्षा तूच उच्च होतास, अशा शब्दांत तो भावना व्यक्त करतो, अशी ही कविता होती. या कवितेची प्रेरणा घेऊन १९३९ साली गुंगा डिन नावाचा हॉलीवूडपट तयार करण्यात आला. त्या काळात हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता.
जातीचा ठसा नष्ट व्हावा- सरोवर झैदी, सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ आणि स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक
भिश्ती लोकांना मी सर्वात प्रथम डोंगरी आणि नळबाजार परिसरामध्ये मोहरमच्या मिरवणुकीच्यावेळेस पाहिले. वर्षभर भिश्ती लोक आजूबाजूच्या भागामध्ये लोकांना, लहान व्यापाऱ्यांना पाणी पुरवतात, आजही उन्हाळ्यात किंवा पाण्याचा तुटवडा असेल अशा काळामध्ये उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वच्छतेच्या कामासाठी लागणारे पाणी भिश्तींकडून घ्यावे लागते. मुंबईप्रमाणेच दिल्लीमधील निजामुद्दीन दर्ग्याजवळही भाविकांना पाणी देणारे भिश्ती आढळतात. बदलत्या काळानुसार शहरात पाणी मिळवण्याचे नवे पर्याय निर्माण झाले आहेत. यामुळे भिश्ती लोकांना हा जुना व्यवसाय बदलून दुसरा व्यवसाय करता आला तर उत्तम होईल. त्यामुळे व्यवसायाबरोबर भारतीय जातीप्रथेतून आलेला जातीचा ठसाही नष्ट होईल.
सर्व फोटो: दत्ता खेडेकर