युद्धाची दुसरी बाजू : उत्तेजक; उन्नत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:35 AM2017-12-03T01:35:22+5:302017-12-03T01:36:10+5:30
युद्ध म्हणजे केवळ विनाश, केवळ विध्वंस असे गेल्या शतकभरात परोपरीने व कंठरवाने शिकविले गेले. युद्ध कोणत्याही अर्थी केवळ नुकसानकारकच असे अनेकानेक शांतिदूतांनी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले.
- डॉ. नीरज देव
युद्ध म्हणजे केवळ विनाश, केवळ विध्वंस असे गेल्या शतकभरात परोपरीने व कंठरवाने शिकविले गेले. युद्ध कोणत्याही अर्थी केवळ नुकसानकारकच असे अनेकानेक शांतिदूतांनी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले. त्यांचे म्हणणे हेच की, युद्ध म्हणजे अन्याय, अत्याचार असतो, मानवी जीवनाला शाप असतो. ते कोणत्याही काळी व कोणत्याही वेळी टाळणेच योग्य असते. त्याने मानवाचा विकास, प्रगती खुंटते, याउलट शांतीच्या काळात झपाट्याने विकास होतो, मानवी मूल्ये जपली जातात.
इतकी वर्षे शिकून आपल्यालाही तसेच वाटू लागले. धार्मिक, सामाजिकच नव्हे, तर मोठे-मोठे राजकीय नेत्यांच्या हुंकारातही हेच शांतीचे बोल उमटू लागले. खरे तर ती मानवी मनाने सांधलेली उंचीच होती, पण प्रत्यक्षात काय आहे? शांती माणसाला चैनीत, मजेत दिवस घालवायची सवय लावते, आळस वाढविते, माणसातील स्वार्थीपणा वाढविते, माणसाला स्व-सुखात गुंतविते. ती माणसाला माणसापासून दूर नेते. मी-माझे पाहायला शिकविते. याउलट युद्धमान स्थिती माणसाला माणसाजवळ आणते, माणसाचे व्यक्तित्त्व समष्टीत विलीन करते. व्यक्तिगत स्वार्थाला राष्टÑीय वा सामाजिक स्वार्थात विलीन करते, बहुतेकांना कार्यमग्न करते, युत्तत्या-प्रयुत्तत्या शिकविते, व्यक्तिगत स्वार्थापासून दूर नेते. इतकेच कशाला, महान नेतृत्वाला जन्म देते. पटत नाही?
मग मला सांगा, स्वतंत्र भारतातला नेता तुम्हाला अधिक नि:स्पृह वाटतो की, परतंत्र असलेल्या भारतातला? लोकमान्य, गांधी, सावरकर, सुभाषचंद्र व भगतसिंह यांच्या तुलनेत स्वतंत्र भारतातला कोण सापडतो? भारताचे एक वेळ बाजूला ठेवा, पण जगाचे बघा. कोवूर, लेनिन, चर्चिल, हिटलर आदींच्या तुलनेत आधुनिक जगातील कोण आढळतो? तुमचे हात निश्चितपणे यांच्याचकडे वळतील. तीन-चारशे वर्षांपूर्वीचा शिवाजी असो वा लिंकन, महाराणा प्रताप असो वा नेपोलियन, तुम्हाला ते आपसूकच आठवतील. याचे कारण हेच की, हे सारे नेते येनकेन प्रकारे युद्धमान परिस्थितीत वावरत होते.
युद्धाची विनाशकता वा विध्वंसकता ही केवळ एक बाजू आहे. दुसरी बाजू तितकीच मोहक, आकर्षक असते. युद्ध मानवी बुद्धीला चालना देते. नवनव्या शोधांना जन्म देते. युद्ध नसते, तर तारायंत्राचा शोध लागला नसता, अंधांना ब्रेल लिपी मिळाली नसती, अणुशक्तीचा उपयोग कळला नसता, हे तर वानगी दाखल झाले.
जगातील बहुतेक वैज्ञानिक, सामाजिक, मानसशास्त्रीय शोधांची जननी युद्धच असते. एवढेच कशाला, मानवी मूल्यांना नवनवीन परिमाणे देणारे, उंची देणारे युद्धच असते. युद्धामुळेच मानवी जीवनाचे मूल्य ही कळते. युद्ध जेवढे मोठे तेवढे त्याचे फायदे जास्त असतात. दुसºया महायुद्धाचे बघा! अनेक मानस-तांत्रिक सुधारणा व शोधांचे मूळ या महायुद्धात आहे. याच महायुद्धामुळे साम्राज्यशाही कोलमडून पडली. भारतच नव्हे, तर जगातील अनेक गुलाम देशांना लाभलेले स्वातंत्र्य दुसºया महायुद्धाचाच परिणाम आहे.
कोणी म्हणेल, दुसºया महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीवर टाकलेला तो विध्वंसक अणुबॉम्ब, मारले गेलेले ते निरपराध लाखो लोक तुम्ही विसरलात का? ते दु:ख तुम्हाला स्मरत नाही का? हो, स्मरतेय सारे! ते दु:खावेग, ती स्मशानाहून भयाण झालेली दोन्ही नगरे स्मरतात सारी. त्यात मरण पावलेले लाखो जीवही दिसतात अन् केवळ त्याच विध्वंसाच्या धाकाने वाचलेले आजपावेतोचे अब्जावधी जीवही दिसतात, पण तुम्हाला आजचे दिसत नाही का? युद्धात बॉम्ब टाकणारी ती अमेरिका, अणुबॉम्ब हल्ला पचविणारा तो जपान, जगातील दोन अग्रगण्य सत्ता आहेत, हे तुम्ही कसे काय विसरता? विजेता व पीडित दोघेही ‘युयूत्सू’! हीच तर महायुद्धाचीच किमया. युद्ध केवळ अन्यायासाठी लढले जात नसते, तर अन्याय अत्याचाराच्या निवारणासाठीही लढले जाते.
युद्ध केवळ तांत्रिक विकास करत नाही, तर मानवी मूल्यांना नवीन परिमाण देत असते. कलिंगच्या विध्वंसक युद्धभूमीवरूनच अहिंसेचा त्राता पुण्यश्लोक अशोक जन्मला होता, हे कसे विसरता येईल? त्या काळी मोठ्या मानल्या गेलेल्या महाभारतीय युद्धातून जगाला सर्व काळी पथदर्शक गीता जन्मली होती, हे कसे विसरता येईल?
श्रीरामाचे धनुष्य असो वा श्रीकृष्णाचे सुदर्शन, मुहंमदाची तलवार असो वा गुरू गोविंदाचे कृपाण, युद्धाची गरज अन् उपयुक्तताच दाखवितात. महिषासूरमर्दिनी असल्यानेच दुर्गा मंगलमय होते, रक्तप्राशन करणारी चामुण्डा रक्षणकर्ती वाटते, हिरण्यकश्यपु वधकर्ता असल्यानेच भीषण नरसिंह भद्रकारी वाटतो, हे सारे आपण कसे काय विसरतो?
पुराणातील बाता सोडा, आज तुम्ही ज्यांना महासत्ता संबोधता, ती अमेरिका, तो जापान केवळ युद्धबळानेच सर्वोच्च स्थानी आहेत. थोडक्यात काय, तर शांतीचे सूक्त गावे, पण युद्धाचे दुसरी बाजू विसरू नये. युद्ध सामर्थ्याची अवहेलना करू नये.