आधी वाहनांचे उत्पादन कमी करावे लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:36 AM2018-02-04T01:36:49+5:302018-02-04T01:37:01+5:30
नोव्हेईकल डे असावा ही उच्च न्यायालयाची सूचना नक्कीच मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची ठरेल़ मात्र त्याआधी वाहनांचे उत्पादन कमी करण्यासाठी ठोस असे धोरण आखणे आवश्यक आहे. कारण मुंबईत सध्या असलेल्या वाहनांचे नियोजन होऊ शकते़ पण वाहनांमध्ये वाढ होत असेल तर कितीही नियोजन केले तरी त्याची अंमलबजावणी होणे अवघड आहे.
- अॅड. प्रकाश साळशिंगीकर
नोव्हेईकल डे असावा ही उच्च न्यायालयाची सूचना नक्कीच मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची ठरेल़ मात्र त्याआधी वाहनांचे उत्पादन कमी करण्यासाठी ठोस असे धोरण आखणे आवश्यक आहे. कारण मुंबईत सध्या असलेल्या वाहनांचे नियोजन होऊ शकते़ पण वाहनांमध्ये वाढ होत असेल तर कितीही नियोजन केले तरी त्याची अंमलबजावणी होणे अवघड आहे. वाहने वाढल्याने अनेक समस्या उद्भवतात़ प्रदुषण, वाहतूक कोंडी, वाहनतळासाठी जागेचा अभाव हे तूर्तास तरी न सुटणारे प्रश्न आहे़ त्यातूनही न्यायालयाने या समस्येची गंभीर दखल घेतल्याने थोड्याफार प्रमाणात वाहतूक नियोजनाची आखणी प्रशासनाने सुरू केली आहे. एक कुटुंब एक वाहन या धोरणाचा सरकारने विचार सुरू केला़ पार्किंग असेल तरच वाहनाची नोंदणी होईल हा नियम अंंमलात आला़ असे बदल भविष्यातही होऊ शकतात़ त्यासाठी प्रशासनाची इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी.
मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे़ येथील जीवनमानाचा दर्जाही वाढत आहे़ आताच रस्त्यावरून चालणाºयांना सिग्नल ओलांडताना नाहक त्रास होतो़ अजून तरी प्रदुषणाने मुंबईत मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरलेले नाहीत़ भविष्यात मुंबईत दिल्लीसारखी परिस्थिती ओढवू नये, यासाठी आतापासूनच ठोस उपाययोजना करायला हव्यात़ नियम कठोर करणे हा एकमेव प्रभावी पर्याय सध्या प्रशासनासमोर आहे़ त्यासोबतच थोडासा आर्थिक तोटा सहन करून शासनाने वाहन उत्पादन काही वर्षांसाठी कमी करायला हवे़ मुंबईत प्रवेश केल्यानंतर चेंबूर, प्रियदर्शनी पार्क, सायन, दादर, लालबाग, मोहम्मद अली रोड या जंक्शनवर सर्वाधिक वाहतूक कोंडी असते़ सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेली वाहनांची वर्दळ दुपारी १ वाजेपर्यंत असते़ येथील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून या मार्गावर प्रियदर्शनी पासून जे़जे़ रूग्णालयापर्यंत उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्यात आले़ तरीही या मार्गावर कमालीची वाहतूक कोंडी असते़ याचे मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस वाहनांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे़ दुसरीकडे या मार्गावर रस्ता रूंदीकरणाचा पर्याय नाही़ त्यामुळे वाहनांची संख्या वाढू न देणे यातूनच वाहतूक कोंडीचे नियोजन होऊ शकते़ वाहनांची संख्या वाढल्याने या मार्गावर पार्कींगची समस्याही वाढली आहे़ मुंबईत येणाºया मुख्य मार्गावर वाहनांचे डबल पार्किंग केले जाते़ परिणामी वाहनांना जाण्यासाठी एकच लेन राहते व वाहनांची एकापोठापाठ रांग लागते़ सायनपासून सीएसएमटीपर्यंतचे एक तासाचे अंतर कापायला दोन तास लागतात़ या मार्गावर सतत रस्त्याची कामे सुरू असतात़ यानेही येथे वाहतूक कोंडी होते़
वाहने वाढू न दिल्यास आहे त्या वाहनांमध्ये वाहतुकीचे चांगल्याप्रकारे नियोजन होऊ शकते़ वांदे्रमार्गे मुंबईत येणाºया मार्गावरील परिस्थितीही अशीच आहे़ अगदी अंधेरीपासून या मार्गावर उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्यात आले आहे़ मात्र याने वाहतूक कोंडी कमी होण्याचे प्रमाण तुरळकच आहे़ त्यात या मार्गावर भुयारी मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे़ या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळच्या वेळेत बंदी करण्यात आली आहे़ प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या पर्यायाचा परिणाम अजून तरी जाणवत नाही़ या मार्गावरही डबल पार्किंगचे प्रमाण अधिक आहे़ डबल पार्किंगमुळे येथे ही वाहतूक कोंडी होते़ असे असताना वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी वाहने वाढत असतील तर त्याची अमंलबजावणी अशक्यच आहे़ वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व वाहतुकीचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यासाठी न्यायालयाने वार्डनिहाय कमिटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते़ ही समिती स्थापन करण्याचे आश्वासनही शासनाने न्यायालयाला दिले़ मात्र ही समिती स्थापन झाली अथवा या समितीने पुढे काही काम केले याचा खुलासा अद्यापही झालेला नाही़ सध्या खाजगी वाहतुकीचे अनेक पर्याय मुंबईकरांना आहेत़ ओला, उबर हा नवीन पर्याय उच्चभू्रंपासून सर्वसामन्यापर्यंत सर्वांच्याच पसंतीला उतरला आहे़ सकाळी व संध्याकाळच्या वेळेत यांची कमाईदेखील चांगली होते़ मात्र हा पर्याय एकट्याने जाण्यासाठी अधिक वापरला जातो़ त्यामुळे या वाहनांचे प्रमाण मुंबईत वाढले आहे़ यावरही तोडगा काढणे आवश्यक आहे़ या पर्यायाचा वापर तीन किंवा चार जणांनी मिळून केला तर वाहनांची संख्या कमी होऊ शकते़ १९८० च्या दशकात इंधन तुटवड्यामुळे चार आमदारांनी एकाच सरकारी वाहनातून मंत्रालय गाठण्याचा निर्णय घेतला होता़ असा पर्याय सनदी अधिकारी, मंत्र्यांनी आठवड्यातून एकदा तरी करायला हवा़ जेणेकरून थोडी का होई ना वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल़
शेअर टॅक्सी व रिक्षाचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे़ यामुळे रेल्वे स्थानकांच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते़ याचे नियोजन करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात वाहतूक पोलीस अपयशीच ठरत आहेत़ तेव्हा प्रत्येक रस्ता, महामार्ग यासाठी स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक आहे़ मात्र हे नियोजन आहे त्या वाहनांतच होऊ शकते़ वाहने वाढत असतील तर कितीही प्रभावी नियोजन केले तरी त्याचा उपयोग होणार नाही़
तसेच मेट्रो, मोनोचे प्रस्तावित प्रकल्प तातडीने पूर्ण करायला हवेत़ हे प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना वाहतुकीचा दर्जेदार पर्याय मिळेल़ मात्र याचे प्रवासभाडेही सर्वसामान्यांना परवडेल असेच ठेवायला हवे़ तसे केल्यास अधिकाधिक मुंबईकर मेट्रो, मोनोला पसंती देतील व वाहतुकीची, प्रदुषणाची समस्या कमी होऊ शकेल़ मात्र नियम तयार करताना शासनाने न्यायालयाच्या आदेशाची किंवा दुर्घटनेची वाट बघू नये़ आताही न्यायालयाने नो व्हेईकल डेची केलेली सूचना अंमलात आल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल़ आठवड्यातून एक दिवस तरी वाहतूक सुरळीत राहिल़ प्रदुषण कमी होईल़ तेव्हा शासनाने या सूचनेचा सकारात्मक विचार करायला हवा.
(लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)