सारस्वताच्या बखरीतलं पान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 02:34 AM2017-11-26T02:34:21+5:302017-11-26T02:34:41+5:30
सध्या सर्वसाधारण व्यक्तीचे आयुर्मान वाढले असले तरीपण आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने जगणारे आणि दुस-यांना आनंदित करणारे फार दुर्मीळ झालेले आहेत. अशा दुर्लभ दीर्घायुंपैकी एक न. म. जोशी आहेत. त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आमंत्रण आले तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले.
- रविप्रकाश कुलकर्णी
सध्या सर्वसाधारण व्यक्तीचे आयुर्मान वाढले असले तरीपण आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने जगणारे आणि दुस-यांना आनंदित करणारे फार दुर्मीळ झालेले आहेत. अशा दुर्लभ दीर्घायुंपैकी एक न. म. जोशी आहेत. त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आमंत्रण आले तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले. यानिमित्ताने त्यांना अभिनंदन करताना विचारले, ‘‘नम, तुम्ही किती सहस्त्रदर्शन पाहिले आहे?’’
न. म. जोशींबद्दल विशेष सांगायचे तर ते हुकमी उत्तम बोलू शकतात. लिहूही शकतात. जनरल अरुणकुमार वैद्य असो किंवा इतर अनवट चरित्र लिहिणारे ते एकमेव आहेत. त्यांच्या बोधकथा, चरित्रकथा, गोष्टी म्हणजे अलीकडच्या काळातील हकिकतींचे भांडार आहे. शिवाय नम पिंडानेच शिक्षक असल्यामुळे त्यांच्या मागे ‘डॉ.’ ही पदवी असली तरी त्यांचे लेखन-भाषण सुबोध, ऐकणाºयाला, वाचणाºयाला हवेहवेसे वाटते.
पण या सर्वावर डॉ. न.म. जोशी यांनी कळस चढवला असेल तो त्यांच्या ‘बखर एका सारस्वताची’ या आत्मवृत्तामुळे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच त्यांनी गेल्या सहा दशकांत मराठी संस्कृती, साहित्य, शिक्षण याचे जे सम्यक दर्शन टिपले आहे त्यामुळे त्यांची ‘बखर’ लक्षणीय ठरली आहे.
बखर नावाचा उलगडाही त्यांनीच केला आहे. ‘याला बखर हे नाव दिले आहे. आणि तेच अन्वर्थक आहे. बखर हा इतिहास असतो. पण तो रंजक पद्धतीने मांडलेला असतो. घटना वास्तव असली तरी तिला कल्पनेची सुरेख किनार दिसते. तर या बखरीत नसलेली हकिकत यानिमित्ताने सांगायला हवी.
बखरला सारस्वताच्या सुरुवातीच्या निवेदनात नमनी म्हटले आहे. प्रकाशक आनंद साने यांनी हे साहसच केलेय.’ हे साहस ते कसले?
आनंद साने यांची अंजली पब्लिशिंग हाउस ही काही ललित वाङ्मय प्रकाशित करणारी संस्था नव्हे. मग सानेंनी एका सारस्वताची ६१६ पृष्ठांची ही भरभक्कम ‘बखर’ कशी काय प्रकाशित केली? आनंद साने यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी भारत स्कूलमध्ये आठवीला असताना एक वर्ष शिकवायला नम होते. पुढे ते नु. मं. विद्यालयात गेले. पण तो ऋणानुबंध त्यांनी कायम टिकवला. प्रत्येक भेटीत ते एखादी कथा, गोष्ट, हकिकत अशी काही सांगत की मी त्यांना म्हणे, सर तुम्ही हे सर्व लिहा. हा संवाद दर भेटीत ठरलेला. तेव्हा गेल्या वर्षी नम म्हणाले, ‘‘मी लिहीन रे.. पण ते छापणार कोण?’’
त्या क्षणी मी सांगितले, ‘‘मी छापतो. मात्र एका वर्षात संगळं झालं पाहिजे.’’
मग दर ३० तारखेला एक प्रकरण याप्रमाणे सर लेखन देत गेले. ‘बखर’च्या प्रकाशनावेळी पेचप्रसंग निर्माण झाला होता. या बखरचे प्रकाशन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करायचे, असे नम म्हणाले.
मी म्हटले, हे कोण सबनीस? तेव्हा नम म्हणाले, यंदाच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. तेव्हा सबनीस तर सबनीस. त्यांना आमंत्रण केले. त्यांनीही होकार कळवला. तशा पत्रिका छापून झाल्या. या सबनीसांनीपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधात काही वक्त व्य केले आणि गदारोळ निर्माण झाला!
सबनीसांना पोलीस प्रोटेक्शन देण्याची वेळ आली... आता काय करायचे?
समारंभातील इतर काही वक्त्यांनी केवळ नाराजीच नव्हे, तर मला धमकी दिली. सबनीस असतील तर.. वगैरे वगैरे. मला वाटले सबनीसांना सांगावे येऊ नका म्हणून.
पण नम म्हणाले, ‘‘एक दिवस वाट पाहू. नाहीतर..’’ पण दुसºयाच दिवशी त्यांच्या पत्नीचा फोन आला, की प्रकृती अस्वास्थ्यामुळे सबनीस प्रकाशनाला येऊ शकणार नाहीत!
प्रश्न सुटला.
मग ‘बखर’चा प्रकाशन सोहळा दणक्यात झाला! तर असा हा किस्सा बखरीत शोभण्यासारखाच. तो कधीतरी न. म. जोशी लिहितीलच. त्याची आठवण म्हणून ही नोंद!