मेंदूतला माणूस शोधण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:09 AM2018-03-04T01:09:35+5:302018-03-04T01:09:35+5:30

मेंदू विज्ञानाचा इतिहास हा ४० हजार वर्षांपूर्वीपासून सुरू झालेला आहे. मेंदूबाबत असलेले कुतूहल समजण्यासाठी त्या काळी आणि त्याची रचना समजण्यासाठी त्या काळी मानवाने कवटीला छिद्रे पाडून मेंदूचे निरीक्षण करायला सुरुवात केली.

 To search manuscript | मेंदूतला माणूस शोधण्यासाठी...

मेंदूतला माणूस शोधण्यासाठी...

- रचना पोतदार

मेंदू विज्ञानाचा इतिहास हा ४० हजार वर्षांपूर्वीपासून सुरू झालेला आहे. मेंदूबाबत असलेले कुतूहल समजण्यासाठी त्या काळी आणि त्याची रचना समजण्यासाठी त्या काळी मानवाने कवटीला छिद्रे पाडून मेंदूचे निरीक्षण करायला सुरुवात केली. ज्यांना आपण आज मन म्हणतो, त्यालाच त्या काळी आत्मा समजले जाई आणि हा आत्मा मेंदूत नसून हृदयात वास करतो, असेच मानले जाई आणि आजही त्याची प्रभाव कमी झालेला नाही. आजही चित्रपटगीतांमध्ये प्रेयसी ही प्रियकराच्या ‘दिलाच्या धडकन’मध्येच जागा व्यापून बसली आहे... पण खरे तर प्रेम ही भावना मेंदूतच निर्माण होते.

विश्वातले सर्वात जास्त गुंतागुंतीचे आणि अनोखे यंत्र म्हणजे मानवी मेंदू, ज्याचे वजन फक्त १३०० ग्रॅमच्या आसपास आहे आणि जो फक्त १,०००,०००,००० इतक्याच चेतापेशींच्या जुळण्यांनी बनलाय. ज्या सतत एकमेकांशी संवाद साधत असतात. अशा या जटिल अवयवाचा विचार करणेही अतिशय कठीण आहे. कारण तुम्ही मेंदूबद्दल विचार हा तुमच्या मेंदूनेच करू शकता.
अशा या आपल्या मेंदूला झालेल्या अपघात आणि जखमांच्या परिणामांबद्दल आपण अनभिज्ञ असतो. कारण तोपर्यंत आपण आपल्या मेंदूला आणि त्याच्या कार्याला गृहित धरलेले असते. कारण आपला मेंदू त्याचं काम इतक्या सहजतेने आणि स्वाभाविकपणे करतो की, आपण त्याबद्दल कधीही विचार करत नाही. इतक्या सफाईदारपणे हे होते.
आपल्या कदाचित माहितही नसते की, आपल्या मेंदूचे अनेक भाग आहेत आणि एखाद्या कामासाठी खूप सारे भाग समांतरपणे काम करत असतात, तसेच वयपरत्वे आपला मेंदू बदलत जातो. जसजसे आपल्याला विविध जीवनाभुव येतात, कधी क्लेश आनंदी, एक कधी अत्यंत साधे सहज. जसे की, आता आपण या लेखाचे हे जे शब्द वाचताय, त्यानेसुद्धा मेंदू बदलतोय. मेंदूबद्दलची अधिकाधिक आणि सखोल माहिती आणि ज्ञान हे मेंदू अपघाताच्या रुग्णांचा मेंदू अभ्यासातूनच उमगले आहे. या सर्वात अद्भुत आणि तितक्याच जटिल यंत्राच्या कार्यप्रणाली समजण्यासाठी अनेकांनी आपले संपूर्ण आयुष्य आणि मेंदू खर्ची घातलेत. मानवी मन, वर्तन आणि मेंदू याचा गहिरा संबंध अनेक मेंदूवैज्ञानिकांनी प्रयोगाअंती दाखवून दिले आहे, तसेच वर्तन आणि मेंदूच्या संबंधाबाबत अनेक पुरावे हे मेंदूला क्षती पोहोचलेल्या रुग्णांच्या अभ्यासातून, मानसिक पातळीवर सक्षम असताना मेंदू कसा काम करतो, याचाही वैज्ञानिकांनी अभ्यास केला आहे.
मेंदू विज्ञानाची झेप ही या शतकातील एक मोठी पर्वणी असणार आहे. कारण यामुळेच आपण मेंदूतला माणूस शोधण्यात यशस्वी होत आहोत.
अगदी अलीकडे २०० वर्षांपूर्वीपर्यंत मेंदू नेमका कसा कार्यान्वित होतो, हे मोठे कोडेच होते. खरे तर आजही विज्ञानाला फारच त्रोटक माहिती आहे आणि त्यावरून आपल्याला कळतेय. त्यापेक्षा मेंदूची कार्यपद्धती खूप जटिल आणि गुंतागुंतीची आहे.
मेंदूच्या शस्त्रक्रियेची सुरुवात खूप पूर्वी अश्मयुगापासून झाल्याची नोंद पुरातत्त्व तत्त्वज्ञांनी मिळालेल्या पुराव्यांनिशी केली आहे. त्यांच्या उत्खननात त्यांनी अश्मयुगकालीन कवट्या सापडल्या आहेत, ज्यांना गोलाकार छिद्रे पाडलेली आहेत. छिद्रे पाडण्यासाठी वापरण्यात येणाºया अवजाराला trephine असे म्हणतात आणि या शस्त्रक्रियेला trephinatiwn म्हणतात. पुरातत्त्ववेत्यांच्या मते, या शस्त्रक्रिया बहुतकरून मनोरुग्ण आणि विक्षिप्त वर्तणूक आणि आभास किंवा भास अनुभवणाºया, ज्यांना आज आपण छिन्नमनस्कता म्हणून ओळखतो आणि अतिशय तीव्र दु:ख अनुभवणाºया लोकांवर केल्या जात असत. त्यांच्या मते, या रुग्णांना भुताने किंवा वाईट शक्तींनी पछाडलेले असल्याने ते विक्षिप्त वागत असत. कवटीला पाडलेल्या छिद्रामुळे मेंदूत असणारी भुते आणि वाईट, अनैसर्गिक शक्ती निघून जातात आणि जर या शस्त्रक्रियेतून जे जिवंत राहील, तर भुताने त्यांचा ताबा सोडला आणि छिद्रातून ते भूत किंवा वाईट शक्ती निघून गेल्या. मेंदू विज्ञानाच्या इतिहासातील या पहिल्या शस्त्रक्रिया आहेत.
इतर काही पुरातत्त्ववेत्यांनी ही शस्त्रक्रिया वाईट शक्तीसाठीच केली गेली असेल का? यावर शंका उपस्थित केली आहे. काहींच्या मते, या शस्त्रक्रिया मेंदूतील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी केल्या जात असत. त्या काळी होणाºया युद्धातील दगडी अवजारांच्या हल्ल्यामुळे डोक्याला मार बसून बनत असत. मेंदू नेमका काय आहे? वैद्यकशास्त्राचा जनक हप्पाकेटस यांनी २५ शतकांपूर्वीच याच एक सर्वसमावेशक उत्तर देऊन ठेवले आहे. ‘आपले दु:ख, त्रास, वेदना, काळजी, अश्रूच नव्हे, तर आपला आनंद, मजा, हसू, समाधान (असे सारे काही आपल्या मेंदू आणि फक्त मेंदूतूनच निर्माण होत.), तसेच आपले विचार, आकलन विश्लेषण, आपली दृष्टी, श्रवण क्षमता, तसेच सुंदर आणि कुरूप, चांगले आणि वाईट, आनंददायी आणि निराशाजनक असे भेद करण्याची क्षमता... हे सारे काही फक्त आपल्या मेंदू आणि मेंदूतूनच निर्माण होते. या मेंदूविषयी म्हणूनच शास्त्रज्ञांना उत्सुकता होती. त्याविषयी त्यांनी केलेला अभ्यास काय होता, याविषयी पुढच्या लेखात जाणून घेऊ.

Web Title:  To search manuscript

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई