ना बाळासाहेबांची शिवसेना राहिली, ना महाजनांची भाजपा... कशी-कोण टिकवणार युती?
By अमेय गोगटे | Published: June 7, 2018 06:31 PM2018-06-07T18:31:53+5:302018-06-07T19:09:13+5:30
हळूहळू नेते बदलत गेले आणि शिवसेना-भाजपाचे नातेही....
शिवसेना-भाजपामध्ये दरी वाढत असल्याच्या हेडलाइन वृत्तपत्रात झळकताहेत... आता युती तुटणार, अशा तर्कवितर्कांना उधाण आलंय... साधारण, आठवडाभर राजकीय वर्तुळात या विषयावरून कल्ला सुरू आहे... अशातच, 'मातोश्री'वरचा फोन वाजतो... पलीकडे भाजपाचे नेते प्रमोद महाजन असतात... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची वेळ घेऊन ते 'मातोश्री'वर पोहोचतात... अन् या भेटीनंतर सगळं चित्रच पालटून जातं... बाळासाहेब प्रसन्न, महाजन खूश आणि युती अभेद्य अन् सुखरूप...
महाराष्ट्राच्या राजकारणात हा किस्सा एक-दोनदा नव्हे, तर अनेकदा घडला आहे. 'महाजनांमध्ये काहीतरी जादू आहे राव, बाळासाहेबांचा राग टिकतच नाही त्यांच्यापुढे', असं आश्चर्य अनेक शिवसेना नेतेही व्यक्त करायचे. महाजनांकडे प्रभावी वक्तृत्व होतं, चतुराई होती आणि बुद्धिमत्तेला तर तोडच नव्हती. हे सगळे गुण बाळासाहेबांना आवडणारे होते आणि म्हणूनच महाजनही त्यांचे लाडके होते. स्वाभाविकच, 'मातोश्री'चा त्यांच्यावर वरदहस्त होता. पण, आता बाळासाहेब नाहीत, बाळासाहेबांची शिवसेनाही नाही, इकडे महाजन नाहीत आणि आधीची भाजपाही नाही. म्हणूनच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेल्या युतीवर आज टांगती तलवार आहे आणि ही तलवार म्यानात ठेवण्याऐवजी, ती पटकावून समोरच्यावर उगारण्यातच दोन्हीकडचे नेते दंग असल्याचं दुर्दैवी चित्र आहे.
युती तुटीच्या उंबरठ्यावर असताना, 'संपर्क अभियान' असं गोंडस नाव देऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी 'मातोश्री'शी संपर्क साधला. ठेच लागल्यावर लहान मुलांना जशी आई आठवते, तशी मोठ्यांना 'मातोश्री' आठवते, अशा नेमक्या आणि मार्मिक शब्दांत त्यांच्या या भेटीचं वर्णन झालं. त्यांना चार वर्षांनी शिवसेनेची झालेली आठवण अत्यंत सूचक आहे. पण, 'देर आए दुरुस्त आए' या उक्तीनुसार, उशिरा का होईना त्यांनी सेनेसोबतचे मतभेद आणि मनभेद मिटवण्यासाठी पाऊल टाकलं, हेही नसे थोडके. आता ते महाजनांसारखं 'मॅजिक' करू शकतात का, याबद्दल शंकाच आहे. कारण, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र असलेली शिवसेनाही आता बदलली आहे आणि 'आदित्योदया'नंतर त्यांनी १०० टक्के राजकारणाची डरकाळी फोडली आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे हे युतीचे शिल्पकारच होते. युती हे जणू त्यांचं अपत्य होतं आणि मुलाला जन्मदात्याने जपावं तसं त्यांनी तिला जपलं-जोपासलं-वाढवलं होतं. महाजन, मुंडेंच्या निधनानंतर, एक-दोनदा नितीन गडकरींनी युतीसाठी शिष्टाई केली होती. त्यांच्या 'एक्स्प्रेस' स्पीडमुळे ते बाळासाहेबांचे लाडके होते. पण, हळूहळू नेते बदलत गेले आणि शिवसेना-भाजपाचे नातेही. आता हे नातं किती ताणलं गेलंय, हे वेगळं सांगायची गरज नाही. पालघरनंतर युतीला घरघरच लागली आहे.
एकीकडे विरोधक एकत्र येत असताना, युतीतील दोन पक्षांमध्ये दुरावा पाहायला मिळतोय. त्याला जबाबदार दोघंही आहेत. अर्थात, त्यामागे काही कारणंही असतील. तशी ती आधीही असायची. पण, बाळासाहेब-महाजन, बाळासाहेब-मुंडे, बाळासाहेब-गडकरी एकत्र बसून त्यातून तोडगा काढायचे. आता उद्धव-शहा त्यांचा कित्ता गिरवणार का, यावर बरंच काही ठरणार आहेत.