नकारात्मकतेचे महत्त्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 02:41 AM2017-11-05T02:41:31+5:302017-11-05T02:42:18+5:30
Be positive - सकारात्मक व्हा! चा संदेश सर्वच तथाकथित Motivational Speakers अन् विचारवंत जगाला देत असतात. ते पुन:पुन्हा सांगतात सकारात्मक विचार करा, मला अमूक जमणार नाही, असे म्हणू नका, उलट मला का जमणार नाही?
- डॉ. नीरज देव
Be positive - सकारात्मक व्हा! चा संदेश सर्वच तथाकथित Motivational Speakers अन् विचारवंत जगाला देत असतात. ते पुन:पुन्हा सांगतात सकारात्मक विचार करा, मला अमूक जमणार नाही, असे म्हणू नका, उलट मला का जमणार नाही? असे स्वत:ला विचारा. मला काहीच अशक्य नाही असे मनाला सांगा, वगैरे वगैरे...
सकारात्मकतेचा जयघोष करताना यातील बहुतेक सारेच नकारात्मकतेला वाळीत टाकतात. मनाच्या दुनियेत सतत वावरणारी नकारात्मकता कुणीतरी ‘उपटसुंभ अवदसाच’ आहे अशी जणू त्यांची धारणा होऊन जाते.
पण नीट बघितले तर ध्यानात येते की, जीवनात सकारात्मकते इतकेच नकारात्मकतेचेही महत्त्व आहे. नकारात्मकता मला माझ्या मर्यादा जाणायला शिकवते. मला अमूक येत नाही हे स्वत:ला समजणे ही माझी मर्यादा झाली. पण ती जर मी ओळखली नाही, तर मला त्यात नवे काहीच शिकता येणार नाही. याउलट मला माझी मर्यादा कळाली, तर ते शिकण्याची शक्यता अधिक असते. कधी कधी तर मला प्रयत्न करुनही अमूक अमूक येत नाही, हे कळणे व स्वीकारणे फायद्याचे ठरते. मला कमळ होता येत नाही ही मर्यादा न स्वीकारता गुलाबाचे फूल कमळ होण्याचा दुराग्रह करीत बसले, तर त्याला कमळही होता येणार नाही अन् गुलाबही! नकारात्मकता वास्तवाची जाणीव करुन देत असते. मी मालक नाही, माझी क्षमता नाही, मी पराधीन आहे इ. इ. ची ही जाणीव नकारात्मकतेची देण असते. ती नाकारण्यात वरवर सकारात्मकता दिसत असली तरी ती घातक ठरु शकते. यापेक्षा ती स्वीकारली तर पुढे कसा मार्ग काढता येईल किंवा नाही ते ठरविणे सुलभ जाते.
नकारात्मकता व्यक्तीचे पाय जमिनीवर ठेवायला कारण ठरते. सकारात्मकता उंच आकाशात उडायचे स्वप्न दाखवते पण कल्पनेच्या आकाशात सतत विहरणे धोकादायकच असते. ती एकप्रकारे मी इतरांपेक्षा वेगळा आहे, ही भावना तयार करते ती सामान्य माणसापासून दूर नेते, याउलट कितीही विकास केला, कितीही वर चढलो तरी आपण माणूसच आहोत, ही भावना नकारात्मकता देते.
नकारात्मकतेचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे ती आत्मचिंतनाला प्रवृत्त करते. आत्मचिंतनाने आपल्याला आपल्यातील त्रूटी, दोष व उणीवा दिसतात. त्यामुळे त्या दूर करणे वा तसा प्रयत्न करणे आपल्याला शक्य होते. नकारात्मकता असो वा सकारात्मकता सुयोग्य (appropriate)स्वरुपातीलच असली पाहिजे. जर त्या सुयोग्य स्वरुपातील असतील तर परस्पर पूरकच ठरतात. मी नापास झालो तर? ही मनात डोकावणारी शक्यता वरवर नकारात्मक वाटत असली तरी तो मी नापास होवू नये, यासाठी मला कार्यप्रवण करते, अपयशाची संभावना मला यशस्वी करण्यासाठी सहाय्यभूत ठरते. खरे सांगायचे तर, नकारात्मकता जीवनरुपी वस्त्राचे आडवे धागे असतात तर सकारात्मकता उभे धागे असतात. या उभया-आडव्या धाग्यांनीच आपले जीवनरुपी वस्त्र तयार होत असते.
(लेखक प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आहेत)