‘वडिलांच्या अचानक जाण्याने, आता त्यांच्या मूर्तिकलेचा वारसा पुढे न्यायचा आहे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 01:29 AM2017-08-20T01:29:35+5:302017-08-20T01:29:56+5:30
- विद्या राणे-शराफ
गणेशोत्सव आणि मुंबईचे नाते अतूट आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेशमंडळांच्या नयनरम्य, भव्य-दिव्य देखण्या मूर्ती पाहिल्या की, तोंडापुढे नाव येते, ते या मूर्ती घडविण्याचे काम करणारे सुप्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत विजय खातू यांचे. ज्याने गणेशमूर्तीची देखणी संस्कृती सातासमुद्रापार पोहोचविली, तो गणेशमूर्तीकलेतील हिरा, ऐन गणेशोत्सवाला एक महिना शिल्लक राहिलेला असताना निखळला आणि अनेक सुबक गणेशमूर्तींचा वारसा मागे ठेवत, त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अचानक आलेल्या या बातमीने सर्वच जण हादरून गेले. मूर्तिकलेतील एक खंदा मूर्तिकार गेल्याने, आता कसे होणार, त्यांनी उभारलेला हा डोलारा कोण पेलवणार, असा प्रश्न गणेशमंडळांसहित सर्वांनाच पडला. अशा वेळी पितृछत्र हरपल्याचे दु:ख आणि दुसºया बाजूला प्रचंड जबाबदारी यांची सांगड घालत, अगदी धाडसाने वडिलांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे आली, ती त्यांची मुलगी रेश्मा खातू.
खातू यांच्या वर्कशॉपमध्ये शिरताच, अनेक भव्यदिव्य मूर्ती ओळीने दिमाखात उभ्या राहिलेल्या दिसतात. अनेक मूर्तीशौकिन या मूर्तींचे फोटो आपल्या कॅमेºयांत बंदिस्त करीत तासंतास घालवितात. रेश्माला शोधत तिच्या आॅफिसमध्ये पोहोचले, तेव्हा एक तिशीची तरुणी दृष्टीस पडली. रेश्मा कामात एवढी गर्क झाली होती की, तिचे कौतुक वाटले. एवढ्या बिझी शेड्यूलमध्येही तिने हसून स्वागत केले आणि हळूहळू तिच्या कर्तव्यपूर्तीबाबतची पाने तिने उलघडायला सुरुवात केली.
रेश्माचे बालपण अगदी चारचौघांसारखे आनंदात गेले. एकत्र कुटुंब, तीन काका, सख्खी-चुलत भावंडे असा मोठा परिवार. अगदी आजोबांच्या काळापासून खातू कुटुंबात मूर्तिकला रुजलेली. सर्वच भावंडे लहानपणी गंमत म्हणून देवी, तसेच गणेशमूर्ती घडवून, मोठ्यांकडून शाबासकी मिळवित असत. लहानपणी आपल्या वडिलांनी साकारलेल्या सुंदर मूर्तींचे फोटो काढायला रेश्माला खूप आवडत असे, पण पुढे कधी आपल्यावर संपूर्ण वर्कशॉप सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडेल, असे रेश्माला स्वप्नातही वाटले नव्हते. याबाबत रेश्मा सांगते की, ‘वडिलांच्या अचानक जाण्याने, आता वडिलांचा मूर्तिकलेचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे, याची जाणीव झाली. वडिलांना कलाकार म्हणून जवळून पाहिले होते. त्यामुळे काही तांत्रिक बाबी आत्मसात केल्या होत्या. उदा. एकदा स्केच पाहिल्यानंतर वडील विजय खातू मूर्ती घडवायचे, पण त्याचबरोबर, अगदी स्केचप्रमाणे न जाता, त्यांच्या डोक्यात आणखी काही विजन असे. त्यात मंडळाचे डेकोरेशन, लाइटिंग, मूर्ती निश्चित ठिकाणी नेताना ती कुठे अडकणार तर नाही ना, गेटची साइज, उंची, त्याप्रमाणे ते मूर्ती बनवायचे. प्रत्येक मंडळाचे कॅलक्युलेशन त्यांच्या डोक्यात असायचे. ट्रॉलीचा बॅलन्स, मागच्या-पुढच्या चाकांच्या बॅलन्सनुसार गणपती उभा करायचा, बॅलन्ससाठी किती नंबरचे पाइप, ट्रॉलीच्या हिशोबाने किती किलोचा गणपती त्यावर बसेल, त्याप्रमाणे त्यांचे नियोजन असायचे. मूर्तिकला होतीच, पण काही तांत्रिक बाबीही समजून घेणे आवश्यक होते. खरे तर वडील असताना तसा कधी असा प्रश्नच आला नव्हता, पण निरीक्षणातून वडिलांची कला आत्मसात केली.’
रेश्मा तिसरी-चौथीला असताना तिने पहिली छोटीशी मूर्ती घडविली होती, जी तिने घाडगेसरांना दिली होती. रेश्मा सांगते की, ‘वडिलांचा वारसा जपायचा, तर कारखानदार होऊन चालणार नाही, कारण वडील कारखानदार नव्हते, तर मूर्तिकार होते. आता मूर्तिकार म्हणून स्वत:ला सिद्ध करणे माझ्यापुढे मोठे आव्हान आहे. सध्या तरी निरीक्षणातून जे मी शिकलेय, ते कामी येतेय, तसेच वडिलांचे काही नोट्स आहेत, एक-एक मूर्ती घडताना पाहायचे, ते आज प्रत्यक्षात कामी येत आहे.’
अनेक प्रसिद्ध मंडळांच्या मूर्ती पूर्णत्वास नेताना, रेश्मा मूर्तींना न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. अर्थात, रेश्मा सांगते की, ‘या वर्षी वडिलांचा प्रत्येक मूर्तीला हात लागला असल्याने, बरेचसे काम त्यांनी उरकलेलेच होते. पुढच्या वर्षी मात्र, नव्याने मूर्ती घडविण्याचे आव्हान असणार आहे. वडिलांप्रमाणे आम्ही प्रत्येक मूर्ती साकारण्याचा प्रयत्न करणारच आहोत, पण बाबांचा मूर्तीवरील टच हा वेगळाच होता, त्याची उणीव नेहमीच राहणार आहे. एवढ्या कमी वेळात सर्व पुन्हा सावरून धरणे, खरे तर मोठे आव्हान होते, पण माझे पूर्ण कुटुंब, माझे काका पहिल्यापासून वडिलांबरोबरच होते, त्यामुळे त्यांचा पूर्णपणे सपोर्ट मिळतोय. त्याचप्रमाणे, माझे वडील कारागीरांची एवढी चांगली टीम बनवून गेलेत, त्यांची खूपच मदत होत आहे. जी जुनी मंडळे आहेत, त्यांच्याशी घरोब्याचे संबंध असल्याने आपल्यासमोर आव्हान आहे, असे त्यांनी मला जाणवू दिले नाही. वडील गेल्यानंतर प्रत्येकाचा खूप चांगला सपोर्ट मिळाला. त्यामुळे काम सुरळीत चालू आहे. वडिलांनी सर्वांशी इतके चांगले संबंध जपले आहेत की, त्याचा मला फायदा झाला.’
दिवंगत विजय खातूंनी स्वत:ची जी ओळख बनविली आहे, ती रेश्माला जपायची आहे. त्यांच्यासाठी तिच श्रद्धांजली असणार आहे, असे रेश्मा सांगते. ती पुढे म्हणते की, ‘वडिलांनी मूर्तिकलेची खूप मोठी इंडस्ट्री उभी केली आहे, ती टिकवून ठेवणे, हेच ध्येय असणार आहे. वडिलांची खूप इच्छा होती की, आम्ही या कलेत यावे, शिकावे, पण त्यांनी कधी जबरदस्ती केली नाही. अर्थात, पूर्वी आम्ही या जबाबदारीपासून लांबच पळत होतो. कारण आपल्याला हे झेपेल की नाही, अशी शंका होती. आम्ही खूप घाबरायचो, त्यामुळे प्रत्यक्ष कधी सहभागी होण्याची डेअरिंग केली नाही आणि आज अचानक सर्वच गोष्टी पेलून धराव्या लागल्या. अर्थात, वडिलांनीही आम्हाला स्वत:चे करिअर निवडण्याची सूट दिली होती. आपल्या आवडीनुसार करिअर निवडा अन् नाव कमवा, असेच वडिलांचे विचार होते. एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून, मी वडिलांची जिद्द जवळून पाहिलीय. त्यामुळे ते गुण आपोआपच आमच्यात आले. त्यामुळे वडिलांचा हा मूर्तिकलेचा वारसा मी पुढे नेणार आहे.’
रेश्मा खरे तर फिल्ममेकिंगमध्ये असून, सहायक दिग्दर्शिका म्हणून काम करते. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव अशा सिझनमध्ये वडिलांची जबाबदारी पार पाडत, त्यांची मूर्तिकलाही पुढे नेताना, रेश्मा आपल्या काही नवीन डिझाइन, चेहरे पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे, तसेच तिच्या वडिलांनी आधी काही चेहरे, डाय बनविल्या आहेत, तो वारसा तर ती जपणारच आहे. त्यात अजून काही इनपुट देता आला, तर त्यासाठी ती प्रयत्न करणार आहे. रेश्मा सांगते की, ‘वडिलांनी कधी मुलगा-मुलगी हा भेद ठेवला नाही. ते आम्हाला कायम जपतच आले, त्यांनी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही, ते गेल्यानंतरही त्यांनी कुठल्याही प्रकारचे टेन्शन ठेवले नाही. त्यांनी घडविलेली इंडस्ट्री टिकविण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. वडिलांवरील श्रद्धेपायी आज मी ही जबाबदारी उचलली आहे आणि त्यांचा ठेवा मी असाच खूप पुढे नेणार आहे.’
- पूर्वी ठरावीक क्षेत्रांत मुलांची मक्तेदारी असायची. वडिलांचा पारंपरिक वारसा चालविणारा म्हणून मुलाकडे पाहिले जायचे, पण ही व्याख्या रेश्मा खातूने पार मोडून काढली आहे. विजय खातू यांच्या मूर्तिकलेचा वारसा आज नेटाने ती पुढे नेतेय. पितृछत्र हरपल्याचे डोंगराएवढे दु:ख पेलत, त्यांनी उभारलेला गणेशमूर्ती इंडस्ट्रीचा डोलारा आपल्या खांद्यावर समर्थपणे तोलून धरला आहे. वडिलांची जिद्द, चिकाटी, कष्टाळू वृत्ती रेश्माने आत्मसातच केली नाहीय, तर माणूस म्हणून जपलेले माणूसपण, कलाकारी, तसेच मूर्तिकलेतील त्यांचे नाव ती कायम झळकत ठेवणार आहे.