लैंगिक शिक्षणाचा विपरीत परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:31 AM2018-03-18T00:31:56+5:302018-03-18T00:31:56+5:30
आठवी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी. शाळेत एका विशेष उपक्रमांतर्गत लैंगिक शिक्षणाचे धडे देणार होते, मात्र त्याचा काहीसा विपरीत परिणाम होऊन मुलाच्या अभ्यासावरील लक्ष उडू नये म्हणून पालकांनी त्या विद्यार्थ्याला उपक्रमात सहभागीच होऊ दिले नाही.
- डॉ. मिन्नू भोसले
आठवी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी. शाळेत एका विशेष उपक्रमांतर्गत लैंगिक शिक्षणाचे धडे देणार होते, मात्र त्याचा काहीसा विपरीत परिणाम होऊन मुलाच्या अभ्यासावरील लक्ष उडू नये म्हणून पालकांनी त्या विद्यार्थ्याला उपक्रमात सहभागीच होऊ दिले नाही. त्याच वेळेस मुलगा हट्टाने त्या लेक्चरमध्ये बसला म्हणून वडील ओरडले. त्यामुळे अशा परिस्थितीत पालकांनी नेमकी काय भूमिका घ्यावी याविषयी आजच्या सदरात बोलूया...
लैंगिक शिक्षणाचा अभ्यासावर परिणाम होतो का?
लैंगिकता ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. शरीरातील इतर क्रियांप्रमाणे सामान्य व गरजेची आहे. वाढीच्या वयात लैंगिकतेबद्दल चुकीच्या गोष्टी ऐकण्याने लैंगिकता गैर आहे, असा समज आपण करून घेतो. अनेकदा पालक, शिक्षक व धार्मिक उपदेशकच लैंगिकतेच्या विरोधात विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करतात, याची परिणती लैंगिकतेच्या तिरस्कारात होते. त्यातून विकृतीचा जन्म होतो. अशा वेळेस स्त्रियांची टिंगल करणे, अश्लील साहित्य वाचणे, पोर्न फिल्म पाहणे, बलात्कार-छेडछाड करणे असे प्रकार घडतात. त्यामुळे योग्य वयात, योग्य व्यक्तींकडून, योग्य असे लैंगिक शिक्षण दिले जाणे गरजेचे आहे. त्याचा कोणताही परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत नाही.
शाळेत लैंगिक शिक्षण योग्य का?
तुमच्या अपत्यांचे शाळेत लैंगिक शिक्षणाचे वर्ग घेतले जाणार आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. ही सुवर्णसंधी पालकांनी दवडू नये. तुम्ही तुमच्या मुलाला स्वत: हे शिक्षण देऊ शकाल असे वाटत नाही, त्याचे वय या शिक्षणासाठी योग्य आहे.
लहानग्यांमध्ये लैंगिकतेविषयी कधी समजू लागते?
साधारणपणे वयाच्या १३-१४ व्या वर्षी मुला-मुलींमध्ये लैंगिकतेचा उगम होतो. मुलींना पाळी सुरू होते व मुलांमध्ये पुरुषत्वाची लक्षणे दिसू लागतात. याच सुमारास अगदी नैसर्गिकपणे मुलामुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागते. त्यांच्या शरीरात एक नवीन गरज आकार घेऊ लागते. लैंगिक इच्छा, मरण, विचार, स्वप्न, उत्तेजना, त्याचे परिणाम याची तीव्र जाणीव होऊ लागते. या वेळी पालक, शिक्षक व अधिकृत सूत्रांकडून जीवनाच्या या नवीन पैलूंची शास्त्रोक्त माहिती मिळणे योग्यच असल्याने चुकीची माहिती मुलांकडे पोहोचत नाही.
शाळेतील लैंगिक शिक्षणाविषयी काही संशोधन आहे का?
जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार, लैंगिक शिक्षण दिल्यानंतर मुलांमध्ये धाडसी
लैंगिक प्रयोग करण्याची प्रवृत्ती
कमी होते. जबाबदार लैंगिक
संबंध ठेवण्याचे वय होईपर्यंत थांबण्याचे सामंजस्य त्यांच्यात निर्माण होते. तसेच, घातक
प्रयोग करण्याची उत्सुकता व गैरसमजांमुळे आलेला न्यूनगंड यांना आळा बसतो. लैंगिकतेचा एक सहज स्वाभाविक स्वीकार व्यक्तीमध्ये निर्माण होतो.