खरा कामगार नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 01:05 AM2019-01-30T01:05:59+5:302019-01-30T01:06:03+5:30
जॉर्ज फर्नांडिस कामगार चळवळीत सक्रिय असताना मी गिरणी कामगार होतो. बेस्ट कामगारांपासून सफाई कामगार, हॉटेल कामगारांचा त्यांनी उभारलेला लढा आजही विसरता येणार नाही.
- दत्ता इस्वलकर
जॉर्ज फर्नांडिस कामगार चळवळीत सक्रिय असताना मी गिरणी कामगार होतो. बेस्ट कामगारांपासून सफाई कामगार, हॉटेल कामगारांचा त्यांनी उभारलेला लढा आजही विसरता येणार नाही. उत्कृष्ट वक्ते आणि विविध भाषांवरील पकड यांसोबतच ते कामगारांमध्ये सहज मिसळायचे. त्यांच्या सभांना मी जातीने हजर असायचो. महत्त्वाची बाब म्हणजे इतर नेत्यांप्रमाणे सभेला कामगार जमल्यानंतर ते यायचे नाहीत, तर कामगारांसोबतच मैदानात सभेला जायचे. सभेआधी मैदानात जमलेल्या कामगारांसोबत ते संवाद साधायचे. त्यामुळेच त्यांच्या भाषणांतून कामगारांच्या मनातील भावना उमटायच्या. त्या सर्व कामगारांच्या मनाला भिडायच्या. म्हणूनच कामगार त्यांच्या एका हाकेवर मुंबई बंद करण्यास तयार असायचे.
मुळात त्या काळात काँग्रेसव्यतिरिक्त सक्षम राजकीय पक्षच नव्हता. त्यामुळे कामगार संघटनाच विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत होत्या. अशा वेळी शोषितांचे प्रश्न उचलून जॉर्ज यांनी व्यवस्थेला आव्हान दिले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी उघडपणे सरकारसोबत घेतलेल्या वैरामुळेच त्यांना कारावास भोगावा लागला. कामगारांच्या वेळेनुसार संपर्क साधण्याच्या सवयीमुळेच ते कामगार वर्गापर्यंत पोहोचले. महत्त्वाची बाब म्हणजे सकाळी ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हॉटेलात काम करणाऱ्या हॉटेल कामगारांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी रात्री १० वाजल्यानंतर सभा घेतल्या. तर सफाई कामगारांसाठी ते सकाळी लवकर हजेरी चौक्यांवर जाऊन सभा घेत होते.
रेल्वे कर्मचाºयांसाठी त्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात खºया अर्थाने त्यांच्यातील नेत्याचे दर्शन झाले. २१ दिवस चाललेल्या संपादरम्यान कर्मचाºयांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. मात्र कर्मचाºयांच्या नोकºया जाऊ लागल्या आणि कर्मचाºयांची धरपकड होऊ लागल्याने त्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. हा संपाचा पराभव नव्हता. मात्र संपातून काहीही साध्य झालेले नसताना तो मागे घेण्यासाठी नेत्याला खूप काही पचवावे लागते. त्याचे धैर्यही त्यांनी दाखवले. म्हणूनच सर्व स्तरांतील कामगार त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहत होता.
राजकारणातील त्यांचा वावर आजही लक्षात आहे. स.का. पाटलांविरोधातील लढाईसाठी ते संपूर्ण ताकद वापरत होते. त्या वेळी पाटलांचा दरारा औरच होता. जॉर्ज यांच्या प्रचारासाठी लावलेले पोस्टर पाटलांचे कार्यकर्ते फाडून टाकत होते. याची कल्पना मिळताच कार्यकर्त्यांऐवजी दोन बेस्ट कामगारांना सोबत घेऊन स्वत: जॉर्ज रस्त्यावर फिरू लागले. काही कार्यकर्ते पोस्टर फाडताना दिसले असता, जॉर्ज यांनी स्वत: त्यांना दम भरला. कार्यकर्त्यांवर अवलंबून न राहता त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा हा नेता म्हणूनच सर्वसमावेशक होता.
गिरणी कामगारांच्या संपावेळी जॉर्ज दिल्लीत होते. कामगारांच्या लढ्यात त्यांच्या पाठिंब्यासाठी भेट झाली. त्या वेळी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्या वेळी गिरणी कामगारांच्या लढ्याला पाठिंबा देताना जॉर्ज यांनी हा लढा फार कठीण होणार असल्याचे सांगितले होते. कारण एरव्ही काम बंद करून कामगार पगारवाढीसाठी भांडत होते. मात्र त्या वेळी गिरण्यांचे मालकच काम बंद करू पाहत होते. अशा परिस्थितीत कोणतेही खोटे आश्वासन न देता जॉर्ज यांनी सत्य परिस्थितीची जाणीव गिरणी कामगार नेत्यांना करून दिली होती.
गुरूलाही पराभूत करणारा नेता
जॉर्ज यांनी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे गुरू पीटर अल्वासीस यांच्याविरोधात निवडणूक लढविल्याचे फार कमी जणांना माहिती आहे. अल्वासीस यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कर्मचाºयांचे १९६० आणि १९६२ मध्ये पुकारण्यात आलेले दोन संप सरकारने चिरडले होते. त्या वेळी जॉर्ज यांची लोकप्रियता पाहून कर्मचाºयांनी त्यांना युनियनचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले. या निवडणुकीत जॉर्ज यांनी अल्वासीस यांचा लाखो मतांनी पराभवही केला. त्यानंतर, जॉर्ज यांनी १९७४ मध्ये पुकारलेला रेल्वेचा देशव्यापी संप सर्वज्ञात आहे. रेल्वेच्या संपामुळे काँग्रेसविरोधी वातावरण देशात निर्माण झाले होते. कामगार वर्गाने पुकारलेल्या असहकारामुळे सत्ता अस्थिर झाल्याचे दिसताच देशात आणीबाणी लागू झाली होती, त्या वेळी जार्ज भूमिगत झाले होते. दरम्यान, त्यांना मारण्याचा कटही शिजविण्यात आला होता. मात्र, माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर हा कट उधळला गेला. पुढच्या काळात त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्याने, मुंबई महापालिका, बेस्ट, टॅक्सी संघटनांचे नेतृत्व त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या शरद राव यांच्याकडे सोपविले. यानंतरही कामगारांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच आघाडीवर दिसले. अशा या नेत्याचे निधन व्हावे, हा दैवदुर्विलास नव्हे काय?
- गोविंद कामतेकर,
सचिव-म्युनिसिपल मजदूर युनियन.