पौगंडावस्था समजून घ्या, संवाद साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 03:57 AM2018-04-15T03:57:08+5:302018-04-15T03:57:08+5:30
क्लिनिकमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाला घेऊन आई आली होती. त्या १४ वर्षांच्या लहानग्याने स्वत:च्या आईला एक गोष्ट सांगितली, त्यामुळे त्या आईला धक्का बसला आणि त्यांनी ताबडतोब क्लिनिकची वाट धरली.
- डॉ. मिन्नू भोसले
क्लिनिकमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाला घेऊन आई आली होती. त्या १४ वर्षांच्या लहानग्याने स्वत:च्या आईला एक गोष्ट सांगितली, त्यामुळे त्या आईला धक्का बसला आणि त्यांनी ताबडतोब क्लिनिकची वाट धरली. त्या लहानग्याने मला स्त्रियांच्या स्तनांबद्दल खूप आकर्षण वाटते, असे सांगितले. याशिवाय, सारखे तेच विचार मनात येऊन उदास आणि एकलकोंडे वाटते अशी व्यथाही मांडली. या सगळ्याचा त्याच्या अभ्यासावर परिणाम होतोय. त्यामुळे पौगंडावस्थेत हल्लीच्या पिढीत दिसणाऱ्या या समस्या दिसून येतात, मात्र त्या कशा हाताळायच्या याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
पौगंडावस्थेत अशा कोणत्या समस्या या पिढीत दिसून येतात?
मूल वयाच्या १३-१४ व्या वर्षी पौगंडावस्थेत येताच त्यांचे लक्ष स्त्रीच्या स्तनांकडे जाऊ लागते. स्तन जितके सुडौल तितके त्यांच्याविषयी वाटणारे लैंगिक आकर्षण अधिक असते. स्त्रियांचे स्तन पाहावे, त्यांना स्पर्श करावा, अशी इच्छा निर्माण होते. त्यामुळे वयाच्या या टप्प्यावर मुलांविषयी अधिक सतर्क राहिले पाहिजे. त्यांच्यावर होणारे संस्कार, विचारांची जडणघडण, मित्र-मैत्रिणींची संगत याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. मुलं पौगंडावस्थेतून जाताना फार विचलित होतात. अनेकदा असे विचार जवळच्या नात्यातल्या किंवा रोजच्या संपर्कातल्या स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात येतात. त्यात मावशी, बहीण, काकू, शिक्षिका, वहिनी अशा नात्यांचा समावेश असतो.
वयाच्या या टप्प्यावर असताना पालकांनी कोणती भूमिका घ्यावी?
हे बदल मुलांमध्ये अगदी नैसर्गिकरीत्या घडतात. याबद्दलची योग्य माहिती योग्य वयात योग्य प्रकारे मिळाली असेल तर मग या बदलांमधून जात असताना मुले फारशी विचलित होत नाहीत. एकदा का स्वत:त होणारे हे बदल नैसर्गिक आहेत हे कळले की, मग हे स्थित्यंतर जाणीवपूर्वक जगणे अवघड राहत नाही. पालकांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की, मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. लहानग्यांवर दबाव आणून, त्यांच्यावर बंधने घालून मुले वेगळ्या वळणावर जातात, त्यामुळे पालकांनी ही जबाबदारी अधिक सतर्कतेने निभावली पाहिजे.
मुलांना या अवस्थेत कशाप्रकारे हाताळावे?
लहानग्यांच्या मनातील नैतिक बांधणींमध्ये हा प्रकार बसणे अवघड असते. साहजिकच त्यांच्या मनात या गोष्टींमुळे तणाव निर्माण होतो, असे विचार बोलून दाखविण्याचीसुद्धा भीती व लाज वाटते. अशा वेळी मनाचा संतप्त कोंडमारा होण्याच्या अनुभवातून अनेक मुले जातात. त्यांच्या बाबतीत जे घडतेय ते अगदी नैसर्गिक आहे, हे सर्वांच्या बाबतीत घडणार आहे हे त्यांना सांगितले पाहिजे. म्हणूनच लैंगिक शिक्षण ही स्वस्थ समाजाची एक अपरिहार्य अशी गरज आहे. पालकांनीही या गोष्टींमुळे विचलित न होता, गोंधळून न जाता मुलांना त्या अवस्थेतून जाऊ दिले पाहिजे. त्यातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी संवाद, विश्वास आणि समजुतीचा मार्ग अवलंबिला पाहिजे.