‘विक्रम’ वाचनालय जपतेय बडोद्याचे मराठीपण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 05:40 AM2018-02-25T05:40:06+5:302018-02-25T05:40:06+5:30
बडोद्याच्या भूमीत मराठी साहित्याची रुची, वाचन संस्कृती जपण्याचे अखंड व्रत मानेकर कुटुंबीयांनी स्वीकारले आहे. १९७३ साली श्रीकांत मानेकर यांनी बडोद्यात घरातच सुरू केलेल्या या वाचनालयाच्या इवल्याशा रोपट्याचा महावृक्ष झाला आहे.
- स्नेहा मोरे
बडोद्याच्या भूमीत मराठी साहित्याची रुची, वाचन संस्कृती जपण्याचे अखंड व्रत मानेकर कुटुंबीयांनी स्वीकारले आहे. १९७३ साली श्रीकांत मानेकर यांनी बडोद्यात घरातच सुरू केलेल्या या वाचनालयाच्या इवल्याशा रोपट्याचा महावृक्ष झाला आहे. गेली तब्बल ४५ वर्षे हे वाचनालय शासनाच्या अनुदानाशिवाय बडोदेकरांपर्यंत वाचन संस्कृतीचे बीज रुजविते आहे.
बडोद्यातील दांडियाबाजार येथे असणाºया या वाचनालयात २५ हजार ग्रंथांचा खजिना आहे. त्यात ८० टक्के ग्रंथसंपदाही मराठी साहित्यविश्वाची आहे. या वाचनालयाचे ७०० सभासद आहेत. त्यात पाच वर्षांच्या लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. या वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमधील साहित्यसंपदा आहे. याशिवाय, मराठी चित्रपट-नाटकांच्या सीडीज्ही उपलब्ध आहेत. या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक वर्षे बडोदेकरांना मराठी साहित्याशी नाते जोडण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. बडोद्यातील केवळ मराठी भाषिकांना नव्हेच तर अन्य भाषिकांनाही मराठी साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने हे वाचनालय कार्यरत आहे. बडोद्यातील विविध परिसरांत घरपोच विनामूल्य सेवा देण्यात येते. तीन स्वयंसेवक ही सेवा पुरवितात.
या वाचनालयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारी मानेकर कुटुंबीयांची दुसरी पिढी विक्रम मानेकर यांनी याविषयी सांगितले की, वाचनालयाच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. मराठी भाषेसह नाट्यकला, संगीतकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमही वाचनालयाद्वारे आयोजित केले जातात. आतापर्यंत या वाचनालयाला गायक श्रीधर फडके, पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार, गायक आनंद भाटे, गायिका मंजुषा कुलकर्णी आदी दिग्गजांनी भेट देऊन सादरीकरण केले आहे.
‘देवाण-घेवाण’साठी निवड
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी वाङ्मय परिषद (बडोदे) आणि सहयोगी संस्था (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देवाण-घेवाण’ दालन होते. या माध्यमातून अनुवादित साहित्याला चालना देण्यात आली. या उद्देशाने मराठी-गुजराती प्रकाशकांनी पाठविलेली पुस्तके देण्यासाठी विक्रम वाचनालयाची निवड करण्यात आली. या माध्यमातून दोन्ही भाषांमधील साहित्य समृद्धीसाठी प्रयत्न करण्यात यावे हा मुख्य उद्देश आहे.
घरातच सुुरू केले वाचनालय
१९७१ साली भारत-पाकिस्तानचे युद्ध झाले होते. त्या काळच्या चळवळीत वडिलांचा सक्रिय सहभाग होता, ते क्रांतिकारी विचारांचे होते. क्रांतिकारी विचारसरणीच्या प्रचारासाठी वडिलांनी वाचनालय सुरू केल्याचे आठवण विक्रम मानेकर यांनी सांगितले.
भविष्यात होणार डिजिटायझेशन
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा आवाका वाढल्याने त्याचा वाचनसंस्कृतीवर होणारा परिणाम टाळण्यासाठी येत्या वर्षात वाचनालयात डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साहित्याचे डिजिटायझेशन, ई-बुक्स असे अनेक उपक्रम राबविण्यात येतील.